सकाळी इस्तरीवाल्या भैय्याच्या दुकानात गेलो होतो .भैय्या इस्तरी करता करता माझ्याशी गप्पा मारत होता .तेवढयात एक नवी कोरी नंबर नसलेली बुलेट गाडी फाड फाड आवाज करीत भय्याच्या दारात येउन उभी राहिली .दाढीवाल्या बुलेटवाल्याने गाडीवर बसूनच अंगातला शर्ट काढला, भैय्याच्या दुकानात भिरकावला आणि भर रस्त्यात उघडाबंब झाला .सचिन तेंडुलकरचा झेल पकडावा तसा भैय्याने शर्ट पकडला आणि प्राधान्याने इस्तरी करून दिली .इस्तरीचा शर्ट घालून बुलेटवाला निघणार तेवढयात भैय्याने आवाज दिला ,`दादा ,पैसे देके जाव ,बोहोनीका टाइम है`.
`ए भाड्या ,पैशे मागतो का ...बर बर ,देतो तुला पैशे ,उद्या तुझ बिहारच रिझर्वेशन करून ठेव.`
असे म्हणत बुलेटवाला सुसाट निघून गेला .
`साला ,हर महिने हप्ताभी लेके जाता है और कपडाभी फुकटमे....` भय्या पुटपुटत शिव्या देत होता .
मला मात्र काही तरी आठवल्यासारख वाटत होत .या बुलेटवाल्याला कुठे तरी पाहिल्यासारख वाटत होत.आणि अचानक आठवल ,अरे हाच तो , ये पप्या फाड पावती वाला !
माझ मन चटकन सात आठ वर्ष मागे गेल.असाच ऐके दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो.अचानक आठ दहा पोर ऑफिसमध्ये शिरली.त्यांचा अवतार पाहून मी लगेच ओळखलं होत आणि बाहेर जा असा इशारा केला होता.पोर नवखी होती म्हणून पटकन बाहेर गेली.पण दोन आत आलीच. एक दाराला पाठ टेकून उभा राहिला, श्रीकृष्ण बासरी वाजवताना पायांची घडी करून उभे राहतात तसा आणि पांडुरगासारखा कमरेवर हात ठेऊन .तोंडात गुटक्याचा तोबरा भरलेला.दुसरा सरळ आला माझ्या टेबलाजवळ आणि एक पावतीपुस्तक माझ्या तोंडापुढे धरत मग्रुरीच्या स्वरात म्हटला ,`पावती फाडा पाचशे एक ची ,जयंती आहे पुढच्या आठवड्यात .`
मीसुद्धा तितक्याच मग्रुरीत सांगितले ,`मी कुठल्याच जयंती पुण्यतिथीची पावती फाडत नाही .` आणि हातानेच बाहेर जाण्याचा इशारा केला .त्या सरशी त्याने मागचा गिअर टाकला , देवाला नमस्कार करून पाठ न दाखवता मंदिरातून बाहेर पडतो तसा .
आणि अचानक त्याला आदेश आला ,` ये पप्या फाड पावती `.
श्रीकृष्णाच्या पोझमध्ये उभ्या असलेल्या बॉसने गर्जना केली होती .आता पप्याला दहा हत्तींचे बळ आले आणि पुन्हा माझ्या टेबलापुढे येउन उभा राहिला .मी मानेने आणि हाताने मागे जाण्याचा इशारा करताच पप्याने पटकन मागचा गिअर टाकला .
पुन्हा पप्याच्या बॉसचा आदेश ,`ये पप्या फाड पावती .`
आदेश येताच पप्या पुन्हा
पुढच्या गिअर मध्ये आणि बाहेर उभी असलेली वर्हाडी मंडळी
हास्यकल्लोळात !!
असा खेळ तीन चार वेळा झाला .मधल्या काळात पप्याचा बॉस बाहेर जाऊन गुटख्याची पिचकारी मारून आलेला . हा काही असा इशार्याने जाणार नाही याची मला खात्री पटली होती.म्हणून मीच उठलो खुर्चीतून आणि खेकसलो त्याच्यावर ,`पावती तर फाडणार नाही पण तुला मात्र नक्की
फाडेन .`टेबलावरच्या पसार्याची आवराआवर केली ,हातातले घड्याळ काढून टेबलावर ठेवले आणि शर्टाच्या बाह्या वाळत बॉसपर्यंत पोहोचत नाही आणि जादू झाली .जादू अशी तशी नाही मिस्टर इंडियाने करावी तशी. बाहेर उभी असलेली पलटण माझा अवतार पाहताच अदृश झाली .कोणत्या रस्त्याने गेलेत कळलेही नाही .उरलेत दोघच ,पप्या आणि त्याचा बॉस .म्हटलं ,आता फाड पावती .
बॉसने परिस्थिती पाहिली आणि त्याचे विमान जमिनीवर उतरवले.`नसेल फाडायची तर नका फाडू पावती ,मी कुठे बळजबरी करतो आहे.`असे म्हणत म्हणत आपली वाट पकडली .
तोच हा बॉस `ये पप्या फाड पावती `वाला आज बुलेटवर बसून कपडे इस्तरी करत होता .
पप्या आता कुठे असेल माहित नाही पण पप्याचा बॉस पावतीपुस्तक न छापता हप्ते गोळा करत फिरतो ,गोरगरीब दुकानदारांकडून .तेही नव्या बुलेट गाडीवरून .
मी भैय्याला निरोप देऊन आलो ,पुन्हा हप्ता घ्यायला आला की मला बोलाव ,माझ्या हाताने देतो त्याला हप्ता . पाहू या येतो का निरोप .
No comments:
Post a Comment