Wednesday, May 2, 2012

माझे म्हणने पटतेय का बघा !!!


        माझे म्हणने पटतेय का बघा !!!
   मित्रांनो,हा फोटो आहे भारतातील आघाडीचे उद्योगपती अजय पिरामल यांचा.त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी स्वाती पिरामल.वृत्तपत्र वाचताना सहज या फोटोकडे लक्ष गेले आणि दोघांच्या उंचीतील फरक लगेच डोळ्यात भरला.अजय पिरामल साहेब जवळपास सहा फुट तर स्वाती पिरामल यांची अंदाजे पाच फुट.मनात विचार केला,लग्न करताना यांनी उंचीचा विचार केला नसेल का ??
                मित्रांनो,यांनीसुद्धा उंचीचा विचार निश्चितच केला असेल.पण शारिरीक नाही तर त्यांनी एकमेकांच्या कर्तुत्वाच्या उंचीचा विचार केला असेल.असे फक्त असाधारण लोकच करु शकतात,तुम्ही आम्ही नव्हे !!! कारण स्वाती पिरामल नुसत्या अजय पिरामल यांच्या पत्नी नाहीत तर त्यासुद्धा कंपनीच्या संचालक आहेत.म्हणजे अजयरावांच्या खांद्याला खांदा लावुन त्या कंपनीच्या प्रगतीत सहभागी आहेत.
           असेच उदाहरण मी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे देऊ शकतो.सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नीचे तर आगळेवेगळे उदाहरण आहे.सचिन अल्पशिक्षित तर अंजली डॉक्टर.शिवाय दोघांच्या वयात ,उंची यात ही फरक. अंजली सचिनपेक्षा चार वर्षानी मोठी !!!
                   मग मी विचार करतो ,आपणच का लग्न करताना उंची,रंग, वय याचा नको तेवढा किस काढतो ??आपण का कर्तुत्वाला किंमत देत नाही. या क्षुल्लक गोष्टींचा किस काढता काढता लग्नाचे वय निघुन जाते आणि नंतर पश्चातापाशिवाय हातात काहीच राहात नाही .
     मित्रांनो आणि मैत्रींणींनो,अजुनही वेळ गेली नसेल तर विचार करा.माझे म्हणने पटतेय का बघा !!!

