Tuesday, September 24, 2013

खंडणीखोर बनवणारी शिक्षणपद्धती

                                    आजच्या म.टा.मध्ये खंडणीखोर शिक्षकाची बातमी वाचनात आली.बेरोजगारीमुळे कमावण्यासाठी त्याने खंडणीखोरीचा सोपा मार्ग शोधला होता .संबंधित शिक्षकाला अटक झाली असून कायद्यानुसार पुढील कारवाई होईलही.परंतु त्याच्यावर अशी वेळ का आली याचा कोणी विचार करणार आहे कि नाही ? सगळाच दोष  त्याच्यावर किंवा शासनावर देण्यापेक्षा समाजानेही विचार करण्याची वेळ आली आहे .मुळात सगळ्यात जास्त दोष कुणाला दिला पाहिजे तर तो आपल्या चुकीच्या शिक्षण पद्धतीला व ती राबवणाऱ्या यंत्रणेला .हाताला काम मिळेल असे  व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यापेक्षा आपण अजूनही वास्को -द -गामा च्या पराक्रमाच्या कथा चघळत बसतो.इतिहासाची जाणीव विध्यार्थ्यांना झालीच पाहिजे .त्यातून नवीन काही घडवण्याची प्रेरणा मिळते याबद्दल दुमत नाही .पण ते पोट भरण्यासाठी उपयोगी नाही हे ही तितकेच सत्य आहे .आज सभोवतालच्या जगात काय चालले आहे किंवा उद्या आपल्याला जगण्यासाठी आज काय केले पाहिजे हे आपली शिक्षण पद्धती शिकवत नाही .
                                      शासनानेही `अंदाधुंदपणे`निरुपयोगी अभ्यासक्रमांना व ते शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांना परवानग्या देऊन `बेरोजगार`तयार करण्याचे कारखानेच काढले आहेत .पुढार्यांच्या सोयीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी असे कारखाने निघालेत पण त्यातून तयार झालेली बेरोजगारांची फौज दिशाहीन झाली आहे. .हातात डिग्रीचे चिटोरे आले पण त्याला साजेशी नोकरी नाही .दुसरी कुठली मिळाली तर त्यात कमीपणा वाटतो.नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाही .घरात ,समाजात हेटाळणी होते.मग अशी मुले वाममार्गाला जातात.त्यामुळेच अशा खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिकली सवरलेली मुले दिसू लागली आहेत .यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही .परंतु अशा घटनांचे समर्थनही करता येणार नाही.आई जेऊ घालीना आणि बाप भिक मागू देत नाही अशी अवस्था या बेरोजगारांची झाली आहे .समाजाने आता पुढे येउन अशा बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
                                               भारताला महासत्ता बनवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावू पाहणारी ही `उर्जा `अशी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकून वाया जाऊ नये यासाठी शासनेही बेरोजगारांकडे केवळ मतपेटी म्हणून न पाहता हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे .नाहीतर देशातील तुरुंग `पदवीधर `गुन्हेगारांनी भरलेले पाहण्याचे दुर्दैव आपल्या नशिबी असेल .

Thursday, September 19, 2013

पुढच्या वर्षी लवकर ये पण तेवढ लक्षात ठेव.

                                              बाप्पा ,तुला काल मोठया आनंदाने आणि उत्साहाने निरोप दिला खरा ,पण आज भलतेच कंटाळवाणे वाटते आहे रे .घर नुसते रिकामे रिकामे वाटते आहे. काल तू म्हटलास खरा पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणून ,पण वर्षभर वाट पाहणे म्हणजे आमची परीक्षाच आहे रे बाबा .मी तर आत्ताच `काउंट डाउन`सुरु केले आहे .
                                                एक मात्र बर झाल.तुझ्यामुळे दहा दिवस भरपेट मोदक खाऊन शरीरातला गोडवा आणखी वाढवता आला.सारखं सारखं डायबेटीसची भीती दाखवणाऱ्या बायकोला चोरून मोदक खाण्याची मजा काही औरच होती.आता थेट पुढच्याच वर्षी मोदक खायला मिळणार म्हणून मन जरा खट्टू होत रे . 

