Saturday, November 30, 2013

ज्याच्या आयुष्यात असेल `पगार `त्याचे आयुष्य हिरवेगार !

                             आमच्या `पगार `आडनावाशी संबंध आला नाही अशी व्यक्ती जगात सापडणे केवळ अशक्य !प्रत्येक घरातील आर्थिक वातावरण `पगार `झाल्याबरोबर बदलते .महिना अखेर जसजसा जवळ येतो तसतशी आमच्या आडनावाची घराघरात बोंबाबोंब सुरु होते.कामावरून नवरा घरात आला की बायकोची काहीतरी कुरकुर सुरु होते आणि मग नवरा खवळतो ,`अग थांब न थोडस ,महिना अखेर आहे तुला कळत नाही का ?एकदा `पगार `होऊ दे मग घे तुला हव ते . आमच्या नसण्यामुळे नवरा बायकोमध्ये असे हे वितुष्ट ! म्हणजे पहा प्रत्येक घरात `पगार `किती महत्वाचा घटक आहे.मंडळी तुम्हाला सुद्धा हे मान्य करावे लागेल बर का !!
         तर असे हे `पगार `पुराण सांगायचे  कारण म्हणजे फोनवरून जेव्हा मी एखाद्याला माझे नाव सांगतो ना तेव्हा फार घोटाळे होतात .अनेकदा पलीकडच्याला `मी हेमंत पगार बोलतोय `असे सांगितले तरी त्याला कळत नाही .मग काही मिनिटे आमच्यातला संवाद पुढीलप्रमाणे रंगत जातो .
                             मी -अहो मी हेमंत पगार बोलतोय .
पलीकडची व्यक्ती-अच्छा अच्छा हेमंत पवार बोलताय होय .   
                  मी -नाही हो ,हेमंत पगार ..............प ....गा.....र ...
प.व्यक्ती -बर बर  पगारे  का ...
अशा प्रकारे पगार आडनावाची अधिक मोडतोड होऊ देण्यापेक्षा मीच समोरच्यांना थांबायला सांगतो आणि पुन्हा संवाद रंगतो तो असा ,
 मी -तुम्ही कधी नोकरी केली आहे का ?`
प. व्यक्ती -होय तर मी सरकारी  नोकरीत आहे .
मी -मग सरकार त्याबदल्यात काही देते का तुम्हाला ?
प.व्यक्ती -अहो असे कसे विचारता तुम्ही ? सरकार आम्हाला पगार नाही का देत .
मी-  काय देते  ? काय देते सरकार तुम्हाला ?
प.व्यक्ती -अहो पगार देते पगार .
मी -अहो तोच मग मी हेमंत पगार . आले का लक्षात आता ?
पलीकडचा क्षणभर विचार करतो आणि कळल्यावर पोटभर हसत सुटतो .
                                                 रोज कुठेना कुठे आमच्या आडनावाचा उद्धार होत असतो .वर्तमानपत्रांच्या आठ दहा पानांमध्ये आमचे आडनाव नाही असा एकही दिवस नसतो .कुठे `पगार` वाढ होण्यासाठी आंदोलन तर कुठे `पगार `वेळेवर होत नाही म्हणून आंदोलन .वर्षातून फक्त एकदाच आमचे महत्व थोडेसे कमी होते ते दिवाळीला .तेव्हा आमचा `बोनस `नावाचा सावत्र भाऊ घराघरात घुसलेला असतो.जिकडे तिकडे एकच चर्चा ,बोनस मिळणार आहे का ? बोनस मिळाला का ? बोनस बोनस बोनस !!!पण सावत्र तो सावत्रच ! त्यालाही आमच्याशिवाय काही महत्व नाही .बोनस द्यायचा म्हणजे `पगाराच्या `किती टक्के ? किंवा किती दिवसाचा `पगार `बोनस म्हणून द्यायचा ?
म्हणजे मुख्य चर्चेला `पगार ` हा घटक महत्वाचाच !त्याशिवाय `बोनस `ची किंमत ठरत नाही .
 तर असे हे आमचे आडनाव `पगार`.
मी तर म्हणतो ,
ज्याच्या आयुष्यात असेल `पगार `त्याचे आयुष्य हिरवेगार !

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...