Saturday, March 3, 2012

बच्चे की कसम,पैसा दे दुंगी भैया

नुकत्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या.विजेत्यांनी,पराभुतांनी,पक्षांनी,अपक्षांन करोडो रुपये बरबाद केले.पैसे घरोघर जाऊन वाटले ,दारुत घोटले,मटनात बाटले.पैसा हेच सर्वस्व आहे असे म्हणणारे अनेक आहेत.पण निवडणुकीत पैशाला`किंमत`नव्हती.दारुच्या बाटल्यांवर पाण्यासारखा पैसा उधळला गेला.मिसरुडही न फुटलेली कच्ची बच्ची निवडणुक प्रचारात `रम`मान होत होती.आता निवडणुका संपल्या.विजेते आपल्या विजयाचा डंका पिटत आहेत तर पराभुत ईव्हीएमच्या नावे कोल्हेकुई करत आहेत.विजयी उमेदवारांनी लाखोचे फटाके फोडुन प्रदुषन वाढीस हातभार लावला तर पराभुत आनुन ठेवलेल्या फटाक्यांसाठी सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाची वाट पहात आहेत.
अशा वातावरणात मला एका हृदयद्रावक प्रसंगाचा साक्षीदार व्हावे लागले.संध्याकाळच्या वेळेला एका औषध दुकानात बसलो असताना एक बाई आपल्या तान्हुल्याला पदरात गुंडाळुन घेऊन आली.
`भैय्या,बच्चे को बुखार है,कोई दवा दे दो`
अतिशय काकुळतीला आलेल्या स्वरात तिने दुकानदाराकडे औषध मागितले.
तिच्या पदराआडचे ते तान्हुले आपल्या चिमण्या डोळ्यांनी आकाश न्याहाळत होते.
`बहेनजी,बच्चेको डॉक्टर के पास दिखा दो,वो जो दवा लिख के देंन्गे मै वो दे दुन्गा` दुकानदाराचा सल्ला.
`नही ना भैया,आपही दे दो.दाकतर को देनेके लिये पैसे नही है मेरे पास`
त्या माऊलीचा स्वर करुण झालेला.
फिर ऐसा करो ना ,सरकारी अस्पताल मे मुफ्त मे दवा मिलती है वहा जाओ.`
भैया,वहा आनेजाने को तिस रुपया लगता है और मै अभी कामसे थोडी देर की छुटटी लेके आयी हु`
नाही हो करता करता दुकानदाराने विस रुपयांची औषधाची बाटली तिच्या पुढे ठेवली.
हातातली दहा रुपयाची चुरगळलेली नोट काऊंटरवर ठेवत ती माऊली म्हणाली,
`भैया,दस रुपयेही है,छोटी शिशी होगी तो दो ना`
आवाजात अती करुणता,नजर अपराधीपणाची,जमिनीकडे झुकलेली.त्या माऊलीचा जीव तिच्या बछड्यासाठी तीळ तीळ तुटत होता.
`बहनजी,और दस रुपया दे दो`
`नही है ना भैया,इसके पापाभी गये थे ठेकेदार के पास पैसा लेने,गाली दे के भगा दिया उसने`
आता मात्र त्या माऊलीचा बांध फुटला होता.दोघा डोळ्यातुन अश्रुंचा पुर वाहात होता.
दुकानदारही काऊंटरकडे पाठ करुन डोळ्यातली आसवे लपवत होता.क्षणभर अनाम शांतता .
`दे दो ना भैया`
क्षणभराची शांतता भंग करणारे तिचे हे आर्जव मात्र काळिज चिरणारे होते.
दुकानदाराने ही डोळ्यातली आसवे पुसुन ती बाटली पुन्हा काऊंटरवर ठेवली आणि म्हणाला
`बहेनजी ,यही शिशी ले जाओ,बाकी दस रुपये बादमे देना कभी`
` बच्चे की कसम भैया,अगले हप्ते आपका पैसा चुका दुंगी`
ती बाटली घेतल्यानंतर केव्हा एकदा बाळाला औषध देईन असे त्या माऊलीला झाले होते.क्षणात तर ती दिसेनाशीही झाली होती.
महासत्तेकडे वाटचाल करत असणार्या भारतातली किती ही विषमता.दारुच्या बाटल्यांसाठी करोडोचा चुराडा आणि तान्हुल्याच्या औषधासाठी अपार याचना ??

