Tuesday, September 24, 2013

खंडणीखोर बनवणारी शिक्षणपद्धती

                                    आजच्या म.टा.मध्ये खंडणीखोर शिक्षकाची बातमी वाचनात आली.बेरोजगारीमुळे कमावण्यासाठी त्याने खंडणीखोरीचा सोपा मार्ग शोधला होता .संबंधित शिक्षकाला अटक झाली असून कायद्यानुसार पुढील कारवाई होईलही.परंतु त्याच्यावर अशी वेळ का आली याचा कोणी विचार करणार आहे कि नाही ? सगळाच दोष  त्याच्यावर किंवा शासनावर देण्यापेक्षा समाजानेही विचार करण्याची वेळ आली आहे .मुळात सगळ्यात जास्त दोष कुणाला दिला पाहिजे तर तो आपल्या चुकीच्या शिक्षण पद्धतीला व ती राबवणाऱ्या यंत्रणेला .हाताला काम मिळेल असे  व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यापेक्षा आपण अजूनही वास्को -द -गामा च्या पराक्रमाच्या कथा चघळत बसतो.इतिहासाची जाणीव विध्यार्थ्यांना झालीच पाहिजे .त्यातून नवीन काही घडवण्याची प्रेरणा मिळते याबद्दल दुमत नाही .पण ते पोट भरण्यासाठी उपयोगी नाही हे ही तितकेच सत्य आहे .आज सभोवतालच्या जगात काय चालले आहे किंवा उद्या आपल्याला जगण्यासाठी आज काय केले पाहिजे हे आपली शिक्षण पद्धती शिकवत नाही .
                                      शासनानेही `अंदाधुंदपणे`निरुपयोगी अभ्यासक्रमांना व ते शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांना परवानग्या देऊन `बेरोजगार`तयार करण्याचे कारखानेच काढले आहेत .पुढार्यांच्या सोयीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी असे कारखाने निघालेत पण त्यातून तयार झालेली बेरोजगारांची फौज दिशाहीन झाली आहे. .हातात डिग्रीचे चिटोरे आले पण त्याला साजेशी नोकरी नाही .दुसरी कुठली मिळाली तर त्यात कमीपणा वाटतो.नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाही .घरात ,समाजात हेटाळणी होते.मग अशी मुले वाममार्गाला जातात.त्यामुळेच अशा खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिकली सवरलेली मुले दिसू लागली आहेत .यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही .परंतु अशा घटनांचे समर्थनही करता येणार नाही.आई जेऊ घालीना आणि बाप भिक मागू देत नाही अशी अवस्था या बेरोजगारांची झाली आहे .समाजाने आता पुढे येउन अशा बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
                                               भारताला महासत्ता बनवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावू पाहणारी ही `उर्जा `अशी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकून वाया जाऊ नये यासाठी शासनेही बेरोजगारांकडे केवळ मतपेटी म्हणून न पाहता हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे .नाहीतर देशातील तुरुंग `पदवीधर `गुन्हेगारांनी भरलेले पाहण्याचे दुर्दैव आपल्या नशिबी असेल .

Thursday, September 19, 2013

पुढच्या वर्षी लवकर ये पण तेवढ लक्षात ठेव.

                                              बाप्पा ,तुला काल मोठया आनंदाने आणि उत्साहाने निरोप दिला खरा ,पण आज भलतेच कंटाळवाणे वाटते आहे रे .घर नुसते रिकामे रिकामे वाटते आहे. काल तू म्हटलास खरा पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणून ,पण वर्षभर वाट पाहणे म्हणजे आमची परीक्षाच आहे रे बाबा .मी तर आत्ताच `काउंट डाउन`सुरु केले आहे .
                                                एक मात्र बर झाल.तुझ्यामुळे दहा दिवस भरपेट मोदक खाऊन शरीरातला गोडवा आणखी वाढवता आला.सारखं सारखं डायबेटीसची भीती दाखवणाऱ्या बायकोला चोरून मोदक खाण्याची मजा काही औरच होती.आता थेट पुढच्याच वर्षी मोदक खायला मिळणार म्हणून मन जरा खट्टू होत रे . 

