" पुन्हा जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म घ्या ......
या शाहिस्तेखानावर उपकार करा
तुमच्या तलवारीने एकच घाव घाला आणि एकदाचे मला मरण दया महाराज
पुन्हा जन्म घ्या...... पुन्हा जन्म घ्या .
तुम्ही माझी बोटे छाटली तेव्हा जीव वाचला म्हणून मी स्वत:ला नशीबवान समजत होतो .
आता वाटते तेव्हाच मरण आले असते तर आज दिवसातून पन्नास वेळा मरायची मला वेळ आली नसती महाराज .
या चिमण्यादादाच्या धनुष्यबाणाने रोज पन्नास वेळा मरण्यापेक्षा तुमच्या हातून एकदाच मेलेले परवडले असते महाराज .
म्हणून माझ्यावर उपकार करा
पुन्हा जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म घ्या आणि एकदाचे मला मरण दया ."
शाहिस्तेखानच्या या आर्त विनवण्यांनी आता मलाही पाझर फुटायला लागला आहे .
एकच माणूस मरणार तरी किती वेळा हो !
सकाळ झाल्यापासून आमच्या घरात शाहिस्तेखानाच्या वधाचा एकपात्री प्रयोग सुरु होते.
नाटकाचा लेखक ,निर्माता ,कलाकार ,संगीतकार सबकुछ एकच
तो म्हणजे चिमण्यादादा अर्थात पार्थ हेमंत पगार .
( जाणकार इतिहासकारांनी नोंद घ्या ..........शिवाजी महाराजांनी फक्त बोटे छाटली होती परंतु वध करण्याचे उरलेले काम चिमण्यादादा करतो आहे . तेही एके ४७ च्या जमान्यात धनुष्यबाणाने )
एकपात्रीचे मुहूर्तही फार छान .
चिमण्यादादाला सकाळी झोपेतून उठवले कि लगेच पहिल्या प्रयोगाची घंटा होते.
`ओ पप्पा ,माझे धनुष्य बाण कुठे आहे .एकदा शाहिस्तेखानाला मारू दया ना `..............हा पहिला खेळ .
दात घासायला सांगितले की लगेच दुसर्याची परवानगी .
एकदा शाहिस्तेखानाला मारू दया मगच दात घासेन .
आंघोळ कर म्हटले की लगेच ,`एकदा शाहिस्तेखानाला मारू दया मगच..........`
असा दिवसातून पन्नास वेळा तरी शाहिस्तेखान चिमण्यादादाच्या धनुष्य बाणाने मरतो .
या सगळ्या प्रयोगात शिवाजी महाराज ही चिमण्यादादाच !
जमिनीला पाठ टेकवून पाय फाकवून झोपलेला आणि छातीमध्ये घुसलेला बाण काढताना विव्हळनारा शाहिस्तेखानही चिमण्यादादाच !
विव्हळताणाच `ओ पप्पा , फ्यान चालू करा हो ,शाहिस्तेखानाला गरम होत आहे `
शाहिस्तेखानच्या वधानंतर `हर हर महादेव ` च्या गगनभेदी गर्जना करणारे मावळे म्हणजे चिमण्यादादा .
`भागो शिवाजी आया भागो `म्हणत घरभर सैरावरा पळणारे खानाचे सैन्य म्हणजे चिमण्यादादा !
तबडक तबडक चालणारा महाराजांचा घोडाही तोच !
असा हा एकपात्री नाटकाचा प्रयोग दिवसभर रंगत असतो .
.
आणि प्रत्येक वेळेस शाहिस्तेखान विनवण्या करत असतो ,
`महाराज
पुन्हा जन्म घ्या
पुन्हा जन्म घ्या
तुमच्या हातून मला एकदाच मरण दया `
1 comment:
lay bhaari...
Mulanche balpan lavkar sampuch naye ase vatate
Post a Comment