Thursday, April 27, 2023

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पास होणाऱ्या पहिल्या ३० विद्यार्थ्यांना विद्यानिकेतनमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणासाठी प्रवेश मिळत होता. आजसारखे वाड्यावस्त्यांवर इंग्रजी शाळांचे पीक आलेले नव्हते. म्हणून विद्यानिकेतन आपले वेगळेपण आणि महत्व टिकवून होते. अशा शाळेत मला शिकायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यानिमित्त मात्र जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या आठवणीतली एक घटना आठवली तर पोट दुःखेपर्यंत हसू येते. 

                            साधारण ८३/८४ ची घटना असेल. मी तेव्हा सहावीला होतो. एकेदिवशी रोजप्रमाणे शाळा सुरु झाली. तेव्हा विद्यानिकेतनच्या आवाराबाहेर गुंजाळनगरमध्ये 'सेवासदन' या इमारतीत आणि आजूबाजूच्या काही इमारतीत शाळेचे वर्ग भरत असत.त्यादिवशी दुसरा तिसरा तास सुरु असेल.आमच्या वर्गातल्या एका मुलाने सरांकडे तक्रार केली, सर, पोट दुखत आहे. जोराची शी लागली. 'सरांनी तात्काळ त्याला होस्टेलवर जायची परवानगी दिली. सोबत दुसऱ्या मुलाला पाठवले.दोघे बहाद्दर मोठ्या आनंदात होस्टेलकडे निघाले. जाताना दुसऱ्या वर्गातल्या मित्राला 'डब्याला 'चाललो असे हाताने खुणावले. मग त्यानेही सरांना सांगितले, 'सर, माझे पोट दुखते आहे.' सरांनी त्यालाही होस्टेलवर जायला सांगितले. इकडे मुलांना गुरुकिल्लीच सापडली होती.एक एक करून सगळ्या मुलांच्या पोटात दुखायला लागले. शिक्षकांमध्येही खळबळ माजली. सगळ्या वर्गांना तातडीने होस्टेलला परत पाठवले.होस्टेलला तीनच टॉयलेट होते. तिथे काही मुले नंबर लावून उभे. बाकीचे मुले डब्बे भरून भावडी नदीच्या पात्रात रांगेने बसलेली. सगळे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात होती. त्यामुळे भावडीचे पात्र रंगेबेरंगी दिसत होते. विद्यानिकेतन देवळा नाशिक रस्त्यावर असल्यामुळे नदीपात्रातले दृश्य पाहून बातमी सगळीकडे पसरली होती. शाळेने तात्काळ वैद्यकीय पथक बोलावून मुलांवर उपचार सुरु केले होते. देवळा गावातले खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टरही मदतीला धावून आले होते. मुलांना विषबाधा झाली की काय या शंकेने सगळे चिंतातुर झाले.होस्टेलच्या स्वयंपाकी मंडळींचे धाबे दणाणले. जे जे डब्बा घेऊन पळत पळत भावडीच्या पात्रात गेले त्यांच्यावर परत आल्यावर उपचार सुरु झालेत. काही डॉक्टर प्रत्यक्ष भावडीच्या पात्रात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आलेत. यथावकाश सर्वांना बरे वाटायला लागले.आणि दुसऱ्या दिवशी एकेकजण कबुल व्हायला लागला . मला काहीच झाले नव्हते रे, पण तुम्ही जात होते म्हणून मी पण पळत पळत गेलो. मुलांना या प्रकाराची गम्मत वाटत होती. जुलाब थोड्या मुलांना झाले असतील पण बाकीचे जात आहेत तर मग आपण पण गेले पाहिजे अशी बऱ्याच मुलांची मानसिकता होती.अर्थात आम्हीसुद्धा 'न झालेल्या जुलाबाच्या साथीने हैराण होऊन भावडीच्या पात्रात हजेरी लावली होती. पण या खेळात वसतीगृहाच्या त्यावेळच्या रेक्टरना (बहुतेक पाटोळे सर किंवा रा.को. निकम) यांना बदलीच्या स्वरूपात शिक्षा भोगावी लागली. अशी ही जुलाबाची घटना आठवली तर हसून हसून पोट दुखते.


Friday, April 21, 2023

😢 पश्चातापाचे अश्रू 😢

 