                  बाप्पा दहा दिवस कसे गेले काही कळलेच नाही.सकाळी सकाळी तुझ्या आरतीसाठी धावपळ उडायची .कुणी दुर्वा आणायला पळायचं तर कुणी फुलं .सगळं वातावरण कस मंगलमय असायचं.तुला सुखकर्ता दुखहर्ता का म्हणतात हे या दहा दिवसात कळले बर का .तू आल्यापासून जाईपर्यंत बायको चक्क शब्दानेसुद्धा भांडली नाही .`पप्पा ,तुम्हाला  काही कळत नाही हो `हे वाक्य दहा दिवसात कानावर आलं नाही .घरात असे गुण्यागोविन्दाचे वातावरण असताना बाहेरसुद्धा शान्तता आणि सुव्यवस्था नांदत होती .तुझे सगळ्यात जास्त कोणी आभार मानत असेल तर ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.आबा हेच .लालबागच्या राजाचे दोनचार प्रसंग वगळता सगळीकडे आलबेल होत .मिडीयाला चघळायला काहीतरी खाद्य हवे म्हणून लालबागचे प्रकरण तूच घडविले अशी भाविकात चर्चा होती .
                    बाप्पा ,ते आसारामबापूवाले मदतीला आला नाहीस म्हणून तुला शिव्या देत होते बर का .माझे नाव नको सांगूस ,पण काही लोक  तुझ्या नावाने डबल मोदक वाटत होते बर का .म्हणे तू दाभोलकरांना संपविले .भलतंच काहीतरी .पण तू भलताच भारी बर का ,तुझ्या त्या लाडक्या भक्ताला ,जयवंत साळगावकरांना बरोबर प्रोमोशन देऊन तुझ्या दरबारात हजर करून घेतले .
                बाप्पा ,तुझ्या अशाच करामती चालू ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा.आणि येण्याच्या आधी यंदा जसा भरपूर पाऊस पाडला तसा जोरदार बरसू दे मगच ये .ते पेट्रोल ,डीझेलच तेवढे पहा .जरा भाव कमी करता आलेत तर आवडेल आम्हाला .महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारी यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस .

                 बाप्पा ,तू त्या उंदीर मामाला ,सॉरी बाप्पा ,तुझ्या त्या मूषक`राज`ला रागावत का नाहीस रे .तुला माहित नसेल कदाचित त्याने आमच्या नाशिकच्या विकासाची `ब्ल्यू प्रिंट `लपवून ठेवली आहे .त्याने ती कुरतडण्याच्या आत पुढच्या वर्षी घेऊन ये रे बाप्पा .नाहीतर `पब्लिक `कोणाला कुरतडेल हे तुला सांगायला नको .
         बाप्पा ,एक विचारायचंच राहील .तुझ्या दरबारात एखादा चांगला मास्तर आहे का रे .अरे त्या राहुल बाळाला गरिबीची व्याख्या शिकवायची आहे रे.पहा ,असेल तर दे पाठवून त्याला.आणि पुढच्या वर्षी येण्या आधी एक काम जरूर कर.काही अवघड नाही रे तुला .त्या मुक्या मनमोहनला दे ना एक धक्का.पार वाट लावली रे त्याने देशाची.बरोबर आहे तुझ ,तो त्याच्या कर्मानेच जाईल ,पण आमचा एक शिक्का आणि तुझा धक्का उरलेलं काम सोप करेल .नरेंद्र मोदींनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहेच .दे ना एक संधी त्यांना .भला माणूस वाटतो .पाहू या गुजरातची विकासगंगा देशभर पोहचवतात का ते .संधी तर देऊन पहा ,पुढचे पाहू पुढे ,वाजपेयी बनतात कि येडीयुरप्पा !!
      बाप्पा ,अजून भरपूर काही सांगण्यासारखे आहे .पण तुलाही किती संकटात टाकाव .आता एवढेच पुरे.पुढच्या वर्षी लवकर ये .आणि ते मोदींचे तेवढे लक्षात ठेव .

