Monday, June 27, 2016

आरक्षणाचे अपयश की आमचे दुर्दैव ?

आरक्षणाचा फायदा घेऊन आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच वैचारिक पातळीही उंचावली पाहिजे अशा आशयाची प्रतिक्रिया मी मागच्याच आठवड्यात माझ्या एका फेसबुक पोस्टवर दिली होती .दुर्दैव म्हणा किंवा आरक्षणाच्या उद्देशाचे अपयश म्हणा अजूनही अनेकांची वैचारिक पातळी जशी आहे तशीच आहे. असे मत व्यक्त करायला आणि त्याचा अनुभव लगेच घ्यायची वेळ मला मागच्या आठवड्यात आली .त्याचे असे झाले, शनिवारी मी पुण्याला जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्टॅण्डवर एका बस मध्ये चढलो. बसमध्ये गेलो आणि आवाज आला ,`ओ हेमंतराव ,या मागे .`बसमध्ये मागच्या बाकावर बसलेल्या एका ओळखीच्या प्राध्यापकाने आवाज दिला होता.आरक्षणाचा फायदा घेऊन नाशिकमधल्या एका नामांकित संस्थेत हे प्राध्यापक नोकरीस होते.मी एम.एस्सी .ला असताना सर सटाणा येथे नोकरीस होते .त्यामुळे त्यांची आणि माझी चांगली ओळख होती .मी सरांना म्हटले ,इतक्या मागे बसण्यापेक्षा पुढेच या .पण त्यांच्या आग्रहामुळे मला मागे जावे लागले.पुण्याला जाताना अनेकदा जिल्ह्यातील बरेच प्राध्यापक सोबत असतात .विद्यापीठातील कामासाठी ते जात असतात .म्हणून सरांना विचारले ,`काय विद्यापीठात चालले वाटत ?`.
सर ,`नाही रे बाबा ,लगेच उतरायचे आहे स्टेशनवर .कॉलेजला निघालो .
मी ,`बदली झाली की काय सर ?
सरांनी होकारार्थी मान हलवली आणि रेल्वे महामार्गावरच्या एका शहरात बदली झाल्याचे सांगितले .मी थोडी हळहळ व्यक्त करून सटाणाच बरे होते तुम्हाला अप डाऊन करायला अशी समजूत काढायचा प्रयत्न केला . सरांनी स्मितहास्य करत सांगितले ,आरे बरे झाले इकडे माझे महिन्याला तीन चार हजार रुपये वाचतात . मी सहज विचारले कसे काय हो सर ? सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने त्यांच्या बचतीचे गणित समजून सांगितले .
सरांनी सांगितले, हे पहा हेमंत .मी आता या गाडीने नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत येईन .याचे काय मी तिकीट काढणार आहे का ?
मी विचारले ,`कंडक्टर आला तर ?`
अरे तो आपल्याजवळ येईपर्यंत स्टेशन येऊन लागते .आपण उतरून जायचे .
मी `सर ,बस मध्ये तर गर्दी काहीच नाही .कंडक्टर तर लगेचच येईल .
सर ,`मग अशावेळेस मी सांगतो ,स्टेशनवर माझा मित्र येणार आहे .त्याचे आणि माझे तिकीट बरोबरच काढतो .आणि स्टेशनवर त्याला पाहायच्या निमित्ताने हळूच उतरून जायचे .`
मला मात्र सरांची कीव यायला लागली होती .
मी म्हटले ,`सर इनमीन दहा पंधरा रुपयांकरता एवढा आटापिटा .`
सर,`अरे पुढचे रेल्वेचेही पैसे वाचतात ना बाबा .रेल्वेचे तिकीट काढायला माझ्या डोक्यात का पाणी झाले का ? `
असे म्हणत सरांनी एक खास स्टाईल मध्ये गडगडाटी हास्य केले आणि टाळीसाठी एक हात माझ्यापुढे केला .मी सुन्न झालो होतो .टाळीसाठी मीसुद्धा हात पुढे केला पण तोपर्यंत नाशिकरोड स्टेशन आले होते आणि सर बसमधून उतरायला लागले होते .मी टाळीसाठी पुढे केलेला हात तसाच कपाळावर मारून घेतला.
आरक्षणाच्या बळावर गलेलठ्ठ पगार घेऊनसुद्धा मानसिकता अशीच गलिच्छ राहत असेल तर हे आरक्षणाचे ढळढळीत अपयशच म्हणावे लागेल . (अर्थात याला काही सन्माननिय अपवाद आहेत .)
तरीसुद्धा आपण म्हणूया ,मेरा देश बदल रहा है !!

