Monday, August 3, 2015

`ए पप्या फाड पावती`


      सकाळी इस्तरीवाल्या भैय्याच्या दुकानात गेलो होतो .भैय्या इस्तरी करता करता माझ्याशी गप्पा मारत होता .तेवढयात एक नवी कोरी नंबर नसलेली बुलेट गाडी फाड फाड आवाज करीत भय्याच्या दारात येउन उभी राहिली .दाढीवाल्या बुलेटवाल्याने गाडीवर बसूनच अंगातला शर्ट काढला, भैय्याच्या दुकानात भिरकावला आणि भर रस्त्यात उघडाबंब झाला .सचिन तेंडुलकरचा झेल पकडावा तसा भैय्याने शर्ट पकडला आणि प्राधान्याने इस्तरी करून दिली .इस्तरीचा शर्ट घालून बुलेटवाला निघणार तेवढयात भैय्याने आवाज दिला ,`दादा ,पैसे देके जाव ,बोहोनीका टाइम है`.
`ए भाड्या ,पैशे मागतो का ...बर बर ,देतो तुला पैशे ,उद्या तुझ बिहारच रिझर्वेशन करून ठेव.`
असे म्हणत बुलेटवाला सुसाट निघून गेला .
`साला ,हर महिने हप्ताभी लेके जाता है और कपडाभी फुकटमे....` भय्या पुटपुटत शिव्या देत होता .
मला मात्र काही तरी आठवल्यासारख वाटत होत .या बुलेटवाल्याला कुठे तरी पाहिल्यासारख वाटत होत.आणि अचानक आठवल ,अरे हाच तो , ये पप्या फाड पावती वाला !
माझ मन चटकन सात आठ वर्ष मागे गेल.असाच ऐके दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो.अचानक आठ दहा पोर ऑफिसमध्ये शिरली.त्यांचा अवतार पाहून मी लगेच ओळखलं होत आणि बाहेर जा असा इशारा केला होता.पोर नवखी होती म्हणून पटकन बाहेर गेली.पण दोन आत आलीच. एक दाराला पाठ टेकून उभा राहिला, श्रीकृष्ण बासरी वाजवताना पायांची घडी करून उभे राहतात तसा आणि पांडुरगासारखा कमरेवर हात ठेऊन .तोंडात गुटक्याचा तोबरा भरलेला.दुसरा सरळ आला माझ्या टेबलाजवळ आणि एक पावतीपुस्तक माझ्या तोंडापुढे धरत मग्रुरीच्या स्वरात म्हटला ,`पावती फाडा पाचशे एक ची ,जयंती आहे पुढच्या आठवड्यात .`
मीसुद्धा तितक्याच मग्रुरीत सांगितले ,`मी कुठल्याच जयंती पुण्यतिथीची पावती फाडत नाही .` आणि हातानेच बाहेर जाण्याचा इशारा केला .त्या सरशी त्याने मागचा गिअर टाकला , देवाला नमस्कार करून पाठ न दाखवता मंदिरातून बाहेर पडतो तसा .
आणि अचानक त्याला आदेश आला ,` ये पप्या फाड पावती `.
श्रीकृष्णाच्या पोझमध्ये उभ्या असलेल्या बॉसने गर्जना केली होती .आता पप्याला दहा हत्तींचे बळ आले आणि पुन्हा माझ्या टेबलापुढे येउन उभा राहिला .मी मानेने आणि हाताने मागे जाण्याचा इशारा करताच पप्याने पटकन मागचा गिअर टाकला .
पुन्हा पप्याच्या बॉसचा आदेश ,`ये पप्या फाड पावती .`
आदेश येताच पप्या पुन्हा
पुढच्या गिअर मध्ये आणि बाहेर उभी असलेली वर्हाडी मंडळी
हास्यकल्लोळात !!
असा खेळ तीन चार वेळा झाला .मधल्या काळात पप्याचा बॉस बाहेर जाऊन गुटख्याची पिचकारी मारून आलेला . हा काही असा इशार्याने जाणार नाही याची मला खात्री पटली होती.म्हणून मीच उठलो खुर्चीतून आणि खेकसलो त्याच्यावर ,`पावती तर फाडणार नाही पण तुला मात्र नक्की
फाडेन .`टेबलावरच्या पसार्याची आवराआवर केली ,हातातले घड्याळ काढून टेबलावर ठेवले आणि शर्टाच्या बाह्या वाळत बॉसपर्यंत पोहोचत नाही आणि जादू झाली .जादू अशी तशी नाही मिस्टर इंडियाने करावी तशी. बाहेर उभी असलेली पलटण माझा अवतार पाहताच अदृश झाली .कोणत्या रस्त्याने गेलेत कळलेही नाही .उरलेत दोघच ,पप्या आणि त्याचा बॉस .म्हटलं ,आता फाड पावती .
बॉसने परिस्थिती पाहिली आणि त्याचे विमान जमिनीवर उतरवले.`नसेल फाडायची तर नका फाडू पावती ,मी कुठे बळजबरी करतो आहे.`असे म्हणत म्हणत आपली वाट पकडली .
तोच हा बॉस `ये पप्या फाड पावती `वाला आज बुलेटवर बसून कपडे इस्तरी करत होता .
पप्या आता कुठे असेल माहित नाही पण पप्याचा बॉस पावतीपुस्तक न छापता हप्ते गोळा करत फिरतो ,गोरगरीब दुकानदारांकडून .तेही नव्या बुलेट गाडीवरून .
मी भैय्याला निरोप देऊन आलो ,पुन्हा हप्ता घ्यायला आला की मला बोलाव ,माझ्या हाताने देतो त्याला हप्ता . पाहू या येतो का निरोप .

