Friday, December 13, 2013

`फिट है ना बॉस `

अभिनेता अक्षयकुमारने काल बेदम मार खाल्ला.`फिट है ना बॉस `म्हणत हिरोगिरी करणारा अक्षय आज कान धरून उठाबशा काढत होता.त्याचे असे झाले ,काल आमच्या आर्या दीदीच्या शाळेत पालक मेळावा होता.सगळे पालक आपापले चपला बूट वर्गाबाहेर काढून वर्गशिक्षकांशी हितगुज करत होते.एवढ्यात आर्याला कसलीतरी चाहूल लागली.पाहते तर काय ,अक्षयकुमार हवेत गिरक्या घेत स्कूल बसच्या टपावरून उडया मारत डायरेक्ट दुसर्या मजल्यावरच्या आर्याच्या वर्गाबाहेर ! आर्या थोडावेळ पाहतच होती हा काय करतो ते.त्या भामट्या अक्षयने अंगातला `फिट है ना बॉस `चा बनियन काढला त्याची झोळी केली आणि भरल्या ना पटापट चपला बूट  त्या झोळीत !सगळ्या पालकांमध्ये एकदम घाबरगुंडी उडाली .कोणीच काही बोलेना. मग आर्यादिदीच पुढे आली आणि घेतली ना गिरकी हवेत.दाणकन लाथ अक्षयच्या छाताडावर .अक्षय गपगार .मग काढल्या उठाबशा .
         पहाटे शाळेत सोडायला जाताना आर्याने रात्री पडलेले स्वप्न सांगितले आणि वरून मला विचारले  `फिट है ना बॉस `.

Saturday, November 30, 2013

ज्याच्या आयुष्यात असेल `पगार `त्याचे आयुष्य हिरवेगार !

                             आमच्या `पगार `आडनावाशी संबंध आला नाही अशी व्यक्ती जगात सापडणे केवळ अशक्य !प्रत्येक घरातील आर्थिक वातावरण `पगार `झाल्याबरोबर बदलते .महिना अखेर जसजसा जवळ येतो तसतशी आमच्या आडनावाची घराघरात बोंबाबोंब सुरु होते.कामावरून नवरा घरात आला की बायकोची काहीतरी कुरकुर सुरु होते आणि मग नवरा खवळतो ,`अग थांब न थोडस ,महिना अखेर आहे तुला कळत नाही का ?एकदा `पगार `होऊ दे मग घे तुला हव ते . आमच्या नसण्यामुळे नवरा बायकोमध्ये असे हे वितुष्ट ! म्हणजे पहा प्रत्येक घरात `पगार `किती महत्वाचा घटक आहे.मंडळी तुम्हाला सुद्धा हे मान्य करावे लागेल बर का !!
         तर असे हे `पगार `पुराण सांगायचे  कारण म्हणजे फोनवरून जेव्हा मी एखाद्याला माझे नाव सांगतो ना तेव्हा फार घोटाळे होतात .अनेकदा पलीकडच्याला `मी हेमंत पगार बोलतोय `असे सांगितले तरी त्याला कळत नाही .मग काही मिनिटे आमच्यातला संवाद पुढीलप्रमाणे रंगत जातो .
                             मी -अहो मी हेमंत पगार बोलतोय .
पलीकडची व्यक्ती-अच्छा अच्छा हेमंत पवार बोलताय होय .   
                  मी -नाही हो ,हेमंत पगार ..............प ....गा.....र ...
प.व्यक्ती -बर बर  पगारे  का ...
अशा प्रकारे पगार आडनावाची अधिक मोडतोड होऊ देण्यापेक्षा मीच समोरच्यांना थांबायला सांगतो आणि पुन्हा संवाद रंगतो तो असा ,
 मी -तुम्ही कधी नोकरी केली आहे का ?`
प. व्यक्ती -होय तर मी सरकारी  नोकरीत आहे .
मी -मग सरकार त्याबदल्यात काही देते का तुम्हाला ?
प.व्यक्ती -अहो असे कसे विचारता तुम्ही ? सरकार आम्हाला पगार नाही का देत .
मी-  काय देते  ? काय देते सरकार तुम्हाला ?
प.व्यक्ती -अहो पगार देते पगार .
मी -अहो तोच मग मी हेमंत पगार . आले का लक्षात आता ?
पलीकडचा क्षणभर विचार करतो आणि कळल्यावर पोटभर हसत सुटतो .
                                                 रोज कुठेना कुठे आमच्या आडनावाचा उद्धार होत असतो .वर्तमानपत्रांच्या आठ दहा पानांमध्ये आमचे आडनाव नाही असा एकही दिवस नसतो .कुठे `पगार` वाढ होण्यासाठी आंदोलन तर कुठे `पगार `वेळेवर होत नाही म्हणून आंदोलन .वर्षातून फक्त एकदाच आमचे महत्व थोडेसे कमी होते ते दिवाळीला .तेव्हा आमचा `बोनस `नावाचा सावत्र भाऊ घराघरात घुसलेला असतो.जिकडे तिकडे एकच चर्चा ,बोनस मिळणार आहे का ? बोनस मिळाला का ? बोनस बोनस बोनस !!!पण सावत्र तो सावत्रच ! त्यालाही आमच्याशिवाय काही महत्व नाही .बोनस द्यायचा म्हणजे `पगाराच्या `किती टक्के ? किंवा किती दिवसाचा `पगार `बोनस म्हणून द्यायचा ?
म्हणजे मुख्य चर्चेला `पगार ` हा घटक महत्वाचाच !त्याशिवाय `बोनस `ची किंमत ठरत नाही .
 तर असे हे आमचे आडनाव `पगार`.
मी तर म्हणतो ,
ज्याच्या आयुष्यात असेल `पगार `त्याचे आयुष्य हिरवेगार !

