Monday, October 17, 2022

*डबल ढोलकी*

 मित्रांनो,

जय शिवराय
तुम्हाला आश्चर्य वाटले असेल हेमंत पगार यांनी स्थळांची माहिती पाठवण्याऐवजी डबल ढोलकी म्हणून काय पाठवले ? ते सर्व सांगण्याआधी डबलढोलकीला दुतोंडी किंवा गांडूळ हे पर्यायी शब्दही वापरले जातात हे सांगून ठेवतो. *बोलायचे एक आणि करायचे त्याच्याविरुद्ध अशा प्रवृत्तीच्या लोकांना महाराष्ट्रात डबल ढोलकी असे म्हटले जाते.* अशाच एका डबल ढोलकी पालकाचा किस्सा तुम्हाला सांगतो.
झाले असे की, काल एका पालकाचा मला फोन आला होता.त्यांनी त्यांच्या मुलाचे माझ्याकडे नाव नोंदवलेले आहे.फोनवर त्यांनी मेळावा कसा झाला ? माझी तब्बेत कशी आहे ? अशी बरीच चौकशी केली.ते कामापेक्षा जास्त गोड बोलत होते त्यामुळे *कुछ तो गडबड है* असे लगेच माझ्या लक्षात आले. हे महाशय व त्यांच्या पत्नी मुलाचे नाव नोंदवायला व त्यानंतर दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन गेले आहेत.प्रत्येकवेळी त्यांचे म्हणणे असायचे की आम्हाला हुंडाबिंडा काही नको फक्त चांगली माणसे व चांगली मुलगी पाहिजे.आम्हाला मुलगी नाही. त्यामुळे आम्ही तिलाच मुलगी मानू. आज मात्र ते नेमके याच्या उलट बोलत होते.त्यांनी मला असे सांगितले की तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आमचे एका ठिकाणी लग्न ठरल्यासारखेच होते,पण मुलीचा बाप भलताच शहाणा होता म्हणून काही ठरले नाही.तुम्हाला मध्यस्थी करता आली तर बघा असा प्रस्ताव त्यांनी मला दिला.नक्की काय झाले असे मी त्यांना विचारले तर म्हणतात कसे,आम्ही दोनेक महिन्यांपूर्वी एक मुलगी पसंत करून ठेवली होती.पितृपक्ष संपल्याबरोबर लग्नाची पक्की बोलणी करण्यासाठी मुलीच्या पालकांसोबत बैठक झाली.अहो मी त्यांना सांगितले की हुंडाबिंडा काही नको फक्त मुलीच्या अंगावर ३० तोळे सोने घाला.तर त्यांनी फक्त २० तोळ्याची तयारी दाखवली.आमचे म्हणणे ऐकायला तयारच नाही. म्हणून आम्ही पुढची बोलणी बंद केली. तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा.
मी त्यांना सांगितले की ,मुळात मी अशी काही कामे करत नाही.पण त्यांना समजावण्यापेक्षा तुम्हाला नक्की समजावू शकतो. तुम्ही तर मला नेहमी सांगत होते की आम्हाला हुंडा बिंडा काही नको फक्त चांगली मुलगी आणि चांगले कुटुंब पाहिजे.मग आता सोने तरी कशाला मागतात ? *हा सुद्धा एक प्रकारे हुंडाच झाला.* प्रत्येक मुलीचा बाप त्याच्या स्वखुशीने किंवा ऐपतीप्रमाणे न मागता देतच असतो.मग २० तळ्यावर समाधान मानायला काय हरकत आहे. शिवाय दर महिन्याला एक तोळा सोन घेईल एवढा मुलीचा पगार आहे.शेवटी हा तुमचा आपापसातला मामला आहे .
त्यांना माझ्या स्वभावाची कल्पना नसेल म्हणून एवढे ऐकून सुद्धा त्यांनी मला पुन्हा आग्रह केला की तुम्ही त्यांना शब्दभर सांगून पहा.तीस तोळे देत असतील तर पुढे जायला काही हरकत नाही. अशा वेळेस मात्र मी माझा संयम गुंडाळून ठेवतो आणि अशा *लालची* लोकांना, भले ते वयाने ,शिक्षणाने,ऐपतीने मोठे असले तरी,त्यांना धडा शिकवायची संधी सोडत नसतो. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन त्यांची *डबलढोलकी मनसोक्त बडवली* आणि पुन्हा फोन करू नका असे ठणकावून सांगितले.
*--------------------*
@ *हेमंत पगार* ,
मराठा शुभ लग्न डॉट कॉम,
नाशिक .
8275583262.