Tuesday, December 23, 2014

मनसोक्त रडायचं ? मग वाचा एकदा ....

       मित्रांनो ,फेसबुक वरचे आमचे मित्र अमितराज अहिरे यांनी लिहलेली एक छोटी कथा खास तुमच्यासाठी देत आहे.फेसबुकवर `अहिराणी भाषिक `या नावाने ते परिचित आहेत.त्यांनी लिहिलेल्या या कथेतील शब्दांची ताकद पहा ,दगडालाही पाझर फोडणारी आहे.मला जेव्हा मनसोक्त रडायचं असत ,तेव्हा मी हि कथा पुन्हा पुन्हा वाचत असतो.तुम्हालाही मनसोक्त रडायचं असेल तर जरूर वाचा आणि फुटू द्या आपल्या अश्रूंचा बांध .
''फरहाना '' ,,
घरकाम करणारी बाई ,,एकदम तल्लख कडक ,,सकाळ ते संध्याकाळ कामच काम ,,कामावर मिळणारे उरलेले अन्न ,,तिच्या पैशाची बचत करून जाते ,,
नवरा ''फहीम''मोटार सायकल फिटर ,,अट्टल दारुडा ,,
ती कष्टाने संसार ओढीत चाललीय ,,छोटी महक आता मोठी झालीय ,,बारावी नापास झालीय ,,पण इतके शिकलीय हेही काही कमी नाही तिच्यासाठी ,,तिचा निका जमलाय,, कामाची लगबग चालू आहे ,,फरहाना ने चार घरं जास्त धरलीयेत ,,''शादिमे कुचच कम गिरने नहीं होना'' असा तिचा खयाल आहे ,,
,
छोटा अयाज आता तसा दहावीला गेलाय पण त्याची फरहाना ला चिंता नाहीय अब्बाच्या सोबत राहून तो बर्या पैकी काम शिकलाय ,,इंजिन डाऊन करतो परत फीट करतो ,,मोटार सायकल म्हणजे खेळ आहे आता त्याच्या साठी ,,गाड्या फिरवणे त्याला खूप आवडते ,,चार पाच किलोमीटर शिवाय त्याची ट्रायल पूर्ण होत नाही ,,
''इसके कने मत देते जाव गाडी ''ती फहीम ला बजावत असते ,,
,
''तू टेन्सन नको लेवू वं ,,मेरा पोर्या हैं वो ,,भाददूर हैं '' तो वर दटावत असतो ,,
,
महक चा निका जवळ आलाय ,,पत्रिका छापल्या आहेत ,,आसपासच्या गावात वाटायच्या आहेत ,,
''इतवार के रोज छुटी काडो अन पिंपलनेरकी खाला को देके आव''
फहीम म्हणतो,'' हाहा जाऊंगा ,,तू फिकर नको करू ''
,
रविवार उजाडतो ,,फहीम सकाळीच पिऊन टाईट ,,पत्रिका पोचवणे गरजेचे असते ,'',तो म्हणतो टेन्सन नको लेऊ मै जाता ,,''
, तिचा जीव कालवतो,, ''पेयेल के नांद मे मत जाव ,,आज जानेका मालूम था कायको झक मारके रख्खी ,,आब्बी रेहेन दो कल जाव ''
,
,
अयाज सारे ऐकत होता ,,त्याने हळूच गुपचूप पत्रिका काढल्या ,,प्लास्टिकच्या पिशवीत टाकल्या ,,ग्यारेज ची चावी घेतली ,,एक रिपेअर झालेली होंडा काढून निघाला ,,जोरात ,,
संध्याकाळ झालीय ,,फरहाना अयाज ची वाट पाहतेय ,''किदर तरफडां क्या मालूम ,,सुभोसे कूच खायेल बी नहीं ''
''महक तेरेकू कूच बोलके गया क्या गे ??''
''नही वं अम्मी मेरकू ,,नहीं कूच बोला ''
,
,
रात्री नऊला पोलिसांची गाडी आणि अयाजची ''बातमी''...
,
फरहाना सुन्न ,,हरलेली ,,फहीम उद्ध्वस्त ,,महक छिन्नविछिन्न,,
,
मातम ,,
,
गली मोहल्ला जमलेला ,,कफन मध्ये लपेटलेला ,,छोटा अयाज ,,
आयाबाया फरहाना ला सांगताय, ''आखरीबार उसका चेहरा तो देख ले,,एक बाई म्हणते अरे ओ कपडा हटा रे ''
,
सुन्न शांत झालेली फरहाना जोरात हंबरडा फोडते ,,'' कपडा मत हटाव ,चेहरा मत दिखाव ,,नहीं तो मेरको यकीन हो जायेगा कि ओ मर गया हैं ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,''

