Tuesday, August 27, 2019

मावशी

`मावशी ` हा शब्द उच्चारला,वाचला किंवा ऐकला की माझ्या अंगाला कापरं सुटायला लागत .असे का ? तर त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो.
मागच्या वर्षी मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार विजय चव्हाण यांचे निधन झाले. सोशल मीडियावर त्यांना वाहिलेल्या प्रत्येक श्रद्धांजलीत `मोरूची मावशी ` असा उल्लेख होता .तसे अपरिहार्य होते.कारण त्यांनी त्या भूमिकेला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले होते. म्हणून मोरूची मावशी हे बिरुद त्यांना मरेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा चिकटलेले आहे. वास्तविक हे स्त्रीलिंगी बिरुद असून सुद्धा विजय चव्हाण यांना त्याचा कधी अपमान वाटला नाही . पण एकदा एका बाईला मी मावशी म्हटले आणि माझ्यावर जो प्रसंग गुदरला तेव्हापासून मी मावशी या शब्दाचा धसकाच घेतला आहे. त्याचे झाले असे, दोन तीन वर्षांपूर्वी मी पुण्याहून नाशिकला यायला निघालो. दर शनिवार रविवार मी पुण्याच्या ऑफिसला असायचो आणि रविवारी रात्री नाशिकला परत यायचो. त्या रविवारीही परत येण्यासाठी शिवाजीनगर बस स्टॅन्डला आलो तर एशियाड बस नुकतीच निघून गेली होती. थंडीचे दिवस होते.रात्रीचे जवळपास अकरा वाजत आले होते .अजून अर्धा तास कुडकुडत बसण्यापेक्षा जी बस मिळेल ती पकडायची आणि मार्गी लागायचे म्हणून पेठ डेपोच्या लाल बसमध्ये बसलो .बस प्रवासांनी भरत आली होती आणि तेवढ्यात आठ दहा महिलांचा घोळका बस मध्ये शिरला .पंढरपूर किंवा कुठूनतरी देवदर्शन घेऊन आलेल्या या महिला होत्या. जवळपास सगळ्या उतारवयाकडे झुकलेल्या होत्या .त्यापैकी काही महिला मिळेल ती जागा पकडून स्थानापन्न झाल्या . ज्यांना जागा मिळाली नाही त्या उभ्या राहिल्या. अशा वेळेस माझ्यातला समाजसेवक जागा होतो.मी पटकन माझी जागा रिकामी करून एखाद्या महिलेला देतो.पण त्या दिवशी पुण्यापासून नाशिकपर्यंत प्रवास करायचा होता.दिवसभराचा थकवा होता .तशात थंडीने कहर केलेला होता .रात्रीची वेळ होती . अशावेळेस समाजसेवा व्यवहार्य ठरणार नव्हती.म्हणून मी शांत बसलो .पण काही महिला उभ्या आहेत हेही मला सहन होत नव्हते.म्हणून एका बाईला म्हटले ,`मावशी ,त्या पुढच्या बाकावर दोघी जणी बसल्या आहेत तिथे थोडी जागा करून तुम्ही बसून घ्या . झाले ,मी मावशी म्हटले आणि त्या बाईला काय राग आला काय माहिती. तिने अगदी अरे तुरे करत मला जाब विचारायला सुरुवात केली .मी काय तुला म्हातारी दिसते कारे मला मावशी म्हणतो तर ? तू काय स्वतःला एवढा तरुण समजतो काय ? . एवढ्या थंडीतही मला घाम फुटायला लागला होता .झोप येत होती येत तर तीही कुठल्या कुठे उडून गेली . बाईंची टकळी अव्ह्याहत सुरु होती .तशात आणखी एकीने तिची झील ओढायला सुरुवात केली .म्हणून तिला दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले. बस खेडच्या जवळपास आली होती. हे महिलामंडळ सिन्नरला उतरणार होते. आता सिन्नरपर्यंत काय काय भोगावे लागेल याचा विचार घाम फोडत होता. आजूबाजूच्या प्रवाशांची झोप मोड होत होती .या सर्व घटनेचे ते सुरुवातीपासून साक्षीदार होते म्हणून बरे . नाहीतर महिलांची बाजू घ्यायला सगळे तत्पर असतात. अशात माझे सुदैव उजाडले. झोपमोड होते म्हणून एका वयस्कर प्रवाशाने त्या बाईला झापायला सुरुवात केली आणि त्यांना मग इतर प्रवाशांनी साथ दिली. त्याने मावशी म्हटले यात काही चुकले का त्याचे ? मग कशाला एवढी बडबड करून राहिली असा सर्वांनी तिला दम भरला तेव्हा कुठे ती नरमली आणि पुढचा प्रवास शांततेत झाला . त्या दिवसापासून मी चुकून कोणत्याही महिलेला मावशी म्हणत नाही .