Saturday, April 16, 2022

नियती इतकी क्रूर असू शकते का ?

 

आज बरोबर दोन महिने झालेत त्यांच्या स्पेशल व्हॅलेंटाईन डे ला.
माहित नाही का पण तो त्या दिवशी खुशीत होता आणि तिला म्हणाला आज तुला व्हॅलेंटाईन डे ची पार्टी देतो.
आपल्या दोन मुलांसमोर ती लाजतच म्हणाली लग्नाला इतके वर्ष झालेत आणि आज काय सुचलं तुम्हाला व्हॅलेंटाईन डे ला पार्टी द्यायला.
त्याने मुलांनाही पार्टीचा आग्रह केला .पण मुलं शहाणी. आम्ही कशाला तुमच्या दोघांच्यात .तुम्हीच साजरा करा व्हॅलेंटाईन डे असं म्हणून मुलांनी बापाची पार्टीची ऑफर नाकारली आणि दोघांना प्रायव्हसी दिली .
तसा तो नाशिकच्या एका मोठ्या हॉटेलात नोकरीस होता.हॉटेलच्या भारतभर असलेल्या शाखांमध्ये त्याला वर्षातून पाच दिवस मोफत राहायला मिळत होते.त्याचा ते दरवर्षी आनंद घेत.
पण आजचा दिवस त्याला दुसऱ्या हॉटेलमध्ये पार्टी करायची होती.म्हणून त्याने त्रंबक रोडवरची हॉटेल निवडली. दोघेही छान नटूनथटून गेले. जाताना एका दुकानात थांबून त्याने तिला कानातल्या रिंग घेऊन दिल्या.
इकडे आमच्या बिल्डिंगमधल्या महिलांची हळदीकुंकवाची धावपळ चालू होती. सगळ्या महिला एका घरी जमल्या होत्या.माझी बायकोही त्यांच्यात होती.पाच पंचवीस बायांचा तो नेहमीचा ग्रुप जमला होता.पण त्या घोळक्यात ती मात्र नव्हती.नवऱ्याबरोबर व्हॅलेंटाईन डे ची पार्टी एन्जॉय करत होती.अचानक कुणालातरी आठवलं .अरे ती अजून आली नाही. एकीने लगेच कॉमेंट केली. अरे ती नेहमीच स्लो असते येईल थोड्या वेळात. सगळ्या खळखळून हसल्या.अरे ती स्लो आहे पण भोळी आहे हं, दुसरीने तिची बाजू मांडली.माझ्या बायकोने गुप्त बातमी जाहीर केली.अरे ती स्लो वैगरे काही नाही हं .मस्तपैकी नवऱ्याबरोबर व्हॅलेंटाईन डे ची पार्टी करायला गेली आहे.असा हास्य विनोद चालू असतानाच ती हळदीकुंकूवाला हजर झाली.
सगळ्यांनी तिची खूप मस्करी केली .या वयात व्हॅलेंटाईन डे साजरा करते. तू नशीबवान आहेस. असे बोलून तिला चिडवत होते.तीही मस्त यांच्यात सामील झाली.
आज या गोष्टीला बरोबर दोन महिने झालेत.
आज ती घरात नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून मृत्युंजय जप करते आहे.
तिला अजूनही माहित नाही की तिचा नवरा दोन दिवसांपूर्वीच लांबच्या प्रवासाला निघून गेला आहे.
ती आजारपणाने खूपच अशक्त झालेली आहे म्हणून तिला लगेच काही सांगू नका असे सर्वांचे ठरले होते.
सध्या पसरलेल्या जीवघेण्या आजारातून बरे झाल्यावर दोन दिवसांपूर्वी तिला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा तो व्हेंटिलेटरवर होता.
त्याला शेवटचे पाहताना तिने डॉक्टरांना विचारले ,आमच्या `यांना` कधी डिस्चार्ज देणार आहेत ?
डॉक्टरही निशब्द होते .
जसे आज आम्ही आहोत.
कारण आम्हीही आमचा एक चांगला मित्र गमावलेला होता.
म्हणून विचारावेसे वाटते,
नियती इतकी क्रूर असू शकते का ?
मित्रा ,तुला भावपूर्ण श्रद्धांजली .