Monday, October 20, 2014

.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `

घटना थोडी जुनी आहे.तरी झाले असतील ६/७ वर्ष .दिवाळीच्या काही दिवस आधीची घटना आहे.जगभर मंदीची चाहुल लागली होती.भल्या भल्यांची झोप या मंदीच्या चाहुलीमुळे उडाली होती.मी ही हताशपणे माझ्या अशिलांसमवेत शेअर्स मार्केटचे अवलोकन करत बसलो होतो. माझा व्यवसायच शेअर्स ब्रोकिंगचा होता ,त्यामुळे  मला सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० पर्यंत कोणताही डिंक न वापरता खुर्चीला चिकटुन बसावे लागत होते . बरोबर तेवढयाच कालावधीसाठी माझ्या कानाचे आणि माझ्या मोबाईलचे प्रेमसंबंध उत्कट स्थितीला पोहोचलेले असत.परंतु मंदीचा फटक्यामुळे त्यांच्यातही दुरावा निर्माण झालेला होता.

म्हनुनच मी त्यादिवशी डोंबारयाच्या ढोलकीचा आवाज ऐकु शकलो.आवाज ऐकताच क्षणी मी खुर्चीतुन उठलो आणि ऑफिसच्या बाहेर आलो.अगदी समोरच डोंबारयाने आपला खेळ चालु केला होता. एव्हाना आमच्या ईमारतीच्या व्हरांडयात बरयापैकी गर्दी जमली होती.दोघाबाजुने दोन दोन टोकरांनी बांधलेल्या दोरीवर एक चिमुरडी तोल सांभाळत कसरत होती.तीची आई आपल्या आणखी दोन बछडयांना सांभाळत त्या चिमुरडीवर ओरडत होती.माझ्या मुलीपेक्षा वर्षा दोन वर्षानी मोठी असणारी ती चिमुरडी अतिशय निर्विकारपणे त्या उंच बांधलेल्या दोरीवर कसरत करत होती.तिच्या मनात कसलीही भिती दिसत नव्हती.तिचा तो निर्विकार चेहरा पाहुन माझ्या डोळ्यात टपकण पाणी आले.