Friday, July 13, 2018

.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !

.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !
कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली ? या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच मागच्या सरकारांवर खापर फोडतील तर नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांच्या तोफा मोदींना टार्गेट करतील .मात्र सोशल मीडियावर विनोदाने फिरणारा हा फोटो माझे मन बेचैन करत होता.घरात बसून ऑनलाईन पिझ्झा बर्गरची ऑर्डर देऊन ते मागवून खाण्याचे दिवस आलेत तरी सुद्धा देशाच्या अनेक भागातील आठवडे बाजारातील हे दृश्य नेहमीचेच आहे.`त्यांच्यात` उंदीर खाण्याची परंपरा आहे असे म्हणून आपण पळवाट शोधू शकतो. परंतु सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही .स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला तरी सरकार यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नाही ही खेदाची बाब आहे.आज देशभर अन्नधान्याची गोदामे भरभरून वाहत आहे.इतकी कि धान्य ठेवायला जागा अपुरी पडते आहे .अनेक रेल्वे स्टेशन्सवर बाजार समित्यांच्या आवारात धान्याच्या थप्प्याच्या थप्प्या पावसात भिजत आहे. मग ते धान्य या लोकांना वाटायला सरकारला लाज वाटते कि काय हे समजायला मार्ग नाही.देशाचे नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. मोठमोठ्या समारंभातून अन्नपदार्थांची नासाडी आपण थांबवली पाहिजे. सध्या लग्नसमारंभ किंवा हॉटेलांमध्ये अन्न उष्ट टाकायचे फ्याड आले आहे. लग्नांमध्ये ताटात स्वतःच्या हाताने वाढून अर्धे जेवण फेकण्यात लोकांना मोठेपणा वाटतो.वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येसुद्धा एकमेकांच्या तोंडाला केक चोपडण्याचे आणि डोक्यावर अंडे फोडण्याची विकृती समाजात आली आहे. `अन्न हे परब्रम्ह ` ही आपली संस्कृती असताना अन्न पायदळी तुडवले जाते.जोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी उंदीर खाणाऱ्यांमधील आणि संपत्तीचा माज आला म्हणून अंडे फोडणाऱ्या,अन्न पायदळी तुडवणाऱ्यांमधील दरी बुजवली जात नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता बनेल याचे आपण स्वप्न पाहू नये .