Friday, April 1, 2022

 

😎

दोनाचे चार झाले

😎

काय योगायोग आहे बघा. तारीख २/२/२२ म्हणजे चार वेळा दोन.या दिवशी माझे दोन डोळ्यांचे चार डोळे झालेत. उपवर मुलामुलींचे दोन हाताचे चार हात करताकरता माझे दोन डोळ्यांचे चार डोळे झालेत असे मी आता म्हणू शकतो. मित्रांनो,गेल्या काही दिवसांपासून मला दृष्टिदोष जाणवत होता.एका मित्राने सांगितले,दुनियामे बुराई इतनी हो गयी कि आंखे भी कुछ देखणा पसंद नही करती.असेच काहीतरी असेल म्हणून परवाच्या गांधी पुण्यतिथीला मी बुरा मत देखो चा प्रयोग करून पाहिला.सकाळी उठल्यापासून डोळ्यांवर घट्ट पट्टी लावून मी घरात फिरत होतो. डोळे बंद असतानासुद्धा घरात मी सराईतपणे फिरत होतो. मात्र ऑफिसला जायला निघालो तेव्हा पार्किंग मध्ये ठिकठिकाणी ठेचकाळत होतो.काही अघटित नको घडायला म्हणून बुरा मत देखो चा प्रयोग अर्ध्यावरच सोडून डोळ्यावरची पट्टी काढून टाकली आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायचे ठरवले.त्याचा मुहूर्त आज २/२/२२ ला सापडला .डॉक्टरांनी तपासणी करून दूरदृष्टीचा अभाव असल्याचे निदान केले. मनात विचार आला की ज्या वयात आपल्याला दूरदृष्टी हवी होती त्या वयात कल का सपना किसने देखा असे म्हणत `आज,आता,ताबडतोब` या त्रिसूत्रीच्या प्रभावाखाली होतो.त्यामुळे दूरदृष्टीचा कधी विचारच केला नाही.आता सर्वकाही दृष्टीपथात आले असताना डॉक्टरांनी सांगितले की दूरदृष्टीचा अभाव आहे.त्यांचे म्हणणे मला मान्य करावे लागले.
.खरतर हा शरीराच्या एका अवयवाने दुसऱ्या अवयवाचा केलेला हेवा आहे असे मला वाटते. डोळ्यांना वाटत असेल की आपल्याच खाली असलेल्या नाकाला हा दोन वर्षांपासून मास्क नावाचे आवरण घालून फिरत आहे.मग मला का आवरण नको ? म्हणून डोळ्यांनीही नाकावर टिच्चून बसेल असे आवरण घेतले.नशीब कानांनी अजून काही हेवा केला नाही.
असो. टकल्या म्हणून चिडवणाऱ्या मित्रांना आता चारडोळ्या ,ढापण्या म्हणूनही चिडवायला संधी मिळेल.डोक्यावरच्या निम्म्यापेक्षा जास्त केसांनी आमची साथसंगत सोडली असताना आणि आहेत त्यांनीही पांढरा रंग स्वीकारून आमच्या भरवश्यावर राहू नका असा संदेश देऊन टाकला आहे. अशा वयात फक्त बायकोच लडिवाळपणे म्हणू शकते, 'तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी की नजर ना लगे चष्मेबद्दूर `,😍

