Wednesday, February 10, 2016

शेवटची पिचकारी

त्याने पचकन मारलेली पिचकारी माझ्या पायावर पडली नाही हे नशीब. त्रिमूर्ती चौकात पार्किग करण्यासाठी ACTIVA हळू करून पाय जमिनीवर टेकायला आणि त्याने पचकन पिचकारी मारायला एकच वेळ झाली .पाय भरला नाही म्हणून मला जरा हायसं वाटल पण त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि गाडीवरून उतरलो .माझ्या नजरेची भाषा कळली म्हणून त्याने लगेच मला विचारलं ,पायावर नाही ना पडले सर ,सॉरी बर का .त्याच्या सॉरी म्हणण्यात मला वेगळीच अदब वाटली म्हणून मी त्याला जरा निरखून पाहिले.कडक इस्तरी केलेला स्वच्छ खाकीचे कपडे घातलेला रुबाबदार गडी हाताची घडी करून त्याच्या रिक्षाला पाठ टेकून उभा होता.कपाळावरचा भगवा टीळा आणि थोडी वाढलेली दाढी त्याचा रुबाब अजून खुलवत होते. रिक्षावाला होता पण त्याच व्यक्तिमत्व प्रसन्न वाटत होत. पण जिथे उभा होता तिथे आजूबाजूला पचापच थुंकून ठेवले होते .जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटले , माझा पाय नाही भरला पण तुम्हालाच इथे उभे राहावे लागते ना ,मग थुंकून इतकी घाण का केलीस ? थोडी मान खाली घालून तो बोलला  ,काय करणार सर ,तंबाखूची सवय जातच नाही .मी त्याला विचारले ,आर आर आबा माहित होते का ? तो म्हटला `हो`.कशाने गेले माहित आहे का ? तेही त्याला माहित होते. मग तुमची तंबाखू कशी सुटत नाही असे विचारले तर बोलला ,खूप प्रयत्न केलेत साहेब पण नाही सुटत .मी विचारले ,अशी कशी सुटत नाही .मुलबाळ आहेत का ? दोन लहान कच्चेबच्चे असल्याचे  समजले . म्हटलं ,घे त्या मुलांची शपथ ,आजपासून तंबाखू खाणार नाही. आणि त्याने खरच शपथ घेतली .त्याला अजून पक्क कराव म्हणून खिशातली पुडी काढून हातावर घ्यायला सांगितली आणि म्हटले,यापुढे अशी तंबाखू  हातावर घेतली की त्यात तुला तुझे मुले आणि आर आर आबा दिसले पाहिजेत. माझ काम करून मी तिथून निघून गेलो .
                             एम.ए.,बी .एड. करून दहा लाख रुपये संस्थाचालकाला अर्पण करून काही दिवस मास्तरकी केलेला हा रिक्षावाला आज पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी भेटला आणि म्हणाला ,thank you  सर ,त्या दिवसापासून तंबाखूला हात नाही लावला .दहा लाखातली एक दमडी मला परत मिळाली नाही पण तुम्ही मला नवीन जीवन दिले .बोलताना त्याच्या आणि माझ्या डोळ्यांच्या कडा केव्हा ओल्या झाल्या ते कळलेही नाही
-

- हेमंत पगार ,
मराठा शुभ लग्न डॉट कॉम ,नाशिक 

No comments:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...