Wednesday, May 24, 2017

शाब्दिक दणका

  गोड बोलून जर एखाद्याला सांगितलेले समजत नसेल तर शाब्दिक का होईना पण दणका द्यावाच लागतो .म्हणतात ना `उंगली तेढी करनी पडती है `.हल्ली आर्चीच्या भाषेत विचारतात ,`इंग्लिश मध्ये सांगू का ?`.असाच दणका मागच्या आठवड्यात एका पालकाला दिला .
           झाले असे ,मागच्या आठवड्यात माझ्या माध्यमातून एक लग्न जमले.वधु पक्ष व वर पक्षाकडचे असे दोघेही माझे जुने संबंधित होते.म्हणून लग्न जुळविण्यास फार अडचण आली नाही.मुलगा मुलगी दोघेही उच्चशिक्षित .एकमेकाला अनुरूप आणि एकमेकांची पसंती .लग्न कसे करायचे ,कुठे करायचे यावर दोघा पक्षाकडून परस्पर एकमत झाले.पण दुपारी  की गोरज मुहूर्तावर करायचे याबाबत तिढा निर्माण झाला .प्रकरण माझ्याकडे आले.मुलीचे वडील ग्रामीण भागात राहणारे आणि मुलाचे नाशिकमध्ये.तरी नाशिकमध्ये दुपारी लग्न काढून द्यायला वधूपिता राजी .पण वरपित्याचा  हट्ट गोरज मुहूर्ताचा .शे सव्वाशे किलोमीटर वरून वऱ्हाड येणार ,रात्री उशिरा परत जाणार .अनेक वऱ्हाडी मंडळी शेतात राहणारे .त्यांची अडचण होईल .गोरज मुहूर्ताच्या लग्नाचा खर्चही वाढणार होता.म्हणून वधूपिता गयावया करीत होता. मी वरपित्याला या सर्व अडचणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.थोडेशे वातावरण हलके व्हावे म्हणून `चला मंगल कार्यालय तर शोधू ` असे म्हणून एका कार्यालयात चौकशी साठी गेलो .वधूपिता आणि त्यांचा एक जोडीदार कार्यालयाच्या एका टोकाला अंदाज घेत उभे होते.ती संधी साधून वरपित्याचे माझ्यामागे टुमणं ,तुम्हीच सांगा यांना गोरज मुहूर्तावर लग्न करायला . शेवटी माझाही संयम संपला .वरपित्याचे कच्चे दुवे मला माहित होते.गेल्या तीन वर्षांपासून मुलगी शोधत होते.त्यामुळे मी झटकन त्यांना पर्याय दिला .त्यांना थोडेसे दटावूनच सांगितले ,`तुम्ही असे करा ,या माणसाची गोरज मुहूर्तावर लग्न काढून द्यायची काही परिस्थिती नाही.तुम्ही उद्या दुसरी मुलगी शोधून टाका आणि त्यांनाही सांगतो दुसरा जावई शोधायला .हा विषय आता इथेच थांबवूया .` असे म्हणून मी वधुपित्याला माझ्याकडे येण्याचा आवाज दिला .तेवढ्यात वरपित्याने माझा हात पकडून दाबायला सुरुवात केली आणि म्हणायला लागला ,जाऊ द्या जाऊ द्या दुपारचाच मुहूर्त ठेऊ .माझी काही हरकत नाही .
          शेवटी `उंगली तेढी `करावी लागली तेव्हा कुठे वरपिता ठिकाणावर आला आणि गोरज मुहूर्त टाळला .


- हेमंत पगार ,मराठा शुभ लग्न डॉट कॉम ,नाशिक .मो.नं. 8275583262

Wednesday, March 22, 2017

मोफत तिथे आफत

जिओ च्या फुकट सेवेमुळे अंबानीला फायदा झाला कि नाही माहित नाही .परंतु सर्वाधिक नुकसान जर कोणाचे होत असेल तर ते कॉल रिसिव्ह करणाऱ्याचे.फुकट असल्यामुळे बोलणाऱ्याला काही तोटा होत नाही पण ऐकणाऱ्याला त्याचे हातातले काम बाजूला ठेवावे लागते.`बरं,ठेऊ का आता` असे म्हटले तरी बोलणारा `ऐकून तर घ्या `असे म्हणून गुऱ्हाळ चालू ठेवतो .`जिओ ने दिले मोफत पण आमच्यावर ओढवली आफत ` असे म्हणायची वेळ आली .  