Sunday, January 5, 2020

🍑 हापूसच्या पेटीतले रायवळ आंबे 🥭


(लेख मोठा असला तरी शेवट मात्र जरूर वाचा )
लग्नांचा हंगाम सुरु झाला असून वधूवरांच्या पालकांची धावपळ नको व एकाच ठिकाणी त्यांना अनेक स्थळे पाहायला मिळावीत म्हणून मी वधुवर परिचय मेळाव्यांचे आयोजन करीत असतो.त्याला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.मात्र गेल्या दोन तीन मेळाव्यांपासून काही लोकांशी माझे खटके उडत आहेत.योगायोगाने म्हणा किंवा काय हे सर्व लोक वेगवेगळ्या महाविद्यालयांमधले  प्राध्यापक आहे. हे प्राध्यापक माझ्यामागे शनीसारखे लागले की काय अशी मला शंका यायला लागली आहे.  त्यांच्यासाठीचा अंगारा धुपारा माझ्याकडे आहे आणि अर्थात हे शनी महाराज मोजकेच आहेत म्हणून मी लेखाचे शीर्षक समर्पक असे लिहले आहे.याविषयावर लेख लिहावा असे मला कधी वाटले नाही.परंतु परवाच्या माझ्या मालेगाव मेळाव्यात एका प्राध्यापकाशी माझा पंगा पडला आणि तेव्हापासून एकदा लिहावेच असे मला वाटू लागले.या प्राध्यापकांनी गेल्या महिन्यात माझ्याकडे मुलीचे नाव नोंदवले आहे.मुलगी उच्चशिक्षित असून नोकरीला आहे.नावनोंदणीपासून त्यांना अनेक स्थळांची माहिती त्यांच्या व्हाट्सअपवर पाठवली आहे .तरीसुद्धा ते इतर समाजबांधवांसमोर माझी हजेरी घेत होते.सटरफटर स्थळे दाखवतात.जरा दहा पंधरा लाख पॅकेज असलेले स्थळे दाखवा असे त्यांचे म्हणणे होते.म्हणून मी त्यांना त्यांच्या व्हाट्स अप वर पाठवलेली दोन स्थळे दाखवली.दोघं मुलांना चांगले पंधरा लाखाच्या आसपास भरभक्कम पॅकेज होते.त्यातल्या एका मुलाचा फोटो दाखवत सरांनी मला विचारले याचे थोबडे पाहण्यासारखे तरी आहे का ? इतका वेळ मी राखून ठेवलेला संयम सोडला आणि तात्काळ त्यांना उत्तर दिले . सर ,एवढी गुर्मी बरी नव्हे. तुम्ही प्राध्यापक आहात.दुसऱ्याच्या मुलाबद्दल बोलताना जरा विचार करायला हवा.उद्या तुमच्या मुलीबद्दल कुणी असे बोलले तर तुम्हाला काय वाटेल ? माझा पारा चढलेला पाहून प्राध्यापक महाशयांनी पाय काढता घेतला .पण दिवसभर माझ्या डोक्यात त्यांची गुर्मी घर करून राहिली.हा झाला मालेगाव मेळाव्याचा किस्सा .
 आता नाशिक मेळाव्यातल्या रायवळ आंब्याची गोष्ट. खरं तर यांनी यांच्या मुलामुलींच्या स्थळाची  जबाबदारी आपल्याकडे दिलेली असते.लोकांशी कसे वागत असतील माहित नाही पण निदान आपल्याशी तरी यांनी सौजन्याने वागले पाहिजे.तेव्हा आपण यांच्या स्थळाची दुसऱ्यांकडे वकिली करू शकतो.नाशिकच्या मेळाव्यात एक प्राध्यापक महाशय नेहमी फुकट घुसून येतात . मेळावा आयोजित केलेल्या हॉलचे भाडे ,आयोजनासाठी येणारा खर्च, जाहिरातीचा खर्च वसूल व्हावा  आणि अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून माफक प्रवेश फी ठेवलेली असते.सदर प्राध्यापकांना मी या आधीच्या दोन तीन मेळाव्यांना आले असता फी भरण्याचा आग्रह करायचो.तेव्हा ते घरी निघून जायचे.आताच्या मेळाव्यात मात्र मी तसा आग्रह केला नाही.त्यांना बसू दिले .नंतर मुख्य कार्यक्रम सुरु व्हायच्या आधी माइकवरून सर्वांना विनंती केली की ज्यांनी फी भरून फॉर्म घेतले नसतील त्यांनी त्वरित घ्यावे. थोड्या थोड्या अंतराने तीन वेळा पुकारून सुद्धा महाशय शांत बसले होते.चांगला दीड एक लाख रुपये पगार.बायकोही नोकरीला आणि जिचे लग्न करायचे आहे तीसुद्धा नोकरीला .तरीसुद्धा तीनशे रुपये फी भरायला टाळाटाळ.शेवटी मी त्यांचे नाव पुकारून विचारणा केली.त्याचा त्यांना प्रचंड राग आला आणि कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली.तुझ्याकडे बघून घेतो अशी गुंडगिरीची भाषा सुरु केली.दोन महिला पालकांनी त्यांना दम भरला तेव्हा कुठे ते सभागृहाच्या बाहेर गेले.
