Friday, August 30, 2013

शेतकऱ्याच मनोगत

                                           मित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा शेतकरी असल्यामुळे मला कुठेतरी ते भावलं .हे मनोगत फक्त फेसबुकच्या कट्ट्या पुरताच मर्यादित न राहता ते सगळ्यांपर्यंत पोहोचाव या उद्देशान खाली जसेच्या तसे देत आहे.त्या आधी शेतकऱ्याच मनोगत अतिशय समर्पक शब्दात मांडणार्या `त्या `अज्ञात लेखकाचे आभार मानणे योग्य होईल .
होय आमच्या मुलांनाही मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहावेसे
वाटतात .... पाण्यासारखे पेट्रोल/डीझेल उधळणाऱ्या एसयूव्ही कार
बाईक उडवाव्या वाटतात .... त्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर व्हावेसे
वाटते. उच्चभ्रू राहणीमानाचे माजोरी दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक
शहरी गोष्टीचे त्यांनाही आकर्षण आहे. अशी स्वप्ने पाहणे
गुन्हा आहे काय ? टाटा,
अंबानी यांच्या उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था खरेदी करता येईल
इतकी संपत्ती कमवावी आणि आमची दहा पंधरा एकराची शेतजमीनही
हिसकावून घ्यावी आणि एमआयडीसी च्या यमाने तृप्तीचा ढेकर
द्यावा. आमची अंत:करणे जळत नाहीत का ? बाईक , कार, बस,
रिक्षा तर सोडाच साधे पायी चालत शाळेला जावे असे
रस्तेही आमच्या लेकरा बाळांना मिळत नाहीत.
आमच्या अडलेल्या लेकीसुनांची खड्ड्यातच सुटका होते
याचा अपमान आम्हाला वाटत नाही नसेल का ?
जरा सर्दी खोकला झाला कि सुपर स्पेशालिटीत दाखल
होणाराना महागडी औषधे कधी कडू लागत नाहीत.... मात्र कांदा कडू
लागतो. पेट्रोल/डीझेल कितीही महागले तरी ब्र नसतो...
भाजीपाला स्वस्त पाहिजे... तुमच्या एक वेळच्या शावर आंघोळीत
आमच्या कांद्याचे दोन वाफे भिजू शकले असते. ऐन उन्हाळ्यात
शेतीचे पाणी रोखून शहराला पाणी पुरवले गेले
तेव्हा किती जणांनी आपले शावर बंद केले .... उन्हाळ्यात एक
रात्री कुलर पन्नास लिटर पाणी फस्त करते..... तेवढ्यात ठीबकवर
मोसंबीची चार झाडे जगू शकली असती.. किती जणांनी कुलर वापरणे
थांबवले.... एक एसी तीन एचपी पावर ओढतो... तेवढ्यात
एका शेतकऱ्याचे शेत भिजवता येते .... झाला का एसीचा वापर
बंद ? .... शेतीला मिळणारी वीज इकडे वळवल्यामुळे चाळीस
वर्षापूर्वीची तेलावर चालणारी इंजिने खेड्यात टूकटूक करताना दिसत
आहेत...कारण सोळा सोळा तास वीजच नसते...! का नाही होणार
शेतमाल महाग ... ? खेड्यात वीजच नसते तर कुठला टीव्ही अन
संगणक ? पंखा, कुलर तर विचारातच घ्यायचे नाही ..!
का आम्ही सावत्र आईची लेकरे आहोत ? दिवाळीत शहरे
विषारी दारूच्या धुराने ओसंडून वाहतात
आणि आमच्या पोरांना साध्या टिकल्या उडवत बसावे लागते... काय
त्यांनी शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतल्याचे पाप केले म्हणून ?
त्यांना नाही वाटत कानाचे पडदे फाडणारे फटाके फोडावेत
म्हणून...? शेतकऱ्यांच्या किडन्या फेल होत नाहीत ?
त्यांना हृद्यविकाराचे झटके येत नाहीत ? सरकारी इस्पितळात
डुकरासारखे भरती होताना त्यांना अपमान वाटत नाही ? कुठून
येतील महागड्या उपचारासाठी पैसे ? तुमच्या कुत्र्यांना मिळतात
तसले वैद्यकीय उपचार शेतकऱ्यांच्या गाई,
बैलाला सोडा या माणसांनाही मिळू नयेत ? कुठून येईल हा पैसा ?
उन्हाळ्यात तुम्ही आठ दहा दिवस सकुटुंब सहलीला जाऊन लाखभर
रुपये खर्च करून यावेत... आणि त्यांनी फक्त वारीत पायपीट करून
पर्यटनाचा आनंद मानावा ? एक दिवसाची सुटी टाकून
स्वातंत्र्यदिन विकेंडला जोडून चार दिवसांची मौज
मजा करणारांना माहित आहे
का कधी शेतकऱ्यांनी साजरा केलेला विकेंड ! त्यांचा स्वातंत्र्यदिन
बैलाबरोबर शेतात साजरा होतो..!
जर आम्हा येड्या मुक्याना काहीच स्वप्ने नसतात असे समजत
असाल तर एक दिवस शेतकऱ्यांची पोरे नक्षलवादी म्हणून
भरती व्हायला लागलेली दिसतील. स्वातंत्र्यदिना
च्या पूर्वसंध्येला कांदा हाच जीवनमरणाचा प्रश्न
झालेल्या मित्रांनो भानावर या .... ! भारत पाक क्रिकेट म्याच
असेल तर पाक कडून सीमेवर मारल्या गेलेल्या जवानांचे स्मरण
करायला आम्हाला फुरसत नसते..! हे आमचे देशप्रेम !... म्हणे जय
जवान ... जय किसान.

