Monday, September 22, 2014

पण मित्रहो ,काहीही म्हणा ,दारू पिणे हे वाईटच !!

                                                                                            दारू पिणे वाईट आहे हे पटवून देण्यासाठी एखाद्या दारुड्याने  तुमचा एक तास छळ केला तर ??? अहो घडलय असच ....काल संध्याकाळी माझ्या पुण्याच्या कार्यालयात बसलो असता एक वरपिता आले.`साहेब ,आत येऊ का ?` अशी खास पुणेरी ढंगात परवानगी मागणारी आरोळी आली. आवाजावरूनच माझ्या लक्षात आले की साहेबांचे विमान हवेत उडते आहे.` या या आत या ` म्हणून मी परवानगी दिली.तोल सांभाळत वरपिता खुर्चीत विराजमान झाले आणि सरळ विषयालाच भिडले .साहेब दारू पिणे वाईटच हो ,पण काय करू ,मुलगा लग्न करायला तयारच होत नाही म्हणून मला प्यावी लागते .त्यांची कैफियत लक्षात आल्यावर मीच त्यांची समजूत काढायला सुरुवात केली.`अहो ,मुलगा लग्न करत नाही म्हणून तुम्ही दारू पीता हे काही खरे नाही .खरे असे आहे की तुम्ही दारू पीता  म्हणून मुलगा लग्न करत नाही .`साहेब ऐकतच नव्हते .त्यांचे पुन्हा पुन्हा तेच पालुपद ,साहेब दारू पिणे वाईटच पण काय करू मुलगा लग्न करायला तयारच होत नाही.हे पटवून देण्यासाठी रामायण ,महाभारतापासून ते आजच्या राजकारणापर्यंत सगळे उदाहरण देऊन झाले .मध्येच एखादा वेगळा डायलॉग असायचा ,`सर ,खर सांगतो ,नरेंद्र मोदींनी अस करायला नको होत `.मोदींनी अस काय केल हे आम्हाला शेवटपर्यंत कळल नाही .
                                                              कार्यालयात बसलेल्या आम्हा दोघा तिघांना खुदकन हसू येत होते.वरपित्याचे वय व उच्च राहणीमान लक्षात घेता आम्ही शांत बसणेच पसंत केले .आणि अशाच एका बेसावध क्षणी वरपित्याने मला सरळ ऑफरच दिली .श्रावण संपला साहेब ,गणपतीही संपला ,चला घेऊ थोडीशी .मी पटकन खुर्चीतून उठलो .वरपिता एकदम खुश झाला , ये हुई ना बात  म्हणत टाळीसाठी हात पुढे केला तसा तो मी पकडला आणि कार्यालयाच्या बाहेर घेऊन आलो. रस्त्याने जाणार्या रिक्षाला हात दिला आणि वरपित्याला विचारले कुठल्या बार मध्ये जायचे ? कुठल्यातरी बारचे नाव सांगितले .रिक्षावाल्याला विचारले माहित आहे का पत्ता ? तो हो म्हटला .मग मीही म्हटले `तुम्ही चला पुढे मी आलोच तुमच्या मागे .`  वरपित्याला घेऊन रिक्षा बारच्या दिशेने निघाली आणि थोड्या वेळाने मी नाशिकच्या दिशेने !
पण मित्रहो ,काहीही म्हणा ,दारू पिणे हे वाईटच !!
(हे मी पूर्ण शुद्धीत ,कोणाच्या दबावाला न बळी पडता सांगत आहे ,गैरसमज नसावा !!)

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...