Friday, June 24, 2011

पाकिटमार पोलीस

मी नुकताच नवीन मोबाईल हॅण्डसेट खरेदी केला आहे.एखाद्या लहान मुलाला जशी एखादी नवीन वस्तु दिली तर तो अगदी भारावुन जातो अगदी तसेच माझेही झाले आहे.सकाळी झोपेतुन उठल्यानंतरचे दहा मिनिटे सोडले तर हॅण्डसेट दिवसरात्र माझ्याबरोबरच असतो.कारण वाढत्या महागाईच्या भडक्यामुळे माझ्यासारख्या `आम आदमी`ने मोबाईल सारखी चैनीची वस्तु घेणे माझ्यासाठी तरी अप्रुप होते.
आणि अशातच काल रात्री मला एक स्वप्न पडले.नाशिकमधल्या एका मुख्य रस्त्याने मी माझ्या दुचाकीने जात होतो. माझ्यापुढे एक चार चाकी वाहन चालले होते.त्या वाहनाच्या चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरच्या दोघा चौघांना धडक दिली.मी पटकन माझ्या नव्या मोबाईलच्या कॅमेर्यातुन परिस्थीतीचे चित्रण करु लागलो.माझ्यासारखेच अजुन दोघे चौघे जण `फोटोसेशन` करत होते.तेवढ्यात पोलिसांची गाडी तेथे हजर झाली.गाडीतुन सात आठ पोलिस भराभर खाली उतरले.उतरल्याबरोबर त्यांनी ज्यांच्या हातात मोबाईल होते त्यांना पकडले.क्षणभर मला काही कळलेच नाही.एका पोलिसाने तर माझ्या गळ्याभोवती हात टाकुन चोराला पकडतात तसे घट्ट पकडले.दुसरे दोघे माझ्या हातातील हॅण्डसेट हिसकावत होते.तुम्ही असे का करता आहेत असे मी त्यांना विचारले तर ते हॅण्डसेट अपघातग्रस्तांचे आहेत आणि ते आम्हाला जमा करायचे आहेत असे त्यांनी सांगितले.हा माझाच आहे असे सांगण्याचा मी पराकोटीचा प्रयत्न केला पण मी अयशस्वी झालो.मग मी तो मोबाईल त्यांच्याकडे जमा केला आणि तो परत कसा मिळवता येईल असे त्या पोलिसांना विचारले.तेव्हा त्यातील एक कुत्सीतपणे हसत म्हणाला,`अरे वेडया ,अशा जमा केलेल्या वस्तु आम्ही कधी परत करत असतो का ?`हे ऐकुण तर माझे अवसानच गळाले.मी गयावया करायला लागलो.मी मोबाईल कोणत्या परिस्थीत विकत घेतला याचे बहाणे सांगायला लागलो.मित्रांकडुन पैसे उसनवार घेऊन विकत घेतला,हप्त्याने घेतला,बायकोचे दागिने गहान ठेऊन घेतला.अशी नाना कारणे सांगितली.तेव्हा कुठे त्यांनी मोठ्या दयेने माझा मोबाईल परत देन्याची तयारी दाखवली.मग त्यातील एकाने हॅण्डसेट ,दुसर्याने बॅटरी तर तिसर्याने सिम कार्ड परत केले.अवघ्या काही मिनिटात त्यांनी या वस्तुंचे आपआपसात वाटप करुन घेतले होते.मोबाईल परत मिळाल्याचे समाधान माझ्या चेहर्यावरुन ओसंडुन वाहायला लागले होते.तेवढ्यात माझा हात माझ्या पॅन्टच्या मागच्या खिशाकडे गेला आणि मला धक्काच बसला.खिशातुन पैशांचे पाकिट गायब झाले होते.पाकिट पोलिसांनीच मारले होते हे माझ्या लक्षात आले.आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला भिडली होती.काही मिनिटापुर्वी गयावया करणारा मी पेटुन उठलो होतो.पोलिस असले म्हनुन काय झाले,आता यांना सोडायचे नाही.असे म्हणुन मी मुठी आवळल्या.............

आणि आणि मला जाग आली.उशाजवळचा मोबाईल चालु करुन वेळ पाहीली .रात्रीचे दोन वाजले होते.बायकोचे घोरणे शांततेचा भंग करित होते.माझी चिमुरडी शांतपणे झोपली होती आणि माझी पॅन्ट पाकिटासह भिंतीला टांगलेली होती.झोपेचे पुरते खोबरे झालेले होते.डोळ्याला डोळा लागत नव्हता.मग पुन्हा एकदा खेळत बसलो.दिवस केव्हा उजाडला कळलेच नाही.
ता.क.-माझ्या पैशांच्या पाकिटात रोख रक्कम रु.१५०/-,एका बॅंकेचे एटीएम कार्ड,बायकोचे दोन पासपोर्टॅ फोटो,मुलीचे दोन दोन पासपोर्टॅ फोटो,साईबाबांचा फोटो,पाच रुपयाची एक,एक रुपये व दोन रुपयाच्या दोन कोर्या करकरीत नोटा असा महत्वाचा मुद्देमाल होता.तो भिंतीवरच्या पॅन्टच्या खिशात सुरक्षीत आहे.