Friday, August 30, 2013

शेतकऱ्याच मनोगत

                                           मित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा शेतकरी असल्यामुळे मला कुठेतरी ते भावलं .हे मनोगत फक्त फेसबुकच्या कट्ट्या पुरताच मर्यादित न राहता ते सगळ्यांपर्यंत पोहोचाव या उद्देशान खाली जसेच्या तसे देत आहे.त्या आधी शेतकऱ्याच मनोगत अतिशय समर्पक शब्दात मांडणार्या `त्या `अज्ञात लेखकाचे आभार मानणे योग्य होईल .
होय आमच्या मुलांनाही मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहावेसे
वाटतात .... पाण्यासारखे पेट्रोल/डीझेल उधळणाऱ्या एसयूव्ही कार
बाईक उडवाव्या वाटतात .... त्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर व्हावेसे
वाटते. उच्चभ्रू राहणीमानाचे माजोरी दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक
शहरी गोष्टीचे त्यांनाही आकर्षण आहे. अशी स्वप्ने पाहणे
गुन्हा आहे काय ? टाटा,
अंबानी यांच्या उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था खरेदी करता येईल
इतकी संपत्ती कमवावी आणि आमची दहा पंधरा एकराची शेतजमीनही
हिसकावून घ्यावी आणि एमआयडीसी च्या यमाने तृप्तीचा ढेकर
द्यावा. आमची अंत:करणे जळत नाहीत का ? बाईक , कार, बस,
रिक्षा तर सोडाच साधे पायी चालत शाळेला जावे असे
रस्तेही आमच्या लेकरा बाळांना मिळत नाहीत.
आमच्या अडलेल्या लेकीसुनांची खड्ड्यातच सुटका होते
याचा अपमान आम्हाला वाटत नाही नसेल का ?
जरा सर्दी खोकला झाला कि सुपर स्पेशालिटीत दाखल
होणाराना महागडी औषधे कधी कडू लागत नाहीत.... मात्र कांदा कडू
लागतो. पेट्रोल/डीझेल कितीही महागले तरी ब्र नसतो...
भाजीपाला स्वस्त पाहिजे... तुमच्या एक वेळच्या शावर आंघोळीत
आमच्या कांद्याचे दोन वाफे भिजू शकले असते. ऐन उन्हाळ्यात
शेतीचे पाणी रोखून शहराला पाणी पुरवले गेले
तेव्हा किती जणांनी आपले शावर बंद केले .... उन्हाळ्यात एक
रात्री कुलर पन्नास लिटर पाणी फस्त करते..... तेवढ्यात ठीबकवर
मोसंबीची चार झाडे जगू शकली असती.. किती जणांनी कुलर वापरणे
थांबवले.... एक एसी तीन एचपी पावर ओढतो... तेवढ्यात
एका शेतकऱ्याचे शेत भिजवता येते .... झाला का एसीचा वापर
बंद ? .... शेतीला मिळणारी वीज इकडे वळवल्यामुळे चाळीस
वर्षापूर्वीची तेलावर चालणारी इंजिने खेड्यात टूकटूक करताना दिसत
आहेत...कारण सोळा सोळा तास वीजच नसते...! का नाही होणार
शेतमाल महाग ... ? खेड्यात वीजच नसते तर कुठला टीव्ही अन
संगणक ? पंखा, कुलर तर विचारातच घ्यायचे नाही ..!
का आम्ही सावत्र आईची लेकरे आहोत ? दिवाळीत शहरे
विषारी दारूच्या धुराने ओसंडून वाहतात
आणि आमच्या पोरांना साध्या टिकल्या उडवत बसावे लागते... काय
त्यांनी शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतल्याचे पाप केले म्हणून ?
त्यांना नाही वाटत कानाचे पडदे फाडणारे फटाके फोडावेत
म्हणून...? शेतकऱ्यांच्या किडन्या फेल होत नाहीत ?
त्यांना हृद्यविकाराचे झटके येत नाहीत ? सरकारी इस्पितळात
डुकरासारखे भरती होताना त्यांना अपमान वाटत नाही ? कुठून
येतील महागड्या उपचारासाठी पैसे ? तुमच्या कुत्र्यांना मिळतात
तसले वैद्यकीय उपचार शेतकऱ्यांच्या गाई,
बैलाला सोडा या माणसांनाही मिळू नयेत ? कुठून येईल हा पैसा ?
उन्हाळ्यात तुम्ही आठ दहा दिवस सकुटुंब सहलीला जाऊन लाखभर
रुपये खर्च करून यावेत... आणि त्यांनी फक्त वारीत पायपीट करून
पर्यटनाचा आनंद मानावा ? एक दिवसाची सुटी टाकून
स्वातंत्र्यदिन विकेंडला जोडून चार दिवसांची मौज
मजा करणारांना माहित आहे
का कधी शेतकऱ्यांनी साजरा केलेला विकेंड ! त्यांचा स्वातंत्र्यदिन
बैलाबरोबर शेतात साजरा होतो..!
जर आम्हा येड्या मुक्याना काहीच स्वप्ने नसतात असे समजत
असाल तर एक दिवस शेतकऱ्यांची पोरे नक्षलवादी म्हणून
भरती व्हायला लागलेली दिसतील. स्वातंत्र्यदिना
च्या पूर्वसंध्येला कांदा हाच जीवनमरणाचा प्रश्न
झालेल्या मित्रांनो भानावर या .... ! भारत पाक क्रिकेट म्याच
असेल तर पाक कडून सीमेवर मारल्या गेलेल्या जवानांचे स्मरण
करायला आम्हाला फुरसत नसते..! हे आमचे देशप्रेम !... म्हणे जय
जवान ... जय किसान.