Thursday, August 22, 2013

हत्या ,खून , हौतात्म्य की बलिदान ,पण मृत्यू तो मृत्यूच !!!


                                                         अनिंसचे नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात भरदिवसा खून झाला. दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी हि बातमी मुख्य पानावर ठळकपणे दिली .त्याचदिवशी कालनिर्णयचे संस्थापक जयंत साळगावकर यांचेही निधन झाले .ती बातमीही दाभोलकरांच्या बातमी शेजारीच होती.वास्तविक दोघा घटनेत एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे दोघांचा जीव गेला होता .मात्र बातमी देताना एका घटनेत हत्या झाली ,खून झाला अशी वाक्यरचना तर दुसर्या घटनेत निवर्तले ,कालवश झाले,निधन झाले अशी वाक्यरचना होती.म्हणजेच जीव गेला ,मृत्यू  झाला हीच घटना किती विविध प्रकारे वृत्तपत्रातून दिली जाते याचे हे उत्तम उदाहरण एकाच दिवशी एकाच पानावर पाहायला मिळाले .अर्थात हे सगळ मृत्यू कशामुळे झाला याच्यावर अवलंबून असते.
      खर तर मृत्यू हा प्रत्येक सजीवाला अटळ आहे.आयुष्यातले सगळ्यात मोठे नुकसान जर कोणते असेल तर ते मृत्यू हे होय .मृत्यूची बातमी देताना मृत्यू कशामुळे झाला यानुसार शब्दरचना बदलत जाते.सीमेवर युद्ध करताना मृत्यू झाल्यास `हुतात्मा झाला `अशी बातमी दिली जाते.याशिवाय `कामास आले`,वीरमरण आले अशीही बातमी दिली जाते .शत्रूचा मृत्यू झाला तर `त्याच्या नरडीचा घोट घेतला ,त्याला यमसदनी पाठवले ,त्यांची मुंडकी उडवली असेही म्हटले जाते.सध्या गुजरातमधील पोलिसांचे प्रकरणही गाजत आहे .पोलिस चकमकीत मृत्यू झाला म्हणून त्याचा `एनकौंटर` केला ,त्याचा गेम केला अशा बातम्या यायच्या.मुंबई पोलिसांच्या चकमकीच्या बातम्या तर मोठ्या रंजक राहायच्या .अमुक टोळीच्या गुंडांचा पोलिसांनी खात्मा केला ,त्याला कंठस्नान घातले , त्याचा मुडदा पाडला ,त्याला नरकात पाठविले अशा चटपटीत बातम्या छापून यायच्या. पण आता ते `एनकौंटर` फेम पोलिसच आरोपीच्या पिंजर्यात अडकल्यामुळे गुंडांना फक्त `कोपरापासून ढोपरापर्यंत `सोलण्याचेच काम चालू आहे . 
            वृद्धापकाळाने,आजारपणात  निधन झाले तर कालवश झाले ,निवर्तले ,निधन झाले ,यांना देवाज्ञा झाली ,वैकुंठवाशी झाले ,प्राणोत्क्रमण झाले ,काळाच्या पडद्याआड गेले,देहावसान झाले ,देहत्याग केला ,महानिर्वाण झाले ,प्राणज्योत मालवली स्वर्गात गेले  अशा विविध प्रकारे बातमी दिली जाते.
 एखाद्या दुर्घटनेत जीव गेला तर ठार झाले ,बळी गेले असे संबोधले जाते .दुसर्याच्या हातून मरण आले तर खून झाला व स्वत:च जीव घेतला तर आत्महत्या केली असे म्हटले जाते.न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्याला जगणे नाकारले जाते तेव्हा त्याला मृत्यूदंड दिला जातो ,त्याला फाशी दिले असे म्हटले जाते.सरकारी यंत्रणेने त्याचा खून केला असे कधी म्हटले जात नाही. एकाद्या हत्येला वध केला असेही संबोधले जाते.
          सर्व घटनांमध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा जीव गेलेला असतो.पण स्थळ काळ वेळ परत्वे त्याच्या जीव जाण्याच्या बातमीचे शब्द बदलत राहतात .
 

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...