Thursday, September 30, 2010

नाशिक मनपा केशकर्तनालय

आज सकाळी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सौ.ने वर्तमानपत्र माझ्या बिछान्याजवळ आणुन ठेवले आणि नको ते झाले.नको तो लेख वाचला आणि माझ्या डोक्यावरचे शिल्लक असलेले केस सरळ ताठ झाले.बातमी तशी जुनीच होती,पण त्यावर उहापोह करनारा लेख होता तो.नाशिक महानगरपालिका त्यांच्या शाळेतील मुलांचे केस कापन्य़ाचे ठेके देनार आहे असे त्यातुन कळले.मी शक्यतोवर नाशिक मनपाच्या बाबतीत छापुन आलेल्या बातम्या वाचत नाही.पुर्वी मी खुन, दरोडे ,भ्रष्टाचार ,बलात्कार,घोटाळे यांच्या बातम्या वाचत नसे.कारण या बातम्या जवळपास सारख्याच माहीती सांगणार्या असतात ,फक्त पात्रांची नावे आणि काही मजकुर बदललेला असतो.आताही मी सोनसाखळी चोरिच्या,वाहनचोरीच्या,वाहन जाळ्पोळीच्या आणि नाशिक मनपाच्या बातम्या कटाक्षाने टाळतो.कारण नाशिक मनपा हा माझ्या द्रुष्टीने एक हास्यास्पद विषय झाला आहे.कालच एका नागरीकाने नाशिक मनपाची `सानप बाबा आणि त्यांचे ११३ चोर ` अशी संभावना केली.अर्थात मी त्यांच्या या मताशी पुर्णपणे सहमत होतो असे नाही.हाताची सगळी बोटे सारखी नसतात असे मी त्यांना सांगितले.त्यांच्यातही काही सज्जन आहेत असे मी सांगीतले.(संतसज्जन नव्हे !!! नाहीतर काहीजण स्वत:बद्दल उगाच गैरसमज करुन घेतिल).पण त्यांनी माझे म्हनणे काही केल्या मानले नाही.असो.
विषय मनपाच्या केस कर्तनाचा होता.ज्यांच्या डोक्यात काहीच नाही अश्या मुलांच्या डोक्यावरचे केस कापण्याची कल्पना कोणाच्या तरी( ठेकेदाराने उधार दिलेल्या)डोक्यात आली आणि त्याच्या अंमलबजवनीची आता तयारी चालु आहे.खरे तर मनपाच्या शाळांची आधीच इतकी दुरावस्था आहे की विचारता सोय नाही.पंचवटीतील एका शाळेत काही दिवसांपुर्वी जाण्याचा योग आला तेव्हा तेथील मुले पोषण आहार खात होती आणि शेजारी डुकरांचा मुक्त संचार होता.शिक्षक गप्पा मारन्यात गुंग होते आणि मुले डुकरांपासुन बचाव करत जेवण करत होती.
कालचाच एक किस्सा सांगतो.काल सायंकाळी एका खाजगी रुग्णालयात गेलो होतो.गेल्याच वर्षी मनपाच्या शाळेतुन दहावी नापास झालेली एक मुलगी तेथे मदतनीस म्हनुन काम करत होती.नेहमी जाण्यायेण्यामुळे ती मला ओळखत होती.सुर्य अस्ताला चालला होता.ते सुंदर दृष्य एकजण आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात टिपत होता.तेव्हा तिने मला विचारले ,`काका,हा सुर्य कुठे मावळतो ?`तेव्हा मी तिला सुर्य उगवणे म्हनज़े काय आणि मावळतो म्हनजे काय हे समजवण्याचा प्रयत्न केला.पण तिच्या डोक्यात काही ते शिरले नाही.सुर्य मावळतो म्हणजे तो एखाद्या गावाला मुक्कामाला जातो अशी तिची ठाम समजुत !!पुर्व ,पश्चिम ,दक्षिन ,उत्तर ह्या दिशा आहेत हे सुद्धा तिला माहीती नाही.अशी अवस्था मनपाच्या शाळांची असल्यावर आता मास्तरांनी मुलांना शिकवायचे कि त्यांचे केस भादरायचे ???बरे केसकर्तनकार शाळाशाळात फिरणार कि एखाद्या पुढार्याच्या नावाने मोठे केशकर्तनगृह उभारुन मास्तर मास्तरीण मुलांना तेथे नेणार ??? मनपातील विरोधी पक्ष याला कुठे विरोध करणार की नेहमीसारखे `मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर ` ही भुमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काहीही केले तरी मुलांच्या भादरलेल्या केसांवर नगरसेवक गब्बर होणार आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार हे निश्चित !!

