अनिंसचे नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात भरदिवसा खून झाला. दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी हि बातमी मुख्य पानावर ठळकपणे दिली .त्याचदिवशी कालनिर्णयचे संस्थापक जयंत साळगावकर यांचेही निधन झाले .ती बातमीही दाभोलकरांच्या बातमी शेजारीच होती.वास्तविक दोघा घटनेत एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे दोघांचा जीव गेला होता .मात्र बातमी देताना एका घटनेत हत्या झाली ,खून झाला अशी वाक्यरचना तर दुसर्या घटनेत निवर्तले ,कालवश झाले,निधन झाले अशी वाक्यरचना होती.म्हणजेच जीव गेला ,मृत्यू झाला हीच घटना किती विविध प्रकारे वृत्तपत्रातून दिली जाते याचे हे उत्तम उदाहरण एकाच दिवशी एकाच पानावर पाहायला मिळाले .अर्थात हे सगळ मृत्यू कशामुळे झाला याच्यावर अवलंबून असते.
खर तर मृत्यू हा प्रत्येक सजीवाला अटळ आहे.आयुष्यातले सगळ्यात मोठे नुकसान जर कोणते असेल तर ते मृत्यू हे होय .मृत्यूची बातमी देताना मृत्यू कशामुळे झाला यानुसार शब्दरचना बदलत जाते.सीमेवर युद्ध करताना मृत्यू झाल्यास `हुतात्मा झाला `अशी बातमी दिली जाते.याशिवाय `कामास आले`,वीरमरण आले अशीही बातमी दिली जाते .शत्रूचा मृत्यू झाला तर `त्याच्या नरडीचा घोट घेतला ,त्याला यमसदनी पाठवले ,त्यांची मुंडकी उडवली असेही म्हटले जाते.सध्या गुजरातमधील पोलिसांचे प्रकरणही गाजत आहे .पोलिस चकमकीत मृत्यू झाला म्हणून त्याचा `एनकौंटर` केला ,त्याचा गेम केला अशा बातम्या यायच्या.मुंबई पोलिसांच्या चकमकीच्या बातम्या तर मोठ्या रंजक राहायच्या .अमुक टोळीच्या गुंडांचा पोलिसांनी खात्मा केला ,त्याला कंठस्नान घातले , त्याचा मुडदा पाडला ,त्याला नरकात पाठविले अशा चटपटीत बातम्या छापून यायच्या. पण आता ते `एनकौंटर` फेम पोलिसच आरोपीच्या पिंजर्यात अडकल्यामुळे गुंडांना फक्त `कोपरापासून ढोपरापर्यंत `सोलण्याचेच काम चालू आहे .
वृद्धापकाळाने,आजारपणात निधन झाले तर कालवश झाले ,निवर्तले ,निधन झाले ,यांना देवाज्ञा झाली ,वैकुंठवाशी झाले ,प्राणोत्क्रमण झाले ,काळाच्या पडद्याआड गेले,देहावसान झाले ,देहत्याग केला ,महानिर्वाण झाले ,प्राणज्योत मालवली स्वर्गात गेले अशा विविध प्रकारे बातमी दिली जाते.
एखाद्या दुर्घटनेत जीव गेला तर ठार झाले ,बळी गेले असे संबोधले जाते .दुसर्याच्या हातून मरण आले तर खून झाला व स्वत:च जीव घेतला तर आत्महत्या केली असे म्हटले जाते.न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्याला जगणे नाकारले जाते तेव्हा त्याला मृत्यूदंड दिला जातो ,त्याला फाशी दिले असे म्हटले जाते.सरकारी यंत्रणेने त्याचा खून केला असे कधी म्हटले जात नाही. एकाद्या हत्येला वध केला असेही संबोधले जाते.
सर्व घटनांमध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा जीव गेलेला असतो.पण स्थळ काळ वेळ परत्वे त्याच्या जीव जाण्याच्या बातमीचे शब्द बदलत राहतात .
No comments:
Post a Comment