Thursday, March 16, 2017

बाक्कोळा

बाक्कोळा .....खानदेशातल्या ग्रामीण भागात बोलला जाणारा हा शब्द काळाच्या ओघात बरेच जण विसरले असतील .परवा होळीच्या दिवशी मला हा शब्द मला अचानक आठवला आणि बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या .खेड्यापाड्यात होळीच्या पूजनासाठी शेणाच्या खास गोवऱ्या बनवल्या जायच्या .त्यातल्या बर्फीच्या आकाराच्या गोवर्यांना `बाक्कोळे` म्हणायचे.अशा गवर्यांची माळ बनवून होळीच्या पूजनासाठी वापरायचे. होळी संपली की या शब्दाचा महिला वर्गाकडून शिवी म्हणून वापर व्हायचा .गल्लीत चिल्ले पिल्ले खेळताना त्रास व्हायला लागला की एखादी बाई हमखास शिवी द्यायची ,`ये बाक्कोळास्वन ,तुमनी व्हळी व्हयी जाओ तुमनी ,काय गर्दी लायी दिधी रे आठे .` आणि मग मुलांची पांगापांग व्हायची .
अहिराणीतले असे अनेक खास शब्द आहेत ज्यांच्याशी बालपणीच्या आठवणी निगडित आहेत.तुमच्याही आठवणीतले काही शब्द असतील तर जरूर कळवा.

Wednesday, November 23, 2016

ब्रेकिंग न्यूज- नाशिक मध्ये गंजलेल्या रेल्वे डब्ब्यांची राजरोस चोरी .

(आमच्या वार्ताहराकडून )
नाशिक - नाशिक मध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाच्या डब्ब्यांची राजरोसपणे चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.सदर रेल्वे एकाच ठिकाणी ऊन ,वारा व पैशात ...सॉरी पावसात उभी असल्यामुळे गंजून गेली असून आतापर्यंत तिच्या ४० पैकी २१ डब्ब्यांची चोरी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आमच्या वार्ताहराने अधिक चौकशी केली असता अजून चार डब्बे खिळखिळ्या अवस्थेत असून त्यांना खरेदी करण्यासाठी काही भंगार व्यापाऱ्यांनी सेटिंग लावून ठेवल्याचे कळले.खरेदीदारांशी संपर्क साधला असता त्यांनी हि सौदेबाजी खरी असल्याची कबुली दिली .जुन्या भंगार डब्ब्यांना रंगरंगोटी करून येणाऱ्या जत्रेत बाळगोपाळांच्या करमणुकीसाठी यांचा वापर करणार असल्याचे त्यांनी आमच्या वार्ताहरास सांगितले.
आमच्या वार्ताहराने सदर रेल्वेबद्दल अधिक तपशील गोळा केला असता अतिशय रंजक माहिती समोर आली आहे.एक तरुण तडफदार चालक नवे कोरे इंजिन घेऊन नाशिकला आला तेव्हा सर्व नाशिककरांनी त्यांचे मनापासून स्वागत केले होते.या इंजिनाला तुम्ही डबे जोडा मी तुम्हाला स्वर्गाची सफर घडेल असे नाशिक घडवून दाखवतो या आवाहनाला भुलल्यामुळे नाशिककरांनी तब्बल चाळीस डबे या इंजिनाला जोडून दिले होते.माझे इंजिन सगळ्यात वेगळे असून यातून लवकरच निळा धूर (ब्लू प्रिंट) निघेल असा विश्वास इंजिन चालकाने दिला होता .रेल्वे केव्हा पळेल असे जनतेने विचारले असता नऊ महिने नऊ दिवस कळ काढा असे उत्तर चालकाने दिले होते.मात्र इंजिन साडेचार वर्ष एकाच जागेवर उभे राहून कुंथत राहिल्यामुळे निळ्याऐवजी काळा धूर फेकत राहिले. त्यामुळे मागच्या सर्व डब्ब्यांचे तोंड काळे (दाढीसकट ) काळे झाले असून त्यांची अवस्था भंगारातल्या डब्ब्यांसारखी झाली आहे. सुरुवातीच्या काळात याच डब्ब्यांनी नाशिकच्या प्रेस मध्ये छापलेल्या नोटा मुंबईला वाहून नेण्याचे काम केले होते.परंतु आज त्यांची अवस्था पाचशे व हजारच्या नोटेसारखी झाली आहे.एकीकडे जनता बँकेच्या दारात रांग करून उभी असून दुसरीकडे हे डबे भंगाराच्या व्यापाऱ्यांकडे रांग करून उभी आहेत.उरलेल्या डब्यांची चोरी होऊ नव्हे म्हणून प्रयत्न केले जात असले तरी चालक परागंदा असल्यामुळे यात यश येते की शंका नागरिक उपस्थित करीत आहेत.चालकाच्या या वर्तनामुळे नागरिक चांगलेच ना `राज ` असून इंजिनाला मोडीत काढून नाशिकमध्येच मूठमाती द्यावी अशी मनोमन इच्छा बाळगून आहेत.