Tuesday, February 16, 2010

रस्त्यावरचा संसार आणि गारठलेली मने

काल रात्रीचा अनुभव....वेळ साडे नऊ पावने दहाची...स्थळ गंगापुर रोडकडुन माई लेले श्रवन विद्यालयाकडे जाणार रस्ता....
पेठ सुरगाना भागातुन रोजगारासाठी आलेली आदिवासी कुटुंबे.रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तिथे मांडलेला संसार.तीन दगडांच्या चुलीची धगधग नुकतीच थांबलेली होती.महिला वर्ग भांडीकुंडी आवरन्यात मग्न होता,तर पुरुष मंडळी शेकोटी पेटवुन बसले होते.त्यांना पाहुन मनात विचार आला आपण दारे खिडक्या बंद करुन आणि उबदार कपडे पांघरुन झोपतो तरि सुद्धा थंडीच्या नावाने बोटे मोडतो.हे लोक उघडयावर झोपतात,त्यांचे कसे होत असेल ?विचार करतच पुढे चाललो होतो. शेकोटीपासुन पाच दहा पावलाच्या अंतरावर एक जण एकटाच विडी फुंकत बसला होता.मी त्याला सहज प्रश्न केला `काय राव ,तुम्हाला नाही का थंडी वाजत?` विडीचा झुरका सोडत राव बोलु लागले ,`आमचं काय विचारता साहेब ,ऊन ,वारा,थंडी,पाऊस आम्हाला सगळं सारखंच आहे.लहानपणापासुन आम्हा सगळ्यांना याची सवय असते.शेकोटी म्हनजे आम्हाला एकत्र बसन्यासाठी केवळ निमित्त आहे.आम्हाला कुनालाही थंडी वाजत नाही आणि थंडीमुळे आमच्यातला कुनी आजारीही पडत नाही.थडी फक्त या मोठमोठाल्या इमारतीमध्ये राहनार्यांनाच लागते.या थंडीमुळे ते आजारीच पडतात असे नाही तर थंडीमुळे त्यांची मनेसुद्धा गोठुन जातात...`. राव अजुन बरेच काही बोलायला लागले होते,परंतु हा `गावठीचा` अंमल असेल ,उगीच वांदा नको म्हणुन मी पुढे चालु निघुन गेलो. अर्ध्या पाऊन तासानंतर पुन्हा त्याच रस्त्याने मी परत येत होतो.मधल्या काळात बिगरमोसमी पावसाने आपली हलकीशी हजेरी लावली होती.रस्ता ओला झालेला होता.उतारावरुन पाणी वाहात होते.परत जाताना ते `गावठी`वाले राव मला मर्क्युरीच्या प्रकाशामुळे लांबवरुन दिसत होते.त्याची थोडी मजा घ्यावी असा माझ्या मनात विचार आला. ती आदिवासी कुटुंबे धावपळ करीत होती.अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली होती.काही सामान झाकल्यामुळे भिजन्यापासुन वाचले होते तर सामान झाकन्याच्या प्रयत्नात ते आदिवासी भिजले होते.तशाच अवस्थेत ते आपला संसार जैसे थे करन्यात गुंतले होते.ज्यांचे सामान व्यवस्थीत लावले गेले होते ते इतरांना मदत करत होते.मात्र `गावठी`वाले राव रस्त्यावरुन त्यांना सुचना देत होते.जवळ जाऊन मी प्रश्न विचारला,`काय राव पावसामुळे ओले झाले वाटतं ?` माझ्या लहानशा प्रश्नाला रावांनी ताडकन उत्तर दिले,` साहेब,आम्ही नेहमीच ओलेचिंब असतो,तुम्ही कोणालाही हात लावा तो ओलाचिंब सापडेल.समोर पहा तो शिवा,त्याचे सामान लावुन तो दुसर्याला मदत करतो आहे .असा आमचा ओलावा असतो.हा आमचा ओलाव्याचा पाझर कधीच आटत नाही.नाहीतर तुमच्या सारखे सुशिक्षित लोक अशा वेळेस फक्त गंमत पहात राहीले असते,कोरडया पाषानासारखे.` रावांनी माझ्याकडे मोहरा वळवल्यामुळे क्षणभर माझी मतीच कुंठीत झाली.मस्करी करन्याच्या उद्देशाने गेलेलो मी निरुत्तर झालो होतो.आणखी काही ऐकण्याची माझी हिंमत नव्हती म्हनुन मी गुपचुप चालु लागलो. मात्र माझ्या लहान प्रश्नांनी मला भरपुर काही शिकवले होते. रात्रभर मी अंतर्मुख होऊन विचार करत होतो.शहरातील बाबुंसाठी इमारती बांधनार्या या आदिवासी बांधवांची त्या इमारतीमध्ये राहानार्याबद्दल अशी मानसिकता का व्हावी ?? माझ्या गोठलेल्या मनाला ऊब देऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न मी अजुन करतो आहे.