Thursday, August 22, 2013

हत्या ,खून , हौतात्म्य की बलिदान ,पण मृत्यू तो मृत्यूच !!!


                                                         अनिंसचे नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात भरदिवसा खून झाला. दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी हि बातमी मुख्य पानावर ठळकपणे दिली .त्याचदिवशी कालनिर्णयचे संस्थापक जयंत साळगावकर यांचेही निधन झाले .ती बातमीही दाभोलकरांच्या बातमी शेजारीच होती.वास्तविक दोघा घटनेत एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे दोघांचा जीव गेला होता .मात्र बातमी देताना एका घटनेत हत्या झाली ,खून झाला अशी वाक्यरचना तर दुसर्या घटनेत निवर्तले ,कालवश झाले,निधन झाले अशी वाक्यरचना होती.म्हणजेच जीव गेला ,मृत्यू  झाला हीच घटना किती विविध प्रकारे वृत्तपत्रातून दिली जाते याचे हे उत्तम उदाहरण एकाच दिवशी एकाच पानावर पाहायला मिळाले .अर्थात हे सगळ मृत्यू कशामुळे झाला याच्यावर अवलंबून असते.
      खर तर मृत्यू हा प्रत्येक सजीवाला अटळ आहे.आयुष्यातले सगळ्यात मोठे नुकसान जर कोणते असेल तर ते मृत्यू हे होय .मृत्यूची बातमी देताना मृत्यू कशामुळे झाला यानुसार शब्दरचना बदलत जाते.सीमेवर युद्ध करताना मृत्यू झाल्यास `हुतात्मा झाला `अशी बातमी दिली जाते.याशिवाय `कामास आले`,वीरमरण आले अशीही बातमी दिली जाते .शत्रूचा मृत्यू झाला तर `त्याच्या नरडीचा घोट घेतला ,त्याला यमसदनी पाठवले ,त्यांची मुंडकी उडवली असेही म्हटले जाते.सध्या गुजरातमधील पोलिसांचे प्रकरणही गाजत आहे .पोलिस चकमकीत मृत्यू झाला म्हणून त्याचा `एनकौंटर` केला ,त्याचा गेम केला अशा बातम्या यायच्या.मुंबई पोलिसांच्या चकमकीच्या बातम्या तर मोठ्या रंजक राहायच्या .अमुक टोळीच्या गुंडांचा पोलिसांनी खात्मा केला ,त्याला कंठस्नान घातले , त्याचा मुडदा पाडला ,त्याला नरकात पाठविले अशा चटपटीत बातम्या छापून यायच्या. पण आता ते `एनकौंटर` फेम पोलिसच आरोपीच्या पिंजर्यात अडकल्यामुळे गुंडांना फक्त `कोपरापासून ढोपरापर्यंत `सोलण्याचेच काम चालू आहे . 
            वृद्धापकाळाने,आजारपणात  निधन झाले तर कालवश झाले ,निवर्तले ,निधन झाले ,यांना देवाज्ञा झाली ,वैकुंठवाशी झाले ,प्राणोत्क्रमण झाले ,काळाच्या पडद्याआड गेले,देहावसान झाले ,देहत्याग केला ,महानिर्वाण झाले ,प्राणज्योत मालवली स्वर्गात गेले  अशा विविध प्रकारे बातमी दिली जाते.
 एखाद्या दुर्घटनेत जीव गेला तर ठार झाले ,बळी गेले असे संबोधले जाते .दुसर्याच्या हातून मरण आले तर खून झाला व स्वत:च जीव घेतला तर आत्महत्या केली असे म्हटले जाते.न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्याला जगणे नाकारले जाते तेव्हा त्याला मृत्यूदंड दिला जातो ,त्याला फाशी दिले असे म्हटले जाते.सरकारी यंत्रणेने त्याचा खून केला असे कधी म्हटले जात नाही. एकाद्या हत्येला वध केला असेही संबोधले जाते.
          सर्व घटनांमध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा जीव गेलेला असतो.पण स्थळ काळ वेळ परत्वे त्याच्या जीव जाण्याच्या बातमीचे शब्द बदलत राहतात .
 