 तिसरा किस्सा सटाणा मेळाव्याच्या आद्ल्या दिवशीचा सुरगाणा महाविद्यालयातल्या रायवळ आंब्याचा.हा नेमका आमच्याच गावाजवळचा.पण ओळख नव्हती. रात्री जवळपास साडेदहा पावणे अकरा वाजता फोन आला.मी डॉक्टर बोलतोय म्हणून सुरुवात झाली .उद्याच्या मेळाव्याला किती फी ठेवली अशी डॉक्टरांनी चौकशी केली.मीही सांगितले ,तीनशे रुपये फी आहे म्हणून.तिकडून महाशय माझ्यावर तडकले ,तुम्ही लोकांकडून पैशे कशाला घेतात ? मी माझी भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.डॉक्टर ऐकेच ना. तुम्ही हॉलचे भाडे भरा,मी लोकांकडून एक रुपयाही घेणार नाही असा  प्रस्ताव त्यांना दिला .त्यालाही स्वारी बधेना .मी त्यांची चौकशी केली ,डॉक्टर तुम्ही कुठे प्रॅक्टिस करतात ? त्यावरही त्यांचे उत्तर , मी काय करतो हे विचारने गरजेचे आहे का ? त्यांच्या बोबड्या बोलांवरून ते बैठकीला बसलेले होते हे मला कळून चुकले होते.मी थोड्या प्रेमाने चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांचे गाव सांगितले व मी वैद्यकीय डॉक्टर नसून प्राध्यापक डॉक्टर आहे आणि मला सगळे तात्या म्हणतात अशी माहिती दिली.महाशयांच्या गावात आणि माझ्या गावात फक्त नदी आडवी.ओळखपाळख निघाली तरी त्यांचा एकच घोषा, तुम्ही पैशे का घेतात ? यांची वाकडी शेपटी अशी काही सरळ होणार नाही हे मी ओळखले आणि त्यांचा यथेच्छ समाचार घेत माझ्यातले सुप्तगुण मनसोक्त उधळले .
 असे अनेक रायवळ आंबे आहेत.पण आता एक शेवटचा किस्सा थोडक्यात सांगतो. माझ्या एका नातेवाईकाने त्याच्या प्राध्यापक मित्राला मुलीच्या नावनोंदणीसाठी माझ्याकडे पाठवले होते.नावनोंदणीचे सगळे सोपस्कार पार पडले .फी जमा केली आणि शेवटी त्यांना मुलाबद्दलच्या अपेक्षा विचारल्या.मुलगा मुंबई,पुण्याला नोकरी करणारा असला पाहिजे.नाशिकला नोकरीला असला तरी चालेल पण त्याला एक अट राहील. अट विचारली तर त्यांनी निर्लज्जपणे सांगितले ,मुलाने लग्नानंतर आईवडिलांपासून वेगळे राहिले पाहिजे . 🙏 भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी*🙏 या उक्तीप्रमाणे तात्काळ त्यांचा बायोडाटा त्यांच्या तोंडावर मारून फेकला आणि घेतलेली फी परत केली.झाला प्रकार त्यांना अनपेक्षित होता.त्यांना *घरातून हाकलून देताना सांगितले,तुम्ही लोक समाजाला कलंक आहात.निघा इथून ,पुन्हा तोंड दाखवू नका. ज्या नातेवाईकाने त्यांना माझ्याकडे  पाठवले त्याच्याकडे त्यांनी माझी तक्रार केली मात्र कशामुळे हाकलून दिले हे सांगितले नाही .त्या नातेवाईकाला माझ्या स्वभावाची कल्पना होती म्हणून त्याने त्यांनाच जाब विचारला ,तुमचेच काहीतरी चुकले असेल म्हणून हेमंत तुमच्याशी असा वागला.
  मित्रांनो ,हे सगळे किस्से सांगण्यामागे कोणाची बदनामी करण्याचा हेतू नाही. नाशिक जिल्ह्यातले   अनेक प्राध्यापक ,काही महाविद्यालयांचे प्राचार्य माझे नातेवाईक,मित्र आहेत.त्यांच्या बुद्धिमत्तेचा ,ज्ञानाचा सुगंध हापूसच्या सुगंधासारखा दरवळत असतो.वेळोवेळी त्यांचे सहकार्य,मार्गदर्शन मला मिळत असते. त्यांच्या पेटीत सापडलेले हे रायवळ आंबे समाजासमोर ठेवणे गरजेचे आहे.कारण सोयरीक संबंध जुळवताना बोटचेपे धोरण ठेवले तर अशा रायवळ आंब्यांमुळे कोणाचे तरी आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता असते .असे होऊ नये म्हणून मी जास्तीत जास्त स्पष्ट बोलत असतो.भले चार लोक माझ्याकडे कमी आले तरी चालतील. पण जे येतील ते उच्च विचारांचे, शुद्ध चारित्र्याचे आणि खानदानी असले पाहिजेत असा माझा आग्रह असतो.
 (कृपया यांची नावे कोणी विचारू नये. विचारले तरी सांगितले जाणार नाही.कारण त्यांच्या पाल्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हढी नैतिकता मी पाळतो) 