Wednesday, November 4, 2009

जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका.
नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे.या गुंडांची कार्यपध्दतही जगावेगळी आहे.जनतेमध्ये भय पसरवण्यासाठी हे गुंड मोटारसायकल जाळन्यासारखे संतापजनक प्रकार करत आहेत.विधानसभा निवडनुकीच्या काही आठवडे आधी सिडको य उपनगरात एकाच रात्री ४० मोटरसायकल्स जाळन्याचा प्रकार घडला होता.त्या प्रकरणात राज ठाकरे यांच्या पक्षाचा पदाधिकारी सुहास कांदे व रिपाई च्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा प्रमुख संशयीत होते .पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईची कुर्हाड उगारताच सरकारने पोलिस आयुक्तांची चक्क बदलीची ऑर्डर पाठवुन दिली.यावरुन नाशिकच्या जनतेला कळुन चुकले कि या गुंडाच्या पाठीमागे कोणाचे बळ आहे.मात्र या गुंडाच्या त्रासाला व त्याच्या पोशिंद्याना कंटाळलेली जनता पोलिस आयुक्तांच्या बदली विरोधात अभुतपुर्वपणे आणि स्वयंस्फुर्तीने रस्तावर ऊतरली. पोलिस अधिकार्याची बदली रद्द व्हावी यासाठी जनता रस्त्यावर येन्याचा संपुर्णॅ भारतात हा पहिलाच प्रसंग असावा. जनतेच्या दबावापुढे झुकुन त्यावेळस पोलिस आयुक्तांची बदली रद्द करन्याची नामुश्की सरकारवर आली होती.मात्र येनारी विधानसभा निवडनुक निर्विघ्नपने पार पडावी म्हनुन सरकारातील चाणाक्ष मंत्र्यांनी दोन पाउल मागे येणे पसंत केले.पोलिसांनी ही संधी मानुन शहरातील गुंडगिरी मोडुन काढन्याचा विडा ऊचलला .या मोहीमेत कुख्यात गुंड कातारीचा एन्काऊन्टर करन्यात आला तर मोटारसायकल जळीत प्रकरनातील आरोपींना तडीपार करन्यात आले.मात्र आरोपीनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवुन आणि जामिन मिळवुन पोलिसांविरुद्धची पहिली लढाई जिंकली.मोटारसायकल जळीत प्रकरनातील प्रमुख आरोपी असलेल्या सुहास कांदेने तर यावरही कडी करत नांदगाव विधानसभा मतदार संघातुन छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळांविरोधात ऊमेदवारी अर्ज भरुन दंड थोपटले.मात्र प्रत्यक्ष निवडणुक लढन्यापेक्षा भुजबळांशी यशस्वी तह केल्याची चर्चा जनतेत आहे .तेव्हाच खरे तर नाशिकच्या जनतेला आपल्या भविष्यातील संकटाची जाणीव झाली होती. कालच्या सातपुर येथील मोटारसायकल जळीत प्रकरनाने पुन्हा एकदा नाशिकच्या जनतेला जीव मुठीत घालुन जगावे लागनार आहे.मात्र या गुंडानी व त्यांच्या पोशिंद्यांनी हे ही लक्षात ठेवावी की नाशिकची जनता जितकी सहनशिल आहे तितकीच प्रखरतेने ती अन्याया विरोधात पेटुनही ऊठते.पोलिस आयुक्तांच्या बदली प्रकरणात याची चुनुक सगळयांनी अनुभवली आहे.त्यामुळे या गुंडानीं वेळीच आपली शेपुट गुंढाळावी नाहीतर नाशिककर यांना आसमान दाखवल्यशिवाय राहनार नाही.पोलिसांवर कोणी नेता दबाव आणत आहे असे जर जनतेच्या लक्षात आले जनता स्वताच कायदा हातात घेऊन या गुंडांचा आक्कु यादव केल्याशिवाय राहनार नाही .कारण ही भुमी रावणाचा वध करनार्या प्रभु रामचन्द्राची आहे .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...