Friday, July 26, 2013

गयबान्याच्या लग्नाचा आहेर

आयका मंडळी    ,नवरदेवनी मायकडतीन ..........
 ओ ओ महाराज ,नवरदेवनी मायन नाव घ्या ,पाव्हणी मंडळीले कळाले पाहिजे ........
बर बर .......
आयका मंडळी    ,नवरदेवनी माय सोन्याबाई इटलीकर यास्नाकडतीन तुमले सगळास्ले महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारीना आहेर शे .......
ओ ओ महाराज ,  शाटकट नका मारू हो ,सगळा बारीक सारीक आहेर कळू द्या मंडळीले ......
मंडळी ,सगळी यादी वाची दाखाडी ते मना मांगे शी बी आय चौकशी लागी जाई .......बर वाची दाखाडस......तर सोन्याबाई कडतीन महागाई ,बेरोजगारी बरोबर पेट्रोल दरवाढ ,२ जी घोटाळा ,कोळसा घोटाळा ..........बा बा बा बा ...घोटालास्नी मोठी यादी शे हो .........माले नाही परवडणार वाचले ..............
ओ महाराज ,काही वाचू नका पुढली यादी ........मनी पोरना माले आत्ते फोन वनथा ........म्हणे , येळ वनी ते त्या गुजरात ना ब्रम्हचारी संगे लगन करसु पण त्या गयबान्या संगे मनभी  वाटोळ व्हऊ देणार नही आणि देशनभी  !!!

Sunday, June 2, 2013

पार्टी जरा मालदार हवी !!!