Tuesday, August 27, 2019

मावशी

`मावशी ` हा शब्द उच्चारला,वाचला किंवा ऐकला की माझ्या अंगाला कापरं सुटायला लागत .असे का ? तर त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो.
मागच्या वर्षी मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार विजय चव्हाण यांचे निधन झाले. सोशल मीडियावर त्यांना वाहिलेल्या प्रत्येक श्रद्धांजलीत `मोरूची मावशी ` असा उल्लेख होता .तसे अपरिहार्य होते.कारण त्यांनी त्या भूमिकेला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले होते. म्हणून मोरूची मावशी हे बिरुद त्यांना मरेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा चिकटलेले आहे. वास्तविक हे स्त्रीलिंगी बिरुद असून सुद्धा विजय चव्हाण यांना त्याचा कधी अपमान वाटला नाही . पण एकदा एका बाईला मी मावशी म्हटले आणि माझ्यावर जो प्रसंग गुदरला तेव्हापासून मी मावशी या शब्दाचा धसकाच घेतला आहे. त्याचे झाले असे, दोन तीन वर्षांपूर्वी मी पुण्याहून नाशिकला यायला निघालो. दर शनिवार रविवार मी पुण्याच्या ऑफिसला असायचो आणि रविवारी रात्री नाशिकला परत यायचो. त्या रविवारीही परत येण्यासाठी शिवाजीनगर बस स्टॅन्डला आलो तर एशियाड बस नुकतीच निघून गेली होती. थंडीचे दिवस होते.रात्रीचे जवळपास अकरा वाजत आले होते .अजून अर्धा तास कुडकुडत बसण्यापेक्षा जी बस मिळेल ती पकडायची आणि मार्गी लागायचे म्हणून पेठ डेपोच्या लाल बसमध्ये बसलो .बस प्रवासांनी भरत आली होती आणि तेवढ्यात आठ दहा महिलांचा घोळका बस मध्ये शिरला .पंढरपूर किंवा कुठूनतरी देवदर्शन घेऊन आलेल्या या महिला होत्या. जवळपास सगळ्या उतारवयाकडे झुकलेल्या होत्या .त्यापैकी काही महिला मिळेल ती जागा पकडून स्थानापन्न झाल्या . ज्यांना जागा मिळाली नाही त्या उभ्या राहिल्या. अशा वेळेस माझ्यातला समाजसेवक जागा होतो.मी पटकन माझी जागा रिकामी करून एखाद्या महिलेला देतो.पण त्या दिवशी पुण्यापासून नाशिकपर्यंत प्रवास करायचा होता.दिवसभराचा थकवा होता .तशात थंडीने कहर केलेला होता .रात्रीची वेळ होती . अशावेळेस समाजसेवा व्यवहार्य ठरणार नव्हती.म्हणून मी शांत बसलो .पण काही महिला उभ्या आहेत हेही मला सहन होत नव्हते.म्हणून एका बाईला म्हटले ,`मावशी ,त्या पुढच्या बाकावर दोघी जणी बसल्या आहेत तिथे थोडी जागा करून तुम्ही बसून घ्या . झाले ,मी मावशी म्हटले आणि त्या बाईला काय राग आला काय माहिती. तिने अगदी अरे तुरे करत मला जाब विचारायला सुरुवात केली .मी काय तुला म्हातारी दिसते कारे मला मावशी म्हणतो तर ? तू काय स्वतःला एवढा तरुण समजतो काय ? . एवढ्या थंडीतही मला घाम फुटायला लागला होता .झोप येत होती येत तर तीही कुठल्या कुठे उडून गेली . बाईंची टकळी अव्ह्याहत सुरु होती .तशात आणखी एकीने तिची झील ओढायला सुरुवात केली .म्हणून तिला दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले. बस खेडच्या जवळपास आली होती. हे महिलामंडळ सिन्नरला उतरणार होते. आता सिन्नरपर्यंत काय काय भोगावे लागेल याचा विचार घाम फोडत होता. आजूबाजूच्या प्रवाशांची झोप मोड होत होती .या सर्व घटनेचे ते सुरुवातीपासून साक्षीदार होते म्हणून बरे . नाहीतर महिलांची बाजू घ्यायला सगळे तत्पर असतात. अशात माझे सुदैव उजाडले. झोपमोड होते म्हणून एका वयस्कर प्रवाशाने त्या बाईला झापायला सुरुवात केली आणि त्यांना मग इतर प्रवाशांनी साथ दिली. त्याने मावशी म्हटले यात काही चुकले का त्याचे ? मग कशाला एवढी बडबड करून राहिली असा सर्वांनी तिला दम भरला तेव्हा कुठे ती नरमली आणि पुढचा प्रवास शांततेत झाला . त्या दिवसापासून मी चुकून कोणत्याही महिलेला मावशी म्हणत नाही .