Monday, October 14, 2013

`देशी` पिणार नाहीत,पण `इंग्लिश`प्यायला मोकळे !!

                                   काही दिवसांपूर्वी  माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी रामकुंडावर गेलो होतो.सकाळी सकाळी ऊन तडाखा देत होते.जमलेल्यांपैकी काहीजण हास्यविनोदाची फवारणी करत दु:खद वातावरण हलकेफुलके करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न करत होते.त्यांच्यापैकी काहिजणांचे भटजींच्या पुजेकडेही बारकाईने लक्ष होते.पुजा चालु असताना भटजीबुवांनी फर्मान सोडले,`आता मृताच्या मुलामुलींनी वर्षभर एखादे व्यसन सोडण्याचा संकल्प करा.`मग मुलामुलींपैकी काहिंनी वर्षभर तंबाखु खाणार नाही तर काहींनी तपकीर लावणार नाही असा संकल्प केला.त्यांच्यापैकी एक नुकतेच सरकारी खात्यातुन (खाऊनपिऊन)उच्चपदस्थ अधिकारी म्हनुन निवृत्त झाले आहेत.त्यांनी चहा सोडण्याचा संकल्प केला.तेवढयात गर्दीतल्या काहिंनी भटजींना विनंती केली,`गुरु यांना दारु सोडायला सांगा.`काहिंनी लगेच विरोधी सुर लावला,`नको नको,आमची वर्षभर गैरसोय होईल,आम्हाला जोडिदार राहणार नाही.`अर्थात हा सगळा हास्यविनोद चालु होता.भटजीबुवाही यात सामिल झाले.त्यांनी संकल्पकर्त्याला पुन्हा संधी दिली,`बघा तुमच्या मित्रमंडळींची आणि नातेवाईकांची ईच्छा पुर्णॅ करा.
                                                                  साहेबही फार हुशार.आक्ख्या नोकरीत त्यांनी चांगल्या चांगल्या गावपुढार्यांना आणि भल्या भल्या मंत्र्यासंत्र्यांना `शाळा`शिकवली आणि पुरुन ऊरले.ते यांच्या कोंडीत सापडतील कसे ??त्यांनीही मध्यममार्ग स्विकारला आणि सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात संकल्प केला,`आईच्या स्मृतीस वंदन करुन मी संकल्प सोडतो की आजपासुन वर्षभर देशीदारु पिणार नाही`.हे ऐकुन सगळे शोकाकुल हास्यकल्लोळात बुडुन गेले.आता साहेब वर्षभर `देशी` पिणार नाहीत,पण `इंग्लिश`प्यायला मोकळे !!!!