                                       कोणता माणूस कधी भेटेल आणि आपलं टाळकं सटकवेल याचा नेम नाही .मला तर अनेक लोक भेटत असतात .पण प्रत्येकाशी वागताना बोलताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हाच माझा पवित्रा असतो.पण कधी कधी इच्छा नसताना तोंडातली साखर कडू करावी लागते.                                             

                              काल असेच झाले.सकाळी झोपेत असतानाच मोबाईल खणखणला.अगदी सकाळी फोन आल्यामुळे मी घाबरलो होतो .नंबर अनोळखी होता .तसाच उचलल्यावर पलीकडून चौकशी सुरु झाली .`झोप झाली का हेमंत दादा ? अरे मी पाटील काका बोलतो .`असे सांगून फोन करणार्याने त्याची  अजून माहिती दिली .फार फार लांबच्या नात्यातली ओळख पटली .उभ्या आयुष्यात त्यांना कधी भेटलो  नाही ,पाहीले नाही .मी ओळख पटल्याचा होकार दिला तशी त्यांनी अजून माहिती द्यायला सुरुवात केली.`अरे आपल्या दादू चे यंदा लग्न करायचे आहे ,एखादी मुलगी पाहून टाक ना !` मी थोडी चौकशी केली तर दादू एम.फार्म.करून परराज्यात चांगल्या पगारावर नोकरी करत होता.मग मी त्यांना त्यांच्या अपेक्षा विचारल्या .`हे पहा हेमंत दादा ,आपल्याला मुलीला काही नोकरीला लावायचे नाही.मुलगी बी.ए.,बी .कॉम. असली तरी चालेल.दिसायला सर्वसाधारण असली तरी चालेल .पण पार्टी जरा मालदार हवी ह !`पार्टी मालदार हवी म्हणजे नक्की काय व कशासाठी ?म्हणून मी पुन्हा चौकशी केली .त्यावर पाटील काका म्हटले,`अरे बाबा ,जरा मालदार पार्टी असली म्हणजे बर ,आपल्या दादूची हौस मौज होईल ,शिवाय पैशाटक्क्याची अडचण भासणार नाही.तू सांग तुटपुंज्या लोकांशी सोयरिक करण्यात काही मजा आहे का ? `.मी म्हटले `बर बर ,शोधू एखादी मालदार पार्टी दादुसाठी.`मग विचार आला हुंड्याची अपेक्षाही एकदा विचारून घ्यावी .`काही नाही दादा ,आपल्या फार अपेक्षा नाहीत .शेजारच्या सरांचा मुलगा डिप्लोमाच आहे .त्याला १२ लाख हुंडा मिळाला .आपला दादू  एम.फार्म.आहे ,त्याला २५ लाख तरी मिळायला हवेत.
                                      आता माझ टाळकं सटकल होत .अंगावरची गोधडी बाजूला फेकली आणि खाडकन उठून बसलो .लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून हुंडाबिंडा काही नको फक्त चांगली मुलगी हवी असे म्हणणाऱ्या जमान्यात २५ लाखाची अपेक्षा ठेवणाऱ्या महाभागाला त्याची जागा दाखवायलाच हवी असा विचार मनात आला.खाडकन उठून बसल्यामुळे बायकोही किचन मधून धावत आली आणि इशाऱ्यानेच काय झाले ?कोणाचा फोन आहे अशी विचारत होती .मी हि इशाऱ्यानेच तिला शेजारी बसायला लावले व फोनचा स्पीकर चालू केला .मी बोलता बोलता काकांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती जाणून घेतली.स्वत : सेवानिवृत्त शिक्षक .घसघशीत पेन्शन चालू.बायकोही शिक्षिका .सहाव्या वेतन आयोगाचा पगार चालू.दादुला भलेमोठे प्याकेज .एकंदरीत महिन्याला लाखाच्या पुढे उत्पन्न .तरीही हाव २५ लाखाची आणि पार्टी मालदार हवी !!
मी डोळे चोळतच काकांना सांगितले ,`काका ,एक पार्टी आहे आपल्याकडे .मुलीच्या बापाचे दोन चार कारखाने आहेत नाशिकमध्ये .२५ काय मी ४० लाख द्यायला सांगतो त्याला .`