Friday, July 13, 2018

.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !

.....तर महासत्ता हे दिवास्वप्नच !
कोणाच्या पापामुळे यांच्यावर उंदीर विकण्याची आणि खाण्याची वेळ आली ? या पोस्टवर मोदींचे समर्थक लगेच मागच्या सरकारांवर खापर फोडतील तर नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांच्या तोफा मोदींना टार्गेट करतील .मात्र सोशल मीडियावर विनोदाने फिरणारा हा फोटो माझे मन बेचैन करत होता.घरात बसून ऑनलाईन पिझ्झा बर्गरची ऑर्डर देऊन ते मागवून खाण्याचे दिवस आलेत तरी सुद्धा देशाच्या अनेक भागातील आठवडे बाजारातील हे दृश्य नेहमीचेच आहे.`त्यांच्यात` उंदीर खाण्याची परंपरा आहे असे म्हणून आपण पळवाट शोधू शकतो. परंतु सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही .स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला तरी सरकार यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नाही ही खेदाची बाब आहे.आज देशभर अन्नधान्याची गोदामे भरभरून वाहत आहे.इतकी कि धान्य ठेवायला जागा अपुरी पडते आहे .अनेक रेल्वे स्टेशन्सवर बाजार समित्यांच्या आवारात धान्याच्या थप्प्याच्या थप्प्या पावसात भिजत आहे. मग ते धान्य या लोकांना वाटायला सरकारला लाज वाटते कि काय हे समजायला मार्ग नाही.देशाचे नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. मोठमोठ्या समारंभातून अन्नपदार्थांची नासाडी आपण थांबवली पाहिजे. सध्या लग्नसमारंभ किंवा हॉटेलांमध्ये अन्न उष्ट टाकायचे फ्याड आले आहे. लग्नांमध्ये ताटात स्वतःच्या हाताने वाढून अर्धे जेवण फेकण्यात लोकांना मोठेपणा वाटतो.वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येसुद्धा एकमेकांच्या तोंडाला केक चोपडण्याचे आणि डोक्यावर अंडे फोडण्याची विकृती समाजात आली आहे. `अन्न हे परब्रम्ह ` ही आपली संस्कृती असताना अन्न पायदळी तुडवले जाते.जोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी उंदीर खाणाऱ्यांमधील आणि संपत्तीचा माज आला म्हणून अंडे फोडणाऱ्या,अन्न पायदळी तुडवणाऱ्यांमधील दरी बुजवली जात नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता बनेल याचे आपण स्वप्न पाहू नये .