Tuesday, October 8, 2013

संशयितांची `संशयित रेखाचित्रे`

                                                         नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला.तपास चालू असून तो कुठल्याही निर्णायक स्थितीत पोहोचला नाही.आतापर्यंत शेकडो संशयितांची चौकशी झाली परंतु पोलिसांच्या हातात काहीच आले नाही .एखादा गुन्हा घडला की संशयितांचे रेखाचित्र तयार करून तपास केला जातो.दाभोळकरांच्या घटनेनंतर सुद्धा हे सोपस्कार पार पाडण्यात आले .हल्लेखोर दोन होते म्हणून दोन रेखाचित्रे तयार करून प्रसिद्धीस दिले गेले .मात्र काल पुन्हा सात आठ नवीन रेखाचित्रे तयार केली गेली.मुळात हल्लेखोर दोघेच होते मग रेखाचित्रे जास्त कशी ? सगळीच परिस्थिती  गोंधळाची ! पोलिसांच्याच भाषेत सांगायचे तर हा निव्वळ हवेत गोळीबार करण्यासारखा प्रकार आहे.
                                  मुळात अशी रेखाचित्रे काढणे हाच हास्यास्पद प्रकार आहे .कोणीतरी प्रत्यक्षदर्शिने भेदरलेल्या परिस्थितीत काहीतरी अर्धवट सांगितलेल्या माहितीच्या आधारे रेखाचित्रे काढली जातात.आणि तोच धागा पकडून तपास भरकटत जातो आणि खरे आरोपी मजा मारत फिरतात.दाभोळकरांची केस ही `मोस्ट  सेन्सिटीव `आहे नाहीतर पोलिसांनी अशा रेखाचित्रांच्या आधारे कोणतेतरी दोन संशयित पकडून काम पुढे चालू ठेवले असते .अगदीच गावरान भाषेत सांगायचे म्हणजे `करून गेला दाढीवाला ,पकडून आणला मिशीवाला `या नेहमीच्याच पोलिसांच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब केला गेला असता.वरून गुन्ह्याचा तपास लागला म्हणून स्वतःची पाठ थोपडून घेतली असती .असो .
                      तपास मात्र चालू आहे .आपल्या नेहमीच्या `वाट पाहण्याच्या `वृत्तीने महिनोन्महिने या तपासावर लक्ष ठेवू या .तोपर्यंत ही सात आठ संशयितांची रेखाचित्रे सुद्धा एकमेकांकडे संशयाने पाहू लागतील आणि गुन्ह्याची उकल आपोआप होईल.  

Saturday, October 5, 2013

एक्का , दुर्री , तिर्री


 भोपाळच्या बाल सुधार गृहातून ३५ बाल गुन्हेगार पळून गेल्याची बातमी वाचली आणि मला पंधरा वर्षापूर्वीची घटना आठवली .मालेगावला बालगुन्हेगारांच्या एका टोळीने तेव्हा धुमाकूळ घातला होता.पाच जणांच्या टोळीतल्या या बालकांनी पोलिसांच्या अक्षरश: नाकात दम आणला होता.चिल्ले पिल्ले होते पण भलतेच सराईत होते. त्यांची खरी नावे अब्दुल ,अल्ताफ अशी काहीतरी होती पण त्यांचे टोपण नावं मात्र अफलातून होते.टोळीच्या म्होरक्या चे नाव होत एक्का तर इतर दोघे होते दुर्री तिर्री .उरलेले दोघे खूपच लहान होते ,त्यांचे नावं होती चवन्नी ,आठन्नी .