                काकांच्या तोंडाला लगेच पाणी सुटले.`अरे वा छानच म्हणायचे  मग.आपल्याला अगदी अशीच पार्टी पाहिजे .हे आता सगळ तुझ्याच हातात आहे रे बाबा .तुझी मावशी तुझ फार नाव काढत होती .मला रोज सांगायची ,हेमंत दादाला फोन लावा फोन लावा .`मावशी काळी का गोरी आयुष्यात कधी पाहिली नाही .काकांच्या अपेक्षांना पालवी फुटायला लागली होती.
`सगळ्या गोष्टी मिळतील काका .दादूची चांगली हौस मौज होईल .पण तुम्हाला रोज एक काम करावे लागेल .`
`सांग ना दादा ,एक काय दहा काम करायला तयार आहे मी .`
                        माझ्या झोपेची पुरती वाट लागली होती पण सटकलेल टाळकं थोड जागेवर आल होत.बायकोला माझ्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे पुढे काहीतरी  बॉम्बगोळा पडणार हे तिला कळून चुकले होते. ती इशाऱ्यानेच सांगत होती `जाऊ द्या हो ,कशाला सकाळी सकाळी डोक लावता `
मी मात्र ठाम होतो .समाजातल्या अशा अपप्रवृत्तींना लगाम घालायलाच पाहिजे अशी माझी वृत्ती .त्यांना वठणीवर आणणे हाच माझा उद्देश .
मी पाटील काकांना म्हटले `काही नाही काका .तुम्ही फक्त रोज एकच काम करायचे .मुलीला रोज संध्याकाळी दारू प्यायला लागते तेवढी आणून द्यायची.`
खाडकन फोन आदळायचा आवाज आला आणि मी सैरभैर होऊन माझी गोधडी शोधू लागलो.
बायकोने केव्हाच तिची घडी करून ठेवून दिली होती .

Friday, May 31, 2013

बडबडी मावशी

बडबडी मावशी

                                                                                 आमच्या ओळखीच्या एक बाई आहेत.त्या येताना दिसल्या की रस्ता बदलून घ्यावा लागतो .भेटल्या म्हणजे त्यांची अखंड बडबड ऐकावी लागते.माझ्या बायकोने तर त्यांचे नाव बडबडी मावशी असेच ठेवले आहे.त्यांची बडबड ऐकताना आपल्याला `राहुल द्रविड `च्या भूमिकेत जावे लागते.कुठल्याही परिस्थितीत विकेट पडू देता कामा नये.केव्हा बाऊनसर  टाकतील याचा नेम नाही.त्यांना पडलेले काही प्रश्न आणि त्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे ते वाचा .                                     त्यांच्या ओळखीतल्या एक नववधू हनिमूनला जाणार होते.सात आठ दिवसाचा त्यांचा दौरा होता .बडबडी मावशीला वाटले ,इतके दिवस चालले म्हणजे हनिमून नावाचे गाव फार लांब असेल.म्हणून त्यांनी माझ्याकडे चौकशी केली .हनिमून मुंबईपेक्षा लांब आहे का ?हनिमूनला जायला इतके दिवस लागतात का ?तिथे काय काय आहे पाहण्यासारखे ? आम्ही उत्तर देण्याची जबाबदारी आमच्या शेजारच्या बाईवर सोडली आणि स्वत:ची सुटका करून घेतली.
 त्यांचे काही प्रश्न व त्यांनी दिलेली माहिती पहा.
(१) महिना संपायच्या वेळेसच मंथ एंड का सुरु होतो ?
(२) मॉर्निंग वाल्क सकाळीच का करतात ?
(३)आमच्या नातातल्या मुलीने लव्ह म्यारेज केले आणि आता लग्न करणार आहे .
 (४)तुझ्या काकांचे पैसे संपले की आमचा मनी प्रॉब्लेम सुरु होतो .
(५)एकदा माझी तब्बेत बिघडली तेव्हा माझा बी.पी. एकदम कमी झाला आणि ब्लड प्रेशर अचानक वाढला होता.
(६)मी रांगोळी काढताना वेगवेगळ्या रंगाचे कलर वापरते.
(७)थियेटर चा मालक आमच्या ओळखीचा होता म्हणून स्वस्ताचे तिकीट द्यायचा पण पहिल्याच रांगेत बसवायचा .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...