Tuesday, September 13, 2016

अधिकाऱ्यांचे बूट सोन्याचे असतात का हो ?

सरकारी अधिकाऱ्यांचे बूट सोन्याचे असतात का हो ? नाही ना ? मग एक किस्सा सांगतो . मागच्या आठवड्यात एका सरकारी कार्यालयात कामानिमित्त गेलो होतो .काम तसे किरकोळ आणि नियमांच्या चौकटीत बसणारे होते .पण शेवटी ते सरकारी काम होते आणि त्याची शेंडी एका जबाबदार अधिकाऱ्याकडे होती .त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तर दरवाज्यातच चपला बुटांचा खच पडलेला होता .एक चप्पल कुठे तर दुसरी कुठे अशी अस्ताव्यस्त परिस्थिती होती .दरवाज्याच्या बाहेर कागदाचा बोर्ड लावलेला होता ,`पादत्राणे बाहेर काढावीत `!!. मी बोर्ड वाचला आणि पायाजवळील पसारा पाहिला.आपण जर येथे बूट काढले तर परत शोधायला अर्धा तास लागेल असे मनोमन वाटले.बूट काढावेत की नाही याचा विचार करीत असताना सहज म्हणून कार्यालयात डोकावले तर टेबलाखालून साहेबांचे बूट वाकुल्या दाखवत होते. साहेबांच्या आजूबाजूला बसलेल्या सहकाऱ्यांच्या टेबलाखाली नजर मारली तर सर्वांचे बूट चप्पल वाकुल्या दाखवत होते.म्हणून मी मोठ्या हिमतीने बुटांसहित कार्यालयात प्रवेश केला .कार्यालयात इतर टेबलांवर गर्दी होती .बरीच जनता आपला नंबर केव्हा येतो याची वाट पाहत बाकड्यांवर बसलेले होते.अर्थात सगळ्यांनी शिस्तीत चप्पल बूट बाहेर काढलेले होते.तेवढ्यात कार्यालयातील शिपाई महिला माझ्यावर ओरडत आली व बूट बाहेर काढायला सांगितले .शिपाई मावशी वयस्कर असल्यामुळे मीही नमते घेतले व सांगितले ,`मावशी ,मी बूट काढतो पण तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पायात बूट चप्पल आहेत.त्यांनाही काढायला सांगा .`मावशी मात्र आता भडकल्या होत्या आणि काहीतरी गडबड चालू आहे असे साहेबांसहित सर्वांना कळून चुकले होते .मीही सर्वांना ऐकू जाईल असा आवाज चढवला आणि विचारले , येणाऱ्यांनी बूट बाहेर काढायचे आणि तुम्ही लोकांनी बूट घालून बसायचे हा कुठला न्याय आहे ? साहेबांचे बूट काय सोन्याचे आहेत काय ? शेवटी साहेबांनी बोलावून घेतले आणि काय कामासाठी आले याची चौकशी केली .काम अडवणूक करण्यासारखे नव्हते म्हणून झटपट झाले.पण साहेबांना वरून डोस देऊन आलो . ठीक आहे ,चप्पल बूट बाहेर काढले पाहिजेत.पण त्यासाठी एखादी मांडणी तर ठेवा .म्हणजे असा पसारा होणार नाही आणि टापटीप ही दिसेल.साहेबांनी सूचना मान्य केली आणि लवकर तशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...