माझ्याबरोबर अनेक जण तिची कसरत पहात होते.शेजारच्या ऑफिसमध्ये आलेले एक सदगृहस्थ आपल्या कडयावरच्या छकुलीला अतिशय आनंदाने ती कसरत दाखवत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग करत होते.मी डोळ्यातील पाणी पुसत होतो आणि अचानक डोंबार्याची बायको हातात ताट घेऊन पैसे मागायला येताना दिसली. तिला पाहताच आतापर्यंत त्या चिमुरडीच्या कसरतीचा आनंद घेनारे पळायला लागले होते.त्या सर्वांना मी थांबायला लावले आणि प्रत्येकाने १० रुपये देण्याचे भावनीक आवाहन केले.तेथे हजर असलेल्या शिपायापासुन ते मालकापर्यंत सर्वांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.मात्र आपल्या कडयावरच्या छकुलीला आनंदाने ती कसरत दाखवरया इसमाने( आता मी त्याला सदगृहस्थ म्हननार नाही) माझ्या आवाहनाला भिक घातली नाही.मी त्याला जाणीव करुन दिली कि साहेब तुम्ही त्या पोरिची कसरत दाखवत होतात तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहात होता.आणि त्याचेही पैसे देत नसाल तर तुम्ही जी शुटींग केली त्याचे तरी द्या.तेव्हा कुठे त्या इसमाने सुट्टे नाहीत १० रुपये देतो नंतर असे सांगुन शेजारच्या ऑफीसात एंट्री मारली .डोंबार्याचा खेळ संपत आला होता.साहेब १० रुपये देनार नाहीत यावर व्हरांडयातल्या सर्वांचे एकमत झाले होते.मी १० रुपये सोडनार नाही असे सगळ्यांना सांगितले होते.मीही माझ्या स्वभावाप्रमाणे ईरेला पेटलो होतो.तो इसम शेजारच्या ऑफीसमधुन बाहेर पडल्या पडल्या मी पुन्हा माझा घोशा सुरु केला.मी सुट्टे आणुन देतो थोडयावेळात असे म्हनत तो इसम भरकन निघुन रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दहा बारा लाखाच्या आलिशान गाडीत जाऊन बसला .आम्ही सारेजन त्याच्याकडे पहात होतो.त्यानेही आमच्याकडे पाहीले आनि गाडी चालु केली .त्याक्षणी माझ्या तोंडतुन जोरदारपणे आवाज निघाला.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `

Wednesday, October 8, 2014

`आपुलकी `आटली





                                                 कितीही दिले मटन आणि बाटली
                                                 तरी जनतेची `आपुलकी `आटली
                                                 आता त्यांची सटकली
                                                 तुमची पतंग आता काटली रे काटली !!

Monday, September 22, 2014

पण मित्रहो ,काहीही म्हणा ,दारू पिणे हे वाईटच !!

                                                                                            दारू पिणे वाईट आहे हे पटवून देण्यासाठी एखाद्या दारुड्याने  तुमचा एक तास छळ केला तर ??? अहो घडलय असच ....काल संध्याकाळी माझ्या पुण्याच्या कार्यालयात बसलो असता एक वरपिता आले.`साहेब ,आत येऊ का ?` अशी खास पुणेरी ढंगात परवानगी मागणारी आरोळी आली. आवाजावरूनच माझ्या लक्षात आले की साहेबांचे विमान हवेत उडते आहे.` या या आत या ` म्हणून मी परवानगी दिली.तोल सांभाळत वरपिता खुर्चीत विराजमान झाले आणि सरळ विषयालाच भिडले .साहेब दारू पिणे वाईटच हो ,पण काय करू ,मुलगा लग्न करायला तयारच होत नाही म्हणून मला प्यावी लागते .त्यांची कैफियत लक्षात आल्यावर मीच त्यांची समजूत काढायला सुरुवात केली.`अहो ,मुलगा लग्न करत नाही म्हणून तुम्ही दारू पीता हे काही खरे नाही .खरे असे आहे की तुम्ही दारू पीता  म्हणून मुलगा लग्न करत नाही .`साहेब ऐकतच नव्हते .त्यांचे पुन्हा पुन्हा तेच पालुपद ,साहेब दारू पिणे वाईटच पण काय करू मुलगा लग्न करायला तयारच होत नाही.हे पटवून देण्यासाठी रामायण ,महाभारतापासून ते आजच्या राजकारणापर्यंत सगळे उदाहरण देऊन झाले .मध्येच एखादा वेगळा डायलॉग असायचा ,`सर ,खर सांगतो ,नरेंद्र मोदींनी अस करायला नको होत `.मोदींनी अस काय केल हे आम्हाला शेवटपर्यंत कळल नाही .
                                                              कार्यालयात बसलेल्या आम्हा दोघा तिघांना खुदकन हसू येत होते.वरपित्याचे वय व उच्च राहणीमान लक्षात घेता आम्ही शांत बसणेच पसंत केले .आणि अशाच एका बेसावध क्षणी वरपित्याने मला सरळ ऑफरच दिली .श्रावण संपला साहेब ,गणपतीही संपला ,चला घेऊ थोडीशी .मी पटकन खुर्चीतून उठलो .वरपिता एकदम खुश झाला , ये हुई ना बात  म्हणत टाळीसाठी हात पुढे केला तसा तो मी पकडला आणि कार्यालयाच्या बाहेर घेऊन आलो. रस्त्याने जाणार्या रिक्षाला हात दिला आणि वरपित्याला विचारले कुठल्या बार मध्ये जायचे ? कुठल्यातरी बारचे नाव सांगितले .रिक्षावाल्याला विचारले माहित आहे का पत्ता ? तो हो म्हटला .मग मीही म्हटले `तुम्ही चला पुढे मी आलोच तुमच्या मागे .`  वरपित्याला घेऊन रिक्षा बारच्या दिशेने निघाली आणि थोड्या वेळाने मी नाशिकच्या दिशेने !
पण मित्रहो ,काहीही म्हणा ,दारू पिणे हे वाईटच !!
(हे मी पूर्ण शुद्धीत ,कोणाच्या दबावाला न बळी पडता सांगत आहे ,गैरसमज नसावा !!)

Thursday, April 3, 2014

मराठा वधू वर मेळावा


मराठा वधू वर मेळावा                        


























मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या वतीने रविवार , दि .६ एप्रिल २०१४ रोजी मराठा समाजातील वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कुसुमाग्रज स्मारक ,विद्या विकास सर्कलजवळ ,गंगापूर रोड ,नाशिक येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून समाजातील सर्व वधू वरांनी व पालकांनी मेळाव्यात सहभागी होऊन नवीन नाती गुंफण्याची संधी साधावी असे आवाहन करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी माझ्या ८२७५५८३२६२ वर संपर्क साधावा .आपल्या मित्र व नातेवाईकांना मेळाव्याची माहिती कळवावी हि नम्र विनंती . www.marathashubhlagna.com                        


























Friday, December 13, 2013

`फिट है ना बॉस `

अभिनेता अक्षयकुमारने काल बेदम मार खाल्ला.`फिट है ना बॉस `म्हणत हिरोगिरी करणारा अक्षय आज कान धरून उठाबशा काढत होता.त्याचे असे झाले ,काल आमच्या आर्या दीदीच्या शाळेत पालक मेळावा होता.सगळे पालक आपापले चपला बूट वर्गाबाहेर काढून वर्गशिक्षकांशी हितगुज करत होते.एवढ्यात आर्याला कसलीतरी चाहूल लागली.पाहते तर काय ,अक्षयकुमार हवेत गिरक्या घेत स्कूल बसच्या टपावरून उडया मारत डायरेक्ट दुसर्या मजल्यावरच्या आर्याच्या वर्गाबाहेर ! आर्या थोडावेळ पाहतच होती हा काय करतो ते.त्या भामट्या अक्षयने अंगातला `फिट है ना बॉस `चा बनियन काढला त्याची झोळी केली आणि भरल्या ना पटापट चपला बूट  त्या झोळीत !सगळ्या पालकांमध्ये एकदम घाबरगुंडी उडाली .कोणीच काही बोलेना. मग आर्यादिदीच पुढे आली आणि घेतली ना गिरकी हवेत.दाणकन लाथ अक्षयच्या छाताडावर .अक्षय गपगार .मग काढल्या उठाबशा .
         पहाटे शाळेत सोडायला जाताना आर्याने रात्री पडलेले स्वप्न सांगितले आणि वरून मला विचारले  `फिट है ना बॉस `.

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...