Tuesday, September 24, 2013

खंडणीखोर बनवणारी शिक्षणपद्धती

                                    आजच्या म.टा.मध्ये खंडणीखोर शिक्षकाची बातमी वाचनात आली.बेरोजगारीमुळे कमावण्यासाठी त्याने खंडणीखोरीचा सोपा मार्ग शोधला होता .संबंधित शिक्षकाला अटक झाली असून कायद्यानुसार पुढील कारवाई होईलही.परंतु त्याच्यावर अशी वेळ का आली याचा कोणी विचार करणार आहे कि नाही ? सगळाच दोष  त्याच्यावर किंवा शासनावर देण्यापेक्षा समाजानेही विचार करण्याची वेळ आली आहे .मुळात सगळ्यात जास्त दोष कुणाला दिला पाहिजे तर तो आपल्या चुकीच्या शिक्षण पद्धतीला व ती राबवणाऱ्या यंत्रणेला .हाताला काम मिळेल असे  व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यापेक्षा आपण अजूनही वास्को -द -गामा च्या पराक्रमाच्या कथा चघळत बसतो.इतिहासाची जाणीव विध्यार्थ्यांना झालीच पाहिजे .त्यातून नवीन काही घडवण्याची प्रेरणा मिळते याबद्दल दुमत नाही .पण ते पोट भरण्यासाठी उपयोगी नाही हे ही तितकेच सत्य आहे .आज सभोवतालच्या जगात काय चालले आहे किंवा उद्या आपल्याला जगण्यासाठी आज काय केले पाहिजे हे आपली शिक्षण पद्धती शिकवत नाही .
                                      शासनानेही `अंदाधुंदपणे`निरुपयोगी अभ्यासक्रमांना व ते शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांना परवानग्या देऊन `बेरोजगार`तयार करण्याचे कारखानेच काढले आहेत .पुढार्यांच्या सोयीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी असे कारखाने निघालेत पण त्यातून तयार झालेली बेरोजगारांची फौज दिशाहीन झाली आहे. .हातात डिग्रीचे चिटोरे आले पण त्याला साजेशी नोकरी नाही .दुसरी कुठली मिळाली तर त्यात कमीपणा वाटतो.नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाही .घरात ,समाजात हेटाळणी होते.मग अशी मुले वाममार्गाला जातात.त्यामुळेच अशा खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिकली सवरलेली मुले दिसू लागली आहेत .यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही .परंतु अशा घटनांचे समर्थनही करता येणार नाही.आई जेऊ घालीना आणि बाप भिक मागू देत नाही अशी अवस्था या बेरोजगारांची झाली आहे .समाजाने आता पुढे येउन अशा बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
                                               भारताला महासत्ता बनवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावू पाहणारी ही `उर्जा `अशी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकून वाया जाऊ नये यासाठी शासनेही बेरोजगारांकडे केवळ मतपेटी म्हणून न पाहता हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे .नाहीतर देशातील तुरुंग `पदवीधर `गुन्हेगारांनी भरलेले पाहण्याचे दुर्दैव आपल्या नशिबी असेल .

Thursday, September 19, 2013

पुढच्या वर्षी लवकर ये पण तेवढ लक्षात ठेव.

                                              बाप्पा ,तुला काल मोठया आनंदाने आणि उत्साहाने निरोप दिला खरा ,पण आज भलतेच कंटाळवाणे वाटते आहे रे .घर नुसते रिकामे रिकामे वाटते आहे. काल तू म्हटलास खरा पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणून ,पण वर्षभर वाट पाहणे म्हणजे आमची परीक्षाच आहे रे बाबा .मी तर आत्ताच `काउंट डाउन`सुरु केले आहे .
                                                एक मात्र बर झाल.तुझ्यामुळे दहा दिवस भरपेट मोदक खाऊन शरीरातला गोडवा आणखी वाढवता आला.सारखं सारखं डायबेटीसची भीती दाखवणाऱ्या बायकोला चोरून मोदक खाण्याची मजा काही औरच होती.आता थेट पुढच्याच वर्षी मोदक खायला मिळणार म्हणून मन जरा खट्टू होत रे . 