Thursday, April 21, 2016

' मेरा तो भेजा फ्राय हो गया !!!'

बायांना दुसऱ्या बाईचे कौतुक केलेले अजिबात आवडत नाही .उष्णतेच्या लाटेने देशभर कहर केला असून त्याची तीव्रता दाखवणारी एक video क्लिप whatsapp वर फिरत आहे.एका महिलेने कुठलेही इंधन न वापरता फरशीवर अंड्याचे आम्लेट बनवून दाखवले अशी ती क्लिप आहे.मी मोठ्या कौतुकाने बायकोला ती क्लिप दाखवली.
तिने शांतपणे प्रतिक्रिया दिली .
`यात काय विशेष .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. मी तर तुमच्या टकलावर आम्लेट करून दाखवू शकते `
.
.
.
.

' मेरा तो भेजा फ्राय हो गया !!!'


Friday, April 1, 2016

वधुवरांच्या पालकांची सट्टेबाजी

मित्रांनो ,
सप्रेम नमस्कार .
मी तुम्हाला जकातदार नावाच्या एका ज्योतिषाचे पेपरमध्ये आलेले कात्रण पाठवत आहे.त्यांनी सांगितलेले भाकिते खरी ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे .त्यासाठी त्यांनी विंडीजच्या खेळाडूंची पत्रिका पाहिल्याचा दावा केला आहे.( विंडीजच्या खेळाडूंची जन्मतारीख ,जन्मवेळ आणि जन्मस्थळ पाहायला जकातदारचा बाप गेला होता कि काय मला माहिती नाही ).दुर्दैवाने कालच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि जकातदाराचे भाकीत खोटे ठरले . या भाकितावर भरवसा ठेऊन अनेक सट्टेबाजांनी सट्टा लावला असेल आणि स्वत:चे आयुष्य उध्वस्त करून घेतले असेन.आज या जकातदारला कोणी जाब विचारला तर तो सरळ हात वर करून देईल .
 मित्रांनो ,आपणही आपल्या मुलामुलींची लग्नासाठी पत्रिका पाहण्यासाठी अशा गल्लोगल्लीच्या जकातदारांकडे जातो आणि आपल्या पाल्यांचे आयुष्य उध्वस्त करतो असे आपणास वाटत नाही का ? मी तर या प्रकाराला
कात्रण पुन्हा एकदा वाचा आणि आत्मपरीक्षण करा अशी कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करतो .
हेमंत पगार .
मराठा शुभ लग्न डॉट कॉम .,नाशिक .
www.marathashubhlagna.com
whatsapp No.8275583262

