नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पास होणाऱ्या पहिल्या ३० विद्यार्थ्यांना विद्यानिकेतनमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणासाठी प्रवेश मिळत होता. आजसारखे वाड्यावस्त्यांवर इंग्रजी शाळांचे पीक आलेले नव्हते. म्हणून विद्यानिकेतन आपले वेगळेपण आणि महत्व टिकवून होते. अशा शाळेत मला शिकायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यानिमित्त मात्र जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या आठवणीतली एक घटना आठवली तर पोट दुःखेपर्यंत हसू येते.
साधारण ८३/८४ ची घटना असेल. मी तेव्हा सहावीला होतो. एकेदिवशी रोजप्रमाणे शाळा सुरु झाली. तेव्हा विद्यानिकेतनच्या आवाराबाहेर गुंजाळनगरमध्ये 'सेवासदन' या इमारतीत आणि आजूबाजूच्या काही इमारतीत शाळेचे वर्ग भरत असत.त्यादिवशी दुसरा तिसरा तास सुरु असेल.आमच्या वर्गातल्या एका मुलाने सरांकडे तक्रार केली, सर, पोट दुखत आहे. जोराची शी लागली. 'सरांनी तात्काळ त्याला होस्टेलवर जायची परवानगी दिली. सोबत दुसऱ्या मुलाला पाठवले.दोघे बहाद्दर मोठ्या आनंदात होस्टेलकडे निघाले. जाताना दुसऱ्या वर्गातल्या मित्राला 'डब्याला 'चाललो असे हाताने खुणावले. मग त्यानेही सरांना सांगितले, 'सर, माझे पोट दुखते आहे.' सरांनी त्यालाही होस्टेलवर जायला सांगितले. इकडे मुलांना गुरुकिल्लीच सापडली होती.एक एक करून सगळ्या मुलांच्या पोटात दुखायला लागले. शिक्षकांमध्येही खळबळ माजली. सगळ्या वर्गांना तातडीने होस्टेलला परत पाठवले.होस्टेलला तीनच टॉयलेट होते. तिथे काही मुले नंबर लावून उभे. बाकीचे मुले डब्बे भरून भावडी नदीच्या पात्रात रांगेने बसलेली. सगळे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात होती. त्यामुळे भावडीचे पात्र रंगेबेरंगी दिसत होते. विद्यानिकेतन देवळा नाशिक रस्त्यावर असल्यामुळे नदीपात्रातले दृश्य पाहून बातमी सगळीकडे पसरली होती. शाळेने तात्काळ वैद्यकीय पथक बोलावून मुलांवर उपचार सुरु केले होते. देवळा गावातले खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टरही मदतीला धावून आले होते. मुलांना विषबाधा झाली की काय या शंकेने सगळे चिंतातुर झाले.होस्टेलच्या स्वयंपाकी मंडळींचे धाबे दणाणले. जे जे डब्बा घेऊन पळत पळत भावडीच्या पात्रात गेले त्यांच्यावर परत आल्यावर उपचार सुरु झालेत. काही डॉक्टर प्रत्यक्ष भावडीच्या पात्रात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आलेत. यथावकाश सर्वांना बरे वाटायला लागले.आणि दुसऱ्या दिवशी एकेकजण कबुल व्हायला लागला . मला काहीच झाले नव्हते रे, पण तुम्ही जात होते म्हणून मी पण पळत पळत गेलो. मुलांना या प्रकाराची गम्मत वाटत होती. जुलाब थोड्या मुलांना झाले असतील पण बाकीचे जात आहेत तर मग आपण पण गेले पाहिजे अशी बऱ्याच मुलांची मानसिकता होती.अर्थात आम्हीसुद्धा 'न झालेल्या जुलाबाच्या साथीने हैराण होऊन भावडीच्या पात्रात हजेरी लावली होती. पण या खेळात वसतीगृहाच्या त्यावेळच्या रेक्टरना (बहुतेक पाटोळे सर किंवा रा.को. निकम) यांना बदलीच्या स्वरूपात शिक्षा भोगावी लागली. अशी ही जुलाबाची घटना आठवली तर हसून हसून पोट दुखते.