                  बाप्पा दहा दिवस कसे गेले काही कळलेच नाही.सकाळी सकाळी तुझ्या आरतीसाठी धावपळ उडायची .कुणी दुर्वा आणायला पळायचं तर कुणी फुलं .सगळं वातावरण कस मंगलमय असायचं.तुला सुखकर्ता दुखहर्ता का म्हणतात हे या दहा दिवसात कळले बर का .तू आल्यापासून जाईपर्यंत बायको चक्क शब्दानेसुद्धा भांडली नाही .`पप्पा ,तुम्हाला  काही कळत नाही हो `हे वाक्य दहा दिवसात कानावर आलं नाही .घरात असे गुण्यागोविन्दाचे वातावरण असताना बाहेरसुद्धा शान्तता आणि सुव्यवस्था नांदत होती .तुझे सगळ्यात जास्त कोणी आभार मानत असेल तर ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.आबा हेच .लालबागच्या राजाचे दोनचार प्रसंग वगळता सगळीकडे आलबेल होत .मिडीयाला चघळायला काहीतरी खाद्य हवे म्हणून लालबागचे प्रकरण तूच घडविले अशी भाविकात चर्चा होती .
                    बाप्पा ,ते आसारामबापूवाले मदतीला आला नाहीस म्हणून तुला शिव्या देत होते बर का .माझे नाव नको सांगूस ,पण काही लोक  तुझ्या नावाने डबल मोदक वाटत होते बर का .म्हणे तू दाभोलकरांना संपविले .भलतंच काहीतरी .पण तू भलताच भारी बर का ,तुझ्या त्या लाडक्या भक्ताला ,जयवंत साळगावकरांना बरोबर प्रोमोशन देऊन तुझ्या दरबारात हजर करून घेतले .
                बाप्पा ,तुझ्या अशाच करामती चालू ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा.आणि येण्याच्या आधी यंदा जसा भरपूर पाऊस पाडला तसा जोरदार बरसू दे मगच ये .ते पेट्रोल ,डीझेलच तेवढे पहा .जरा भाव कमी करता आलेत तर आवडेल आम्हाला .महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारी यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस .

                 बाप्पा ,तू त्या उंदीर मामाला ,सॉरी बाप्पा ,तुझ्या त्या मूषक`राज`ला रागावत का नाहीस रे .तुला माहित नसेल कदाचित त्याने आमच्या नाशिकच्या विकासाची `ब्ल्यू प्रिंट `लपवून ठेवली आहे .त्याने ती कुरतडण्याच्या आत पुढच्या वर्षी घेऊन ये रे बाप्पा .नाहीतर `पब्लिक `कोणाला कुरतडेल हे तुला सांगायला नको .
         बाप्पा ,एक विचारायचंच राहील .तुझ्या दरबारात एखादा चांगला मास्तर आहे का रे .अरे त्या राहुल बाळाला गरिबीची व्याख्या शिकवायची आहे रे.पहा ,असेल तर दे पाठवून त्याला.आणि पुढच्या वर्षी येण्या आधी एक काम जरूर कर.काही अवघड नाही रे तुला .त्या मुक्या मनमोहनला दे ना एक धक्का.पार वाट लावली रे त्याने देशाची.बरोबर आहे तुझ ,तो त्याच्या कर्मानेच जाईल ,पण आमचा एक शिक्का आणि तुझा धक्का उरलेलं काम सोप करेल .नरेंद्र मोदींनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहेच .दे ना एक संधी त्यांना .भला माणूस वाटतो .पाहू या गुजरातची विकासगंगा देशभर पोहचवतात का ते .संधी तर देऊन पहा ,पुढचे पाहू पुढे ,वाजपेयी बनतात कि येडीयुरप्पा !!
      बाप्पा ,अजून भरपूर काही सांगण्यासारखे आहे .पण तुलाही किती संकटात टाकाव .आता एवढेच पुरे.पुढच्या वर्षी लवकर ये .आणि ते मोदींचे तेवढे लक्षात ठेव .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...