समाजबांधवांनो
जय शिवराय 🚩
गेल्या १३ वर्षांपासून मराठा समाजातील वधूवरांचे लग्न जमवताना हजारो पालकांशी संबंध आला.अनेक भलेबुरे अनुभव आलेत.ते मी वेळोवेळी शब्दबद्ध करून समाजासमोर मांडत असतो.असाच एक अनुभव मी आज सांगणार आहे.
समाजबांधवांनो ,गेल्या महिन्यात मी माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी मालेगाव येथे गेलो होतो.तिथे मंगल कार्यालयात एक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते भेटले.त्यांनी मला भेटताच कडकडून मिठी मारली आणि त्यांच्या सोबत असलेल्या वऱ्हाडींना माझी ओळख करून दिली.ओळख करून देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.दिवाळीच्या आधी त्यांच्या मुलीचे लग्न माझ्या माध्यमातून जमले होते त्यामुळे ते आनंदाश्रू असतील असे मला वाटले आणि मी त्या उपस्थितांना तसे बोलून दाखवले. मात्र नेत्यांनी लगेच माझे म्हणणे खोडून टाकले व सांगितले की हे आनंदाश्रू नाही तर हे पश्चातापाचे अश्रू आहेत.मी तुमचे मूल्यमापन करण्यात चुकलो होतो.तरीही तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करून सहकार्य केले त्याबद्दल मी तुमचा जन्मभर ऋणी राहीन.क्षणभर आम्ही सर्व अवाक झालो आणि पटकन दुसऱ्या विषयावर चर्चा सुरु केली .
समाजबांधवांनो ,या अश्रूंची पार्श्वभूमी अशी आहे की, सदर वधूपिता हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते होते.त्यांची कन्या लग्नाची होती.त्यासाठी ते स्थळ शोधत होते. नेते ज्या खात्यात नोकरीला होते त्या खात्याच्या गावोगाव ,वाडीवस्त्यावर शाखा होत्या.त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.कार्यकर्त्यांचे मोहोळ होते.संघटनेत त्यांच्या शब्दाला किंमत होती.तरीही त्यांच्या मुलींसाठी सुयोग्य स्थळ सापडत नव्हते. त्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क केला.तेव्हा मी त्यांना नावनोंदणीची पद्धत व नोंदणी फी सांगितली.मी माझ्या संघटनेतल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मुलामुलींची तुमच्याकडे नाव नोंदणी करायला सांगतो पण माझी फी घेऊ नका असे त्यांनी मला सांगितले. अशा मनोवृत्तीची मला फार चीड असल्यामुळे मी त्यांना तात्काळ फटकारले. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा हजार मुलींचे बायोडाटा मला आणून द्या ,त्यांच्याकडून एक रुपयाही फी घेणार नाही .मात्र तुम्ही डबल पगारी आहात तर तुम्हाला फी द्यावीच लागेल असे त्यांना बजावून सांगितले.त्यांनी नाव नोंदणी केली नाही पण त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्वांनी आपापल्या ओळखीतल्या मुलामुलींचे परिचयपत्रे तेथे टाकावेत असे फर्मान सोडले. हेमंत पगार यांच्याकडे कोणीही नाव नोंदणी करू नये असेही ग्रुपच्या माध्यमातून आवाहन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी अनेक जण माझे मित्र,नातेवाईक होते तर अनेकांनी आधीच त्यांच्या मुलामुलींचे माझ्याकडे नाव नोंदवलेले होते.त्यापैकी काहींनी त्या आवाहनाचा स्क्रिन शॉट काढून मला पाठवला.असे अनेकजण भेटतात म्हणून मी त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आणि विसरून गेलो.चारसहा महिन्यानंतर सर्वांचा उत्साह आटला व तेच ते बायोडाटा पाहून सर्व कंटाळले आणि ग्रुप बंद पडला .
मध्यंतरी दोन अडीच वर्षाचा काळ लोटला.नेत्यांच्या मुलीला काही यॊग्य स्थळ सापडत नव्हते. घरात नेत्यांमध्ये आणि बायकोमध्ये कुरबुरी चालू झाल्या होत्या.बायको,कार्यकर्ते सगळे सांगत होते हेमंत पगारांकडे नाव नोंदणी करा.पण नेते कोणाचे ऐकत नव्हते. माझा मित्र असलेल्या व नेत्यांच्या एका उत्साही कार्यकर्त्याने परस्पर मुलीचा बायोडाटा व फोटो पाठवून दिला व नोंदणी फी फोन पे ने पाठवून दिली.जोपर्यंत मुलीचे पालक स्वतः जबादारी देत नाहीत,तोपर्यंत मी नावनोंदणी करणार नाही.उद्या त्यांनी काही आक्षेप घेतला तर त्याला जबाबदार कोण असे सांगून मी आलेली फी परत पाठवून दिली.
सदर खात्यात काम करणारा जो कोणी भेटला तो मला नेत्यांच्या मुलीला स्थळ पाहायला सांगत होता. विरोधी संघटनेत काम करणारे खिल्ली उडवत होते .
एका दिवशी या संघटनेत काम करणाऱ्या माझ्या मित्रांचा फोन आला,हेमंत तू उद्या ऑफिसला आहेस का ? तुला भेटायला यायचे आहे.मी होकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसबाहेर गाडी येऊन उभी राहिली.पांढरे शुभ्र कपडे घातलेले सर्व मंडळी नेत्यांबरोबर ऑफिसमध्ये आल्यावर लक्षात आले की हे नेत्यांच्या मुलीचे नाव नोंदवायलाच आलेले आहेत.झाले गेले विसरून जा आणि नाव नोंदवून घ्या असे सर्व जण सांगत होते. नेते मात्र खजीलपणे शांत बसले होते .शेवटी मीच त्यांना बोलते केले .माझ्याबद्दलचा मनातला द्वेष काढून टाका ,मी येथे कोणाचे वाईट करण्यासाठी बसलेलो नाही असे त्यांना सांगितले आणि मुलीचे नाव नोंदवून घेतले.
समाजबांधवांनो , मला सांगायला आनंद वाटतो की, सप्टेंबर मध्ये नावनोंदणी केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात मुलीचे लग्न जमले आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दणक्यात साखरपुडा झाला.
केवळ फी मागितली म्हणून माझ्याबद्दल द्वेष बाळगल्यामुळे लग्नाला उशीर केला आणि घरातल्या सर्वांचे मनस्वास्थ खराब केले.त्याचाच पश्चाताप त्यांना मालेगावच्या भेटीत झाला आणि डोळ्यात अश्रू तरळले. हे पश्चातापाचे अश्रू आहेत असे त्यांनी स्वतःच कबूल केले.
असे अनेक जण आहेत.लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करतील पण नाव नोंदणी फी सांगितली की मलाच प्रवचन देतात आणि मुलामुलींचे वय वाढेपर्यंत स्थळ शोधत फिरतात.
May be a close-up of 1 person


All reactions:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...