Sunday, June 2, 2013

पार्टी जरा मालदार हवी !!!

                                       कोणता माणूस कधी भेटेल आणि आपलं टाळकं सटकवेल याचा नेम नाही .मला तर अनेक लोक भेटत असतात .पण प्रत्येकाशी वागताना बोलताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हाच माझा पवित्रा असतो.पण कधी कधी इच्छा नसताना तोंडातली साखर कडू करावी लागते.                                             

                              काल असेच झाले.सकाळी झोपेत असतानाच मोबाईल खणखणला.अगदी सकाळी फोन आल्यामुळे मी घाबरलो होतो .नंबर अनोळखी होता .तसाच उचलल्यावर पलीकडून चौकशी सुरु झाली .`झोप झाली का हेमंत दादा ? अरे मी पाटील काका बोलतो .`असे सांगून फोन करणार्याने त्याची  अजून माहिती दिली .फार फार लांबच्या नात्यातली ओळख पटली .उभ्या आयुष्यात त्यांना कधी भेटलो  नाही ,पाहीले नाही .मी ओळख पटल्याचा होकार दिला तशी त्यांनी अजून माहिती द्यायला सुरुवात केली.`अरे आपल्या दादू चे यंदा लग्न करायचे आहे ,एखादी मुलगी पाहून टाक ना !` मी थोडी चौकशी केली तर दादू एम.फार्म.करून परराज्यात चांगल्या पगारावर नोकरी करत होता.मग मी त्यांना त्यांच्या अपेक्षा विचारल्या .`हे पहा हेमंत दादा ,आपल्याला मुलीला काही नोकरीला लावायचे नाही.मुलगी बी.ए.,बी .कॉम. असली तरी चालेल.दिसायला सर्वसाधारण असली तरी चालेल .पण पार्टी जरा मालदार हवी ह !`पार्टी मालदार हवी म्हणजे नक्की काय व कशासाठी ?म्हणून मी पुन्हा चौकशी केली .त्यावर पाटील काका म्हटले,`अरे बाबा ,जरा मालदार पार्टी असली म्हणजे बर ,आपल्या दादूची हौस मौज होईल ,शिवाय पैशाटक्क्याची अडचण भासणार नाही.तू सांग तुटपुंज्या लोकांशी सोयरिक करण्यात काही मजा आहे का ? `.मी म्हटले `बर बर ,शोधू एखादी मालदार पार्टी दादुसाठी.`मग विचार आला हुंड्याची अपेक्षाही एकदा विचारून घ्यावी .`काही नाही दादा ,आपल्या फार अपेक्षा नाहीत .शेजारच्या सरांचा मुलगा डिप्लोमाच आहे .त्याला १२ लाख हुंडा मिळाला .आपला दादू  एम.फार्म.आहे ,त्याला २५ लाख तरी मिळायला हवेत.
                                      आता माझ टाळकं सटकल होत .अंगावरची गोधडी बाजूला फेकली आणि खाडकन उठून बसलो .लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून हुंडाबिंडा काही नको फक्त चांगली मुलगी हवी असे म्हणणाऱ्या जमान्यात २५ लाखाची अपेक्षा ठेवणाऱ्या महाभागाला त्याची जागा दाखवायलाच हवी असा विचार मनात आला.खाडकन उठून बसल्यामुळे बायकोही किचन मधून धावत आली आणि इशाऱ्यानेच काय झाले ?कोणाचा फोन आहे अशी विचारत होती .मी हि इशाऱ्यानेच तिला शेजारी बसायला लावले व फोनचा स्पीकर चालू केला .मी बोलता बोलता काकांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती जाणून घेतली.स्वत : सेवानिवृत्त शिक्षक .घसघशीत पेन्शन चालू.बायकोही शिक्षिका .सहाव्या वेतन आयोगाचा पगार चालू.दादुला भलेमोठे प्याकेज .एकंदरीत महिन्याला लाखाच्या पुढे उत्पन्न .तरीही हाव २५ लाखाची आणि पार्टी मालदार हवी !!
मी डोळे चोळतच काकांना सांगितले ,`काका ,एक पार्टी आहे आपल्याकडे .मुलीच्या बापाचे दोन चार कारखाने आहेत नाशिकमध्ये .२५ काय मी ४० लाख द्यायला सांगतो त्याला .`

                काकांच्या तोंडाला लगेच पाणी सुटले.`अरे वा छानच म्हणायचे  मग.आपल्याला अगदी अशीच पार्टी पाहिजे .हे आता सगळ तुझ्याच हातात आहे रे बाबा .तुझी मावशी तुझ फार नाव काढत होती .मला रोज सांगायची ,हेमंत दादाला फोन लावा फोन लावा .`मावशी काळी का गोरी आयुष्यात कधी पाहिली नाही .काकांच्या अपेक्षांना पालवी फुटायला लागली होती.
`सगळ्या गोष्टी मिळतील काका .दादूची चांगली हौस मौज होईल .पण तुम्हाला रोज एक काम करावे लागेल .`
`सांग ना दादा ,एक काय दहा काम करायला तयार आहे मी .`
                        माझ्या झोपेची पुरती वाट लागली होती पण सटकलेल टाळकं थोड जागेवर आल होत.बायकोला माझ्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे पुढे काहीतरी  बॉम्बगोळा पडणार हे तिला कळून चुकले होते. ती इशाऱ्यानेच सांगत होती `जाऊ द्या हो ,कशाला सकाळी सकाळी डोक लावता `
मी मात्र ठाम होतो .समाजातल्या अशा अपप्रवृत्तींना लगाम घालायलाच पाहिजे अशी माझी वृत्ती .त्यांना वठणीवर आणणे हाच माझा उद्देश .
मी पाटील काकांना म्हटले `काही नाही काका .तुम्ही फक्त रोज एकच काम करायचे .मुलीला रोज संध्याकाळी दारू प्यायला लागते तेवढी आणून द्यायची.`
खाडकन फोन आदळायचा आवाज आला आणि मी सैरभैर होऊन माझी गोधडी शोधू लागलो.
बायकोने केव्हाच तिची घडी करून ठेवून दिली होती .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...