Wednesday, May 24, 2017

शाब्दिक दणका

  गोड बोलून जर एखाद्याला सांगितलेले समजत नसेल तर शाब्दिक का होईना पण दणका द्यावाच लागतो .म्हणतात ना `उंगली तेढी करनी पडती है `.हल्ली आर्चीच्या भाषेत विचारतात ,`इंग्लिश मध्ये सांगू का ?`.असाच दणका मागच्या आठवड्यात एका पालकाला दिला .
           झाले असे ,मागच्या आठवड्यात माझ्या माध्यमातून एक लग्न जमले.वधु पक्ष व वर पक्षाकडचे असे दोघेही माझे जुने संबंधित होते.म्हणून लग्न जुळविण्यास फार अडचण आली नाही.मुलगा मुलगी दोघेही उच्चशिक्षित .एकमेकाला अनुरूप आणि एकमेकांची पसंती .लग्न कसे करायचे ,कुठे करायचे यावर दोघा पक्षाकडून परस्पर एकमत झाले.पण दुपारी  की गोरज मुहूर्तावर करायचे याबाबत तिढा निर्माण झाला .प्रकरण माझ्याकडे आले.मुलीचे वडील ग्रामीण भागात राहणारे आणि मुलाचे नाशिकमध्ये.तरी नाशिकमध्ये दुपारी लग्न काढून द्यायला वधूपिता राजी .पण वरपित्याचा  हट्ट गोरज मुहूर्ताचा .शे सव्वाशे किलोमीटर वरून वऱ्हाड येणार ,रात्री उशिरा परत जाणार .अनेक वऱ्हाडी मंडळी शेतात राहणारे .त्यांची अडचण होईल .गोरज मुहूर्ताच्या लग्नाचा खर्चही वाढणार होता.म्हणून वधूपिता गयावया करीत होता. मी वरपित्याला या सर्व अडचणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.थोडेशे वातावरण हलके व्हावे म्हणून `चला मंगल कार्यालय तर शोधू ` असे म्हणून एका कार्यालयात चौकशी साठी गेलो .वधूपिता आणि त्यांचा एक जोडीदार कार्यालयाच्या एका टोकाला अंदाज घेत उभे होते.ती संधी साधून वरपित्याचे माझ्यामागे टुमणं ,तुम्हीच सांगा यांना गोरज मुहूर्तावर लग्न करायला . शेवटी माझाही संयम संपला .वरपित्याचे कच्चे दुवे मला माहित होते.गेल्या तीन वर्षांपासून मुलगी शोधत होते.त्यामुळे मी झटकन त्यांना पर्याय दिला .त्यांना थोडेसे दटावूनच सांगितले ,`तुम्ही असे करा ,या माणसाची गोरज मुहूर्तावर लग्न काढून द्यायची काही परिस्थिती नाही.तुम्ही उद्या दुसरी मुलगी शोधून टाका आणि त्यांनाही सांगतो दुसरा जावई शोधायला .हा विषय आता इथेच थांबवूया .` असे म्हणून मी वधुपित्याला माझ्याकडे येण्याचा आवाज दिला .तेवढ्यात वरपित्याने माझा हात पकडून दाबायला सुरुवात केली आणि म्हणायला लागला ,जाऊ द्या जाऊ द्या दुपारचाच मुहूर्त ठेऊ .माझी काही हरकत नाही .
          शेवटी `उंगली तेढी `करावी लागली तेव्हा कुठे वरपिता ठिकाणावर आला आणि गोरज मुहूर्त टाळला .


- हेमंत पगार ,मराठा शुभ लग्न डॉट कॉम ,नाशिक .मो.नं. 8275583262

*डबल ढोलकी*

  मित्रांनो, जय शिवराय तुम्हाला आश्चर्य वाटले असेल हेमंत पगार यांनी स्थळांची माहिती पाठवण्याऐवजी डबल ढोलकी म्हणून काय पाठवले ? ते सर्व सांगण...