Wednesday, February 10, 2016

शेवटची पिचकारी

त्याने पचकन मारलेली पिचकारी माझ्या पायावर पडली नाही हे नशीब. त्रिमूर्ती चौकात पार्किग करण्यासाठी ACTIVA हळू करून पाय जमिनीवर टेकायला आणि त्याने पचकन पिचकारी मारायला एकच वेळ झाली .पाय भरला नाही म्हणून मला जरा हायसं वाटल पण त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि गाडीवरून उतरलो .माझ्या नजरेची भाषा कळली म्हणून त्याने लगेच मला विचारलं ,पायावर नाही ना पडले सर ,सॉरी बर का .त्याच्या सॉरी म्हणण्यात मला वेगळीच अदब वाटली म्हणून मी त्याला जरा निरखून पाहिले.कडक इस्तरी केलेला स्वच्छ खाकीचे कपडे घातलेला रुबाबदार गडी हाताची घडी करून त्याच्या रिक्षाला पाठ टेकून उभा होता.कपाळावरचा भगवा टीळा आणि थोडी वाढलेली दाढी त्याचा रुबाब अजून खुलवत होते. रिक्षावाला होता पण त्याच व्यक्तिमत्व प्रसन्न वाटत होत. पण जिथे उभा होता तिथे आजूबाजूला पचापच थुंकून ठेवले होते .जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटले , माझा पाय नाही भरला पण तुम्हालाच इथे उभे राहावे लागते ना ,मग थुंकून इतकी घाण का केलीस ? थोडी मान खाली घालून तो बोलला  ,काय करणार सर ,तंबाखूची सवय जातच नाही .मी त्याला विचारले ,आर आर आबा माहित होते का ? तो म्हटला `हो`.कशाने गेले माहित आहे का ? तेही त्याला माहित होते. मग तुमची तंबाखू कशी सुटत नाही असे विचारले तर बोलला ,खूप प्रयत्न केलेत साहेब पण नाही सुटत .मी विचारले ,अशी कशी सुटत नाही .मुलबाळ आहेत का ? दोन लहान कच्चेबच्चे असल्याचे  समजले . म्हटलं ,घे त्या मुलांची शपथ ,आजपासून तंबाखू खाणार नाही. आणि त्याने खरच शपथ घेतली .त्याला अजून पक्क कराव म्हणून खिशातली पुडी काढून हातावर घ्यायला सांगितली आणि म्हटले,यापुढे अशी तंबाखू  हातावर घेतली की त्यात तुला तुझे मुले आणि आर आर आबा दिसले पाहिजेत. माझ काम करून मी तिथून निघून गेलो .
                             एम.ए.,बी .एड. करून दहा लाख रुपये संस्थाचालकाला अर्पण करून काही दिवस मास्तरकी केलेला हा रिक्षावाला आज पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी भेटला आणि म्हणाला ,thank you  सर ,त्या दिवसापासून तंबाखूला हात नाही लावला .दहा लाखातली एक दमडी मला परत मिळाली नाही पण तुम्ही मला नवीन जीवन दिले .बोलताना त्याच्या आणि माझ्या डोळ्यांच्या कडा केव्हा ओल्या झाल्या ते कळलेही नाही
-

- हेमंत पगार ,
मराठा शुभ लग्न डॉट कॉम ,नाशिक 

Friday, January 15, 2016

हताश पाखर

२ जी ,३ जी नाही तर आक्ख अवकाश ज्यांच्या बापाची वडिलोपार्जित मालमत्ता आहे ते पक्षी आज आहेत तरी कुठे ?
........ जीवाच्या आकांताने लपून बसलेत ते उंच अशा इमारतींच्या आडोश्याला आणि पाहताहेत भीतीयुक्त नजरेने त्यांच्या मालमत्तेत अतिक्रमण करीत असलेल्या त्या रंगीबेरिंगी पतंगांचे ........कानठळ्या बसवणाऱ्या डी जे च्या आवाजाने गाळण उडते आहे त्या पाखरांची ........गाळण ?? नव्हे थिजलीच ती पंख..........थोडस धाडस करून ढुंकून बघताहेत बाहेर .........आणि अचानक उठलेल्या गई बोला रे च्या आरोळ्यांनी एकच कोलाहल माजला त्या आडोशाला ...........आणि मग वाट फुटेल तिकडे उडत राहिली ती चिमणी पाखर .......थोडी अनुभवी होती ती लपली आडोशाला पटकन ...........चिल्लीपिल्ली मात्र उडाली आकाशात जीव वाचवण्यासाठी .........त्यातलीच काही अडकली मांज्या नावाच्या फाशीच्या दोरात .........फडफडता आहेत अजूनही जीव वाचवण्यासाठी .........असहाय्यपणे .......काही स्वर्गस्थ झालीत ...........निमिषार्धात ........डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजात कुठलाही ३ जी ४ जी स्पेक्ट्रम कामात येत नाही त्यांचा चिवचिवाट घरच्यांपर्यंत पोहचवण्यासाठी .........काही परतली घरट्याकडे सुखरूप .................लहानग्यांच्या पोटात उठलेला आगडोंब कसा विझवावा याची चिंता सतावते आहे मोठ्यांना ..............सकाळपासून पाण्याच्या थेंबाला वंचित झालीत सगळी पाखर ....आता अंधाराची वाट पहाणे एवढेच आहे हातात ...... ........वडीलधारी पक्षी हताशपणे समजूत घालताहेत लहानग्यांची ......अरे आता तुम्ही तरी जाऊ नका बाहेर .........त्या कसायांची शिकार व्हायला ........ आजचा दिवस येथेच काढू ...........उद्या होईल सगळ व्यवस्थित ......उद्या याच फासात अडकतील त्यांचेच सगेसोयरे ...ज्यांनी विणला हा नायलॉन मांज्याचा फास ........आणि मग रडतील दुसर्याला शिव्या देत ........देतील दोष दुसर्याला .......आपले कर्म झाकून ..............पुढच्या संक्रांतीपर्यंत !!!