                  बाप्पा दहा दिवस कसे गेले काही कळलेच नाही.सकाळी सकाळी तुझ्या आरतीसाठी धावपळ उडायची .कुणी दुर्वा आणायला पळायचं तर कुणी फुलं .सगळं वातावरण कस मंगलमय असायचं.तुला सुखकर्ता दुखहर्ता का म्हणतात हे या दहा दिवसात कळले बर का .तू आल्यापासून जाईपर्यंत बायको चक्क शब्दानेसुद्धा भांडली नाही .`पप्पा ,तुम्हाला  काही कळत नाही हो `हे वाक्य दहा दिवसात कानावर आलं नाही .घरात असे गुण्यागोविन्दाचे वातावरण असताना बाहेरसुद्धा शान्तता आणि सुव्यवस्था नांदत होती .तुझे सगळ्यात जास्त कोणी आभार मानत असेल तर ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.आबा हेच .लालबागच्या राजाचे दोनचार प्रसंग वगळता सगळीकडे आलबेल होत .मिडीयाला चघळायला काहीतरी खाद्य हवे म्हणून लालबागचे प्रकरण तूच घडविले अशी भाविकात चर्चा होती .
                    बाप्पा ,ते आसारामबापूवाले मदतीला आला नाहीस म्हणून तुला शिव्या देत होते बर का .माझे नाव नको सांगूस ,पण काही लोक  तुझ्या नावाने डबल मोदक वाटत होते बर का .म्हणे तू दाभोलकरांना संपविले .भलतंच काहीतरी .पण तू भलताच भारी बर का ,तुझ्या त्या लाडक्या भक्ताला ,जयवंत साळगावकरांना बरोबर प्रोमोशन देऊन तुझ्या दरबारात हजर करून घेतले .
                बाप्पा ,तुझ्या अशाच करामती चालू ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा.आणि येण्याच्या आधी यंदा जसा भरपूर पाऊस पाडला तसा जोरदार बरसू दे मगच ये .ते पेट्रोल ,डीझेलच तेवढे पहा .जरा भाव कमी करता आलेत तर आवडेल आम्हाला .महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारी यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस .

                 बाप्पा ,तू त्या उंदीर मामाला ,सॉरी बाप्पा ,तुझ्या त्या मूषक`राज`ला रागावत का नाहीस रे .तुला माहित नसेल कदाचित त्याने आमच्या नाशिकच्या विकासाची `ब्ल्यू प्रिंट `लपवून ठेवली आहे .त्याने ती कुरतडण्याच्या आत पुढच्या वर्षी घेऊन ये रे बाप्पा .नाहीतर `पब्लिक `कोणाला कुरतडेल हे तुला सांगायला नको .
         बाप्पा ,एक विचारायचंच राहील .तुझ्या दरबारात एखादा चांगला मास्तर आहे का रे .अरे त्या राहुल बाळाला गरिबीची व्याख्या शिकवायची आहे रे.पहा ,असेल तर दे पाठवून त्याला.आणि पुढच्या वर्षी येण्या आधी एक काम जरूर कर.काही अवघड नाही रे तुला .त्या मुक्या मनमोहनला दे ना एक धक्का.पार वाट लावली रे त्याने देशाची.बरोबर आहे तुझ ,तो त्याच्या कर्मानेच जाईल ,पण आमचा एक शिक्का आणि तुझा धक्का उरलेलं काम सोप करेल .नरेंद्र मोदींनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहेच .दे ना एक संधी त्यांना .भला माणूस वाटतो .पाहू या गुजरातची विकासगंगा देशभर पोहचवतात का ते .संधी तर देऊन पहा ,पुढचे पाहू पुढे ,वाजपेयी बनतात कि येडीयुरप्पा !!
      बाप्पा ,अजून भरपूर काही सांगण्यासारखे आहे .पण तुलाही किती संकटात टाकाव .आता एवढेच पुरे.पुढच्या वर्षी लवकर ये .आणि ते मोदींचे तेवढे लक्षात ठेव .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...