Tuesday, October 27, 2015

शाहिस्तेखानाचा वध


" पुन्हा जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म घ्या ......
या शाहिस्तेखानावर उपकार करा
तुमच्या तलवारीने एकच घाव घाला आणि एकदाचे मला मरण दया महाराज
पुन्हा जन्म घ्या...... पुन्हा जन्म घ्या .
तुम्ही माझी बोटे छाटली तेव्हा जीव वाचला म्हणून  मी स्वत:ला नशीबवान समजत होतो .
आता वाटते तेव्हाच मरण आले असते तर आज दिवसातून पन्नास वेळा मरायची मला वेळ आली नसती महाराज .
या चिमण्यादादाच्या धनुष्यबाणाने रोज पन्नास वेळा मरण्यापेक्षा तुमच्या हातून एकदाच मेलेले परवडले असते महाराज .
म्हणून माझ्यावर उपकार करा
पुन्हा जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म घ्या आणि एकदाचे मला मरण दया ."
  
शाहिस्तेखानच्या या आर्त विनवण्यांनी आता मलाही पाझर फुटायला लागला आहे .
एकच माणूस मरणार तरी किती वेळा हो !
सकाळ  झाल्यापासून आमच्या घरात शाहिस्तेखानाच्या वधाचा एकपात्री प्रयोग सुरु होते.
नाटकाचा लेखक ,निर्माता ,कलाकार ,संगीतकार सबकुछ एकच
तो म्हणजे चिमण्यादादा अर्थात पार्थ हेमंत पगार .
( जाणकार इतिहासकारांनी नोंद घ्या ..........शिवाजी महाराजांनी फक्त बोटे छाटली होती परंतु वध करण्याचे उरलेले काम चिमण्यादादा करतो आहे . तेही  एके ४७ च्या जमान्यात धनुष्यबाणाने )
एकपात्रीचे  मुहूर्तही फार छान .
चिमण्यादादाला सकाळी  झोपेतून उठवले कि लगेच पहिल्या प्रयोगाची घंटा होते.
`ओ पप्पा ,माझे धनुष्य बाण कुठे आहे .एकदा शाहिस्तेखानाला मारू दया ना `..............हा पहिला खेळ .
दात घासायला सांगितले की लगेच दुसर्याची परवानगी .
एकदा शाहिस्तेखानाला मारू दया मगच दात घासेन .
आंघोळ कर म्हटले की लगेच ,`एकदा शाहिस्तेखानाला मारू दया मगच..........`
असा दिवसातून पन्नास वेळा तरी शाहिस्तेखान चिमण्यादादाच्या  धनुष्य बाणाने मरतो .
या सगळ्या प्रयोगात शिवाजी महाराज ही चिमण्यादादाच !
जमिनीला पाठ टेकवून पाय फाकवून झोपलेला आणि छातीमध्ये घुसलेला बाण काढताना विव्हळनारा शाहिस्तेखानही चिमण्यादादाच !
विव्हळताणाच  `ओ पप्पा , फ्यान चालू करा हो ,शाहिस्तेखानाला गरम होत आहे `
शाहिस्तेखानच्या वधानंतर `हर हर महादेव ` च्या  गगनभेदी गर्जना करणारे मावळे म्हणजे चिमण्यादादा .
`भागो शिवाजी आया भागो `म्हणत घरभर सैरावरा पळणारे  खानाचे सैन्य म्हणजे चिमण्यादादा !
तबडक तबडक चालणारा महाराजांचा घोडाही तोच !
असा हा एकपात्री नाटकाचा प्रयोग दिवसभर रंगत असतो .
.

आणि प्रत्येक वेळेस शाहिस्तेखान विनवण्या करत असतो ,
`महाराज
पुन्हा जन्म घ्या
पुन्हा जन्म घ्या            
तुमच्या हातून मला